पाकिस्तानचा राफेल पाडल्याचा दावा अजित डोवाल यांनी फेटाळला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

'ऑपरेशन सिंदूर 'दरम्यानच्या पाकिस्तानने भारताची हानी केल्याचा एक तरी पुरावा द्यावा, असे आव्हान देत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तान आणि विदेशी माध्यमांचे दावे तसेच सरसेनाध्यक्ष अनिल चौहान यांनी भारताच्या हानीविषयी केलेले वक्तव्य अप्रत्यक्षपणे खोडून काढले आहे.

'पाकिस्तानविरुद्ध ७ ते १० मे दरम्यान झालेल्या लष्करी संघर्षात प्रारंभीच्या टप्प्यात काही नुकसान झाले. ते किती झाले हे महत्त्वाचे नाही, तर नुकसान कशामुळे झाले आणि त्यानंतर आम्ही काय केले हे महत्त्वाचे ठरते,' असे विधान सरसेनाध्यक्ष चौहान यांनी केले होते.

आज आयआयटी मद्रासच्या दीक्षांत समारंभात बोलताना डोवाल यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताचे नुकसान झाल्याचे एक तरी छायाचित्र दाखवावे, असे आव्हान पाकिस्तानला तसेच विदेशी माध्यमांना देताना सरसेनाध्यक्षांचे विधान अप्रत्यक्षपणे खोडून काढले. भारताच्या लष्करी कारवाईच्या प्रत्युत्तरात भारताची राफेल विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. डोवाल यांनी हा दावा सपशेल फेटाळून लावला.