भारताच्या S-400 प्रणालीवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा, PIB ने उघडले सत्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला करून ती नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा आणि निराधार असल्याचे केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जात असलेला फोटो हा जुन्या घटनेचा असून, त्याचा भारताच्या S-400 प्रणालीशी कोणताही संबंध नाही, असे PIB ने म्हटले आहे.

पाकिस्तानच्या अनेक सोशल मीडिया हँडल्सवरून एक फोटो व्हायरल केला जात होता, ज्यात एका नष्ट झालेल्या संरक्षण प्रणालीचे अवशेष दिसत होते. हा भारताचा S-400 असल्याचे सांगत, पाकिस्तानने भारतावर यशस्वी हल्ला केल्याचा खोटा प्रचार सुरू केला होता.

यावर, PIB च्या फॅक्ट चेक युनिटने (PIB Fact Check) तपास करून सत्य समोर आणले. त्यांनी सांगितले की, व्हायरल झालेला फोटो हा मे २०२४ मधील असून, तो युक्रेनमधील एका घटनेचा आहे, जिथे रशियन S-400 प्रणालीचे वाहन नष्ट झाले होते. "भारताच्या S-400 प्रणालीवर हल्ला झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे," असे PIB ने 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.

'ऑपरेशन सिंदूर'मधील पराभवानंतर, पाकिस्तान भारताविरोधात सातत्याने खोटा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि आपल्या नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तान अशा खोट्या बातम्या पसरवत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. भारताची S-400 हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि कार्यान्वित असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.