यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचं मुख्य आकर्षण ठरणार 'वंदे मातरम्'ची गौरवगाथा

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
 'वंदे मातरम् - १५० वर्षे' या विषयावर आधारित भव्य चित्ररथ
'वंदे मातरम् - १५० वर्षे' या विषयावर आधारित भव्य चित्ररथ

 

नवी दिल्ली:

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा चित्ररथ विशेष आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. 'वंदे मातरम्' या आपल्या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'वंदे मातरम् - १५० वर्षे' या विषयावर आधारित एक भव्य चित्ररथ राजपथावरील संचलनात सहभागी होणार आहे. हा चित्ररथ म्हणजे भारताच्या सांस्कृतिक स्मृतींचा एक चालता-बोलता ऐतिहासिक दस्तऐवज (मुव्हिंग आर्काइव्ह) असेल, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.

१८७५ मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी 'वंदे मातरम्'ची रचना केली होती. या गीताने देशाला 'माता' म्हणून साद घातली आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा दिली. या चित्ररथाच्या मुख्य भागावर 'वंदे मातरम्'चं मूळ हस्तलिखित ठेवलं जाईल. तसेच भारताच्या चारही दिशांमधील विविध लोककलाकार या चित्ररथासोबत सहभागी होऊन देशाची सांस्कृतिक विविधता आणि एकात्मता दर्शवतील.

सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी सांगितलं की, प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ हे केवळ प्रदर्शनाचे माध्यम नसून ते राष्ट्राच्या ऐतिहासिक अनुभवांना एका दृश्यात्मक भाषेत मांडण्याचं काम करतात. यंदाच्या चित्ररथाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मध्यभागी आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक तरुण (Gen-Z) असेल. विष्णुपंत पागनीस यांनी ज्या ऐतिहासिक शैलीत वंदे मातरम् गायलं होतं, त्याच धाटणीने हा तरुण या गीताचं सादरीकरण करेल.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने (IGNCA) २०२१ पासून सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सांभाळली आहे. IGNCA चे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांच्या मते, हा चित्ररथ केवळ एका विभागाचे प्रतिनिधित्व न करता देशाच्या सामूहिक भावना आणि राष्ट्रचेतनेचं प्रतीक आहे. इतर मंत्रालये किंवा राज्ये आपापल्या योजनांची माहिती देतात, मात्र सांस्कृतिक मंत्रालय नेहमीच भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे कलेच्या माध्यमातून मांडण्यावर भर देतं.