रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (संग्रहित छायाचित्र)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आयात करण्यावरून भारतावर कठोर निर्बंध लादण्याची धमकी दिलेली असतानाच, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे मॉस्कोमध्ये दाखल झाले आहेत. बुधवार, ६ ऑगस्ट २०२५ रोजी ते रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भारत-रशिया संरक्षण, सुरक्षा सहकार्य आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
डोवाल यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा गुरुवारी (७ ऑगस्ट २०२५) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या वस्तूंवरील २५% शुल्कात ‘भरीव’ वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने अमेरिका नाराज असल्याचे दिसत आहे. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या वृत्तानुसार, "सध्याच्या वाढलेल्या भू-राजकीय परिस्थितीवर आणि रशियन तेलाचा भारताला होणारा पुरवठा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होईल."
संरक्षण सहकार्याव्यतिरिक्त, मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्ष आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या उर्वरित साठ्यांच्या वितरणावरही डोवाल चर्चा करण्याची शक्यता आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर डोवाल यांचा हा पहिलाच मॉस्को दौरा आहे. याशिवाय, रशियाने अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला नुकतीच दिलेली मान्यता हा मुद्दाही चर्चेत येण्याची शक्यता आहे.
डोवाल यांचा हा दौरा काही आठवड्यांपूर्वीच ठरला असला तरी, अमेरिकेच्या धमक्या आणि शुल्काबाबत भारताची भूमिका ते स्पष्टपणे मांडतील अशी अपेक्षा आहे. तसेच, या वर्षाच्या अखेरीस रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याची पूर्वतयारी करणे हादेखील या भेटीचा एक उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांच्यात वार्षिक शिखर परिषद होणार आहे.
या महिन्याच्या अखेरीस परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेसुद्धा मॉस्कोला भेट देणार आहेत. युक्रेन संघर्षामुळे अनेक वर्षे रखडलेली ही शिखर परिषद गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान मोदींच्या मॉस्को दौऱ्यानंतर पुन्हा सुरू झाली होती.