"ऑपरेशन सिंदूर हे भारताकडे स्वदेशी विकसित सामर्थ्याने शत्रूंना पराभूत करण्याची क्षमता असल्याचा पुरावा आहे," असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. मध्य प्रदेशातील उमरिया येथे बीईएमएल रेल हब फॉर मॅन्युफॅक्चरिंग (BRAHMA) या ग्रीनफिल्ड रेल्वे उत्पादन सुविधेची पायाभरणी करताना ते बोलत होते. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला हे योग्य प्रत्युत्तर होते, असेही ते म्हणाले.
भारताच्या या निर्णायक प्रत्युत्तराने देश आपल्या अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर होणारा हल्ला सहन करणार नाही, असा खणखणीत आणि स्पष्ट संदेश दिला गेला आहे, यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. "आम्ही कोणालाही चिथावणी देत नाही, परंतु जे आम्हाला चिथावणी देतात त्यांना मोकळे सोडणार नाही," असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
'ऑपरेशन सिंदूर' हे भारताच्या स्वयंपूर्णतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगताना राजनाथ सिंह म्हणाले की, सशस्त्र दलांनी स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा प्रभावीपणे वापर केला, ज्यांनी या ऑपरेशनच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. "भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याची प्रतिज्ञा केल्यामुळेच तो आज या स्थानावर पोहोचू शकला आहे," असे ते म्हणाले.
संरक्षण क्षेत्रातील वाढत्या आत्मनिर्भरतेवर बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आज भारत केवळ आपल्या भूमीवर शस्त्रास्त्रे तयार करत नाही, तर मित्र देशांच्या सुरक्षा गरजा देखील पूर्ण करत आहे. "आपले संरक्षण उत्पादन आणि निर्यात अभूतपूर्व वेगाने वाढत आहे आणि त्याने विक्रमी संख्या गाठली आहे. हे नव्या भारताचे नवीन संरक्षण क्षेत्र आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.