ऑपरेशन सिंदूर : जगभर गर्जला महिला अधिकाऱ्यांचा सशक्त आवाज

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
भारतीय सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग
भारतीय सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग

 

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला केलाय. भारतीय सैन्याने पत्रकार परिषदेत या हल्ल्याची सविस्तर माहिती दिली आहे. या परिषदेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते भारतीय सैन्याच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी. 

परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांच्यासह या दोन महिला अधिकारी या पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले. दोन महिला अधिकाऱ्यांना पत्रकार परिषदेचे नेतृत्व देऊन जगाला नारीशक्ती सोबतच हिंदू-मुस्लिम ऐक्याचाही संदेश दिला आहे. 

कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंग
विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे भारतीय हवाई दलात सामील होण्याचे लहाणपणापासूनचे स्वप्न होते. राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) सामील होऊन त्यांनी त्या दिशेने पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. सैन्यात जाणाऱ्या कुटुंबातील त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. डिसेंबर २०१९ मध्ये त्या फ्लाइंग ब्रँचमध्ये रुजू झाल्या.

 
विंग कमांडर सिंग यांनी आतापर्यंत २,५०० तासांहून अधिक उड्डाण केले आहेत. चेतक आणि चीता ही हेलिकॉप्टर्स त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतासारख्या कठीण भूप्रदेशात चालवली आहेत. अनेक बचाव मोहिमांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये अरुणाचल प्रदेशात त्यांनी एक मोठी बचाव मोहीम यशस्वीपणे पार पाडली. २०२१ मध्ये त्या २१,६५० फूट उंचीच्या माउंट मणिरंग पर्वतारोहण मोहिमेत सामील झाल्या. तिन्ही सैन्यदलांच्या महिला अधिकारी यात सहभागी झाल्या होत्या.

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी... 
३५ वर्षीय सोफिया कुरेशी सध्या भारतीय सैन्यात कर्नल पदावर कार्यरत आहेत. सोफिया यांनी  भारतीय सैन्यात १९९९ मध्ये प्रवेश केला. त्यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण घेतले. पुढे त्यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मिशनसाठी भारताच्या तुकडीचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवडलेल्या मोजक्या प्रशिक्षकांमध्ये सोफिया यांचा समावेश होता. सध्या त्या सैन्याच्या सिग्नल कोर विभागात कार्यरत आहेत. इथे त्या सैन्य संदेशवहन आणि माहिती यंत्रणांची जबाबदारी सांभाळतात.

२००६ मध्ये काँगोतील संयुक्त राष्ट्र शांतता मिशनचामध्येही कर्नल सोफिया यांचा सहभाग होता. गेल्या सहा वर्षांपासून त्या सातत्याने शांतता अभियानांशी निगडित आहेत. पुण्यात पार पडलेल्या ‘एक्सरसाइज फोर्स १८’ या १८ देशांच्या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात त्यांनी भारतीय सैन्य तुकडीचे नेतृत्व केले. हे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. शांतता अभियान आणि मानवी भूसुरुंग काढण्यावर केंद्रित या सरावात त्यांनी ४० जणांच्या भारतीय पथकाचे नेतृत्व केले. १८ देशांच्या तुकड्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. 
 
 
पूर मदत कार्यात महत्त्वाची भूमिका
सोफिया कुरेशी यांनी पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रममधील योगदानासाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (GOC-in-C) यांच्याकडून सन्मानितही करण्यात आले होते. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ (SO-in-C) यांचे प्रशंसा पत्र मिळाले. फोर्स कमांडर यांनीही कर्नल सोफिया यांनी राबवलेल्या मदतकार्याची प्रशंसा केली. 

नेतृत्वाक्षमतेवर शिक्कामोर्तब
आसियान देशांच्या संमेलनात सहभागी झालेल्या सोफिया यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना तत्कालीन लेफ्टनंट जनरल बिपिन रावत म्हणाले होते, “सैन्यात आम्ही समान संधी आणि जबाबदारीवर विश्वास ठेवतो. पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांमध्ये भेदभाव करत नाही. नेतृत्वक्षमता आणि जबाबदारी पार पाडण्याची कुवत यामुळे सोफिया कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे.”

देशसेवेचा कौटुंबिक वारसा
सोफिया गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सैन्याचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील आणि आजोबा सैन्यात होते. सोफिया यांचे पतीदेखील भारतीय सैन्याच्या मेकनाइज्ड इन्फंट्रीमध्ये सैन्य अधिकारी आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter