विदेश दौऱ्यावर असतानाही काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा खोडसाळपणा पाकिस्तानने पुन्हा केला आहे. काश्मीर ही पाकिस्तानची दुखरी नस असल्याचे विधान या देशाचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असिम मुनीर यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना केले आहे. तसेच, आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास अण्वस्त्रांचा वापर करण्याचा इशाराही मुनीर यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
मुनीर हे चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या काही नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी पाकिस्तानशी निगडित मुद्द्यांवर चर्चा केली. पहलगाम हल्ल्याच्या काही आठवडे आधीही मुनीर यांनी काश्मीर ही दुखरी नस असल्याचे विधान केले होते. आज पाकिस्तानी समुदायासमोर बोलताना त्यांनी या आपल्या विधानाची पुनरुक्ती केली. "भारताशी झालेल्या संघर्षावेळी पाकिस्ताने जोरदार प्रतिकार केला. भारताने कोणत्याही प्रकारे घुसखोरी केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असे आम्ही दाखवून दिले. काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय नाही, तर अपूर्ण असलेला आंतरराष्ट्रीय वाद आहे. काश्मीर ही भारताची दुखरी नस आहे," असे मुनीर यावेळी म्हणाले.
'पाकिस्तान हा एक बेजबाबदार देश'
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिका दौऱ्यावर असताना भारताला अण्वस्त्रांची धमकी दिली असल्याने आपण एक अत्यंत बेजबाबदार अण्वस्त्रक्षम देश आहोत, हे पाकिस्तानने सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया भारत सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. "अमेरिकेने ज्या ज्या वेळी पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे, त्या प्रत्येकवेळी पाकिस्तानने आपला खरा चेहरा उघड केला आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही शिल्लक नसून लष्कराच्या हातातच सर्व सूत्रे असल्याचे हे निदर्शक आहे," असे सूत्रांनी सांगितले. मुनीर यांचे अमेरिकेत झालेले स्वागत पाहता, पाकिस्तानमध्ये खुले किंवा छुपे बंड होण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल असू शकते आणि त्यानंतर सध्याचे फिल्ड मार्शल हे देशाचे अध्यक्ष बनू शकतात, असेही भाकीत भारतीय अधिकाऱ्यांनी वर्तविले. मुनीर यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प त्यांना जबाबदार धरणार का, असा सवालही भारतीय अधिकाऱ्यांनी विचारला.
भारताला इशारा देताना मुनीर म्हणाले, "आम्ही एक अण्वस्त्रक्षम देश आहोत, हे लक्षात ठेवावे. आम्ही बुडत आहोत असे आम्हाला वाटले तर निम्म्या जगाला बरोबर घेऊन आम्ही बुडू."
भारताने आमचा पाणीपुरवठा रोखल्यास त्यांच्या प्रकल्पांवर हल्ले करू, अशी दर्पोक्तीही मुनीर यांनी केली. मुनीर यांचा मागील दीड महिन्यातील दुसरा अमेरिका दौरा आहे. या दौऱ्यांमध्ये पाकिस्तान आणि अमेरिकेच्या संबंधांनी एक नवे वळण घेतले असून आम्ही एका सकारात्मक मागनि जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुनीर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा दावा करत मुनीर यांनी ट्रम्प यांचे आभारही मानले.