नक्षलवादाचा गड कोसळला! अबुझमाडमधील ४५% नक्षलवादी शरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नक्षलवादाविरोधातील लढाईत सुरक्षा दलांना आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक यश मिळाले आहे. नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा आणि सुरक्षित बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबुझमाड (Abujhmarh) या दुर्गम भागातील ४५ टक्के नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा नारायणपूरचे पोलीस अधीक्षक (SP) रॉबिन्सन्स गुरिया यांनी केली आहे. या घटनेमुळे नक्षलवादी चळवळ मुळापासून हादरली आहे.

'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत सुरक्षा दलांनी राबवलेल्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक मोहिमांमुळेच हे शक्य झाले आहे. पोलीस अधीक्षक गुरिया यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. "अबुझमाडमधील सुमारे ४५ टक्के नक्षलवादी आता मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. आमची मोहीम योग्य दिशेने सुरू असून, लवकरच आम्ही हा संपूर्ण परिसर नक्षलमुक्त करू," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहे अबुझमाड?

छत्तीसगडमधील नारायणपूर, विजापूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेला सुमारे ४,००० चौरस किलोमीटरचा हा घनदाट जंगलाचा आणि डोंगराळ प्रदेश आहे. हा भाग अनेक दशकांपासून नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा गड आणि प्रशिक्षण केंद्र मानला जातो. येथे पोहोचणे अत्यंत कठीण असल्याने, नक्षलवाद्यांचे सर्वोच्च नेते येथे आश्रय घेत असत.

गेल्या काही आठवड्यांपासून छत्तीसगड आणि महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या शरणागतीचे सत्र सुरू आहे. कांकेर, विजापूर आणि गडचिरोली येथे शेकडो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आता थेट अबुझमाडमधील नक्षलवादीच मोठ्या संख्येने शरण येत असल्याने, ही चळवळ अंताच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.