राज्यसभेसाठी निवड झालेल्या ४ मान्यवरांना पंतप्रधानांनी ‘अशा’ दिल्या शुभेच्छा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामनिर्देशित केलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशातून पंतप्रधानांनी प्रत्येक नामनिर्देशित व्यक्तीच्या योगदानाचे कौतुक केले.

उज्वल निकम: विधि क्षेत्रातील निष्ठा
पंतप्रधानांनी श्री उज्वल निकम यांच्या विधि क्षेत्रातील उल्लेखनीय निष्ठा आणि संविधान मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. निकम हे एक यशस्वी विधिज्ञ आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचे स्वागत केले. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी सांगितले: "श्री. उज्ज्वल निकम यांची विधि क्षेत्र आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे. त्यांनी केवळ यशस्वी विधिज्ञ म्हणून काम पाहिले नाही, तर अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत न्याय मिळवून देण्यासाठी आघाडीवर राहिले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी संवैधानिक मूल्यांना बळकटी देण्यासोबतच सामान्य नागरिकांचा सन्मान सदैव राखला गेला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले याचा आनंद आहे, त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा."

सी. सदानंदन मास्टर: धैर्य आणि राष्ट्र विकास
पंतप्रधानांनी श्री. सी. सदानंदन मास्टर यांच्या संदर्भात त्यांचे जीवन धैर्य आणि अन्यायाविरोधातील प्रतिकाराचे प्रतीक असल्याचे सांगितले. हिंसाचार आणि धमकीचा सामना करूनही, सदानंदन मास्टर राष्ट्र विकासासाठी वचनबद्ध राहिले. पंतप्रधानांनी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. युवा सक्षमीकरणाविषयी त्यांच्या उत्कटतेचा उल्लेख केला. राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. नवीन जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले: "श्री सी. सदानंदन मास्टर यांचे जीवन हे धैर्य आणि अन्यायाविरोधातील प्रतिकाराचे प्रतीक आहे. हिंसाचार आणि धमक्यांनीही त्यांच्या राष्ट्र विकासाच्या भावना डगमगू दिल्या नाहीत. शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे प्रयत्नही उल्लेखनीय आहेत. युवा सक्षमीकरणासाठी ते अत्यंत उत्सुक आहेत. राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी नामांकन झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. खासदार म्हणून त्यांच्या भूमिकेसाठी शुभेच्छा."

हर्ष वर्धन श्रृंगला: कुशल राजदूत आणि धोरणकार
श्री हर्ष वर्धन श्रृंगला यांच्या नामनिर्देशा बाबत प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले. एक कुशल राजदूत, बौद्धिक विचारवंत आणि धोरणात्मक विचारवंत म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधानांनी भारताच्या परराष्ट्र धोरणातील त्यांच्या योगदानाचे आणि भारताच्या G-20 अध्यक्षतेतील भूमिकेचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले त्यांना राज्यसभेत नामनिर्देशित करण्यात आल्याचा आनंद आहे. त्यांच्या अद्वितीय दृष्टिकोणामुळे संसदीय चर्चेला निश्चितच समृद्धी मिळेल.

पंतप्रधान म्हणाले: "श्री. हर्ष वर्धन श्रृंगला जी यांनी राजदूत, बौद्धिक विचारवंत आणि धोरणात्मक विचारवंत म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अनेक वर्षे भारताच्या परराष्ट्र धोरणात मोलाचे योगदान दिले. आपल्या G20 अध्यक्षतेतही महत्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेसाठी नामांकित केल्याचा मला आनंद आहे. त्यांच्या अद्वितीय दृष्टिकोणामुळे संसदीय प्रक्रिया निश्चितच समृद्ध होईल."

डॉ. मीनाक्षी जैन: अभ्यासक आणि इतिहासकार
डॉ. मीनाक्षी जैन यांना नामनिर्देशित केल्याबद्दल पंतप्रधान म्हणाले, ही खूप आनंदाची बाब आहे. अभ्यासक, संशोधक आणि इतिहासकार म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. शिक्षण, साहित्य, इतिहास आणि राज्यशास्त्र या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेतली. पंतप्रधानांनी त्यांच्या राज्यसभा कारकिर्दीसाठीही शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले: "डॉ. मीनाक्षी जैन जी यांना राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्यात आल्याचा अत्यंत आनंद झाला आहे. त्या एक अभ्यासक, संशोधक आणि इतिहासकार म्हणून उल्लेखनीय कार्य करत आहेत. शिक्षण, साहित्य, इतिहास आणि राज्यशास्त्र या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे शैक्षणिक संवाद अधिक समृद्ध झाला आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा."