पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ७१,८५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ईशान्य भारताच्या विकासाला गती देणे आणि बिहारच्या कृषी क्षेत्राला बळ देणे, हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मिझोरामला मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी
पंतप्रधान मिझोराममधील आयझॉल येथे ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ८,०७० कोटी रुपयांच्या 'बैराबी-साईरंग' या नवीन रेल्वे लाईनचे उद्घाटन. या प्रकल्पामुळे मिझोरामची राजधानी पहिल्यांदाच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडली जाईल. यासोबतच, ते साईरंग (आयझॉल) ते दिल्ली, गुवाहाटी आणि कोलकाता या तीन नवीन एक्सप्रेस गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवतील.
मणिपूर आणि आसामसाठी मोठे पॅकेज
मणिपूरमध्ये, पंतप्रधान शांतता आणि विकासाच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी ८,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. तर, आसाममध्ये ते १८,३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यासोबतच, ते गुवाहाटी येथे भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या १०० व्या जयंती सोहळ्यातही सहभागी होतील.
बिहारसाठी ३६,००० कोटींचे प्रकल्प आणि 'मखाना बोर्ड'
आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान बिहारला भेट देतील. येथे ते पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील आणि सुमारे ३६,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. यात बिहारमधील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील २५,००० कोटी रुपयांच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा आणि कोसी-मेची नदीजोड प्रकल्पाचा समावेश आहे.
या दौऱ्यातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे, बिहारमध्ये 'राष्ट्रीय मखाना बोर्डा'ची (National Makhana Board) स्थापना. देशातील सुमारे ९०% मखाना उत्पादन बिहारमध्ये होते. या बोर्डामुळे मखाना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यास आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
पंतप्रधान पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे १६ व्या 'संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-२०२५' चे उद्घाटनही करतील.