'ऑपरेशन सिंदूर 'मुळे मोठा फटका बसलेल्या पाकिस्तानातील 'जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानात ३०० हून अधिक मशिदी उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी संकलनाची मोहीम सुरू केली आहे. 'लष्करे तैयबा'चे ज्याप्रमाणे विकेंद्रीकरण झाले, त्याप्रमाणे 'जैशे महमंद' या संघटनेचेही विक्रेदीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे.
पाकिस्तानची गुप्तचर संघटना 'आयएसआय'च्या पाठिंब्याने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने निधी उभारणीसाठी नवी यंत्रणा उभी केली आहे. संस्थापक आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर याच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली असलेल्या 'ईझी पैसा' आणि 'सदा पे' यांसारख्या डिजिटल वॉलेटचा वापर करून हा निर्धा उभारला जात आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीए) तपासणीपासून दूर राहण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. अंदाजे ३.९१ अब्ज रुपयांचा निधी उभारण्याची ही मोहीम असून, संघटनेच्या पुढील कारवायांसाठी आणि शस्त्रास्त्र खरेदीसाठी हा निधी उपलब्ध होणार आहे, असेही सांगण्यात आले.
भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान 'जेशे महमंद'च्या मुख्यालयासह मरकज बिलाल, मरकज अब्बास, महमोना जोया आणि सरगल हे प्रशिक्षण कॅम्प उद्ध्वस्त केले होते. या उद्ध्वस्त झालेल्या तळांची पुन्हा उभारणी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, संघटनेने पाकिस्तानभर मशिदी उभारण्याच्या नावाखाली डिजिटल वॉलेटद्वारे ऑनलाइन निधी उभारणी मोहीम सुरू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
असा उभारला जातोय निधी
विविध डिजिटल वॉलेट अकाउंट मसूद अजहरचा भाऊ तल्हा अल सैफ आणि कमांडर आफताब अहमद यांच्या मोबाइल क्रमांकांशी जोडलेले आढळले असून, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून पैसा उभारण्यात येत आहे. अजहरचा मुलगा अब्दुल्लाच्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून चालणारे आणखी एक निधी उभारणीचे 'रॅकेट' आढळले आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये दहशतवादी संघटनेचा कमांडर सय्यद सफदर शाहकडून मनसेहरा जिल्ह्यातील ओघी, मेल्वारा पोस्ट ऑफिसजवळ देणग्या गोळा केल्या जात आहेत.