मुंबई:
मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय निवृत्त बीएमसी अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढून १६.५० लाख रुपयांना लुटलंय. आरोपींनी स्वतःला एटीएस (ATS) आणि एनआयए (NIA) अधिकारी असल्याचं भासवून या वृद्धाला दिल्ली बॉम्बस्फोटाच्या केसमध्ये नाव असल्याचं सांगून भीती घातली होती. याप्रकरणी अंधेरीतील पीडित व्यक्तीने पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबर रोजी पीडित वृद्धाला एक फोन आला होता. समोरील व्यक्तीने आपण दिल्ली दहशतवाद विरोधी विभागातून बोलत असल्याचं सांगितलं. "तुमचं नाव दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीत आलं आहे आणि तुमची गुप्तपणे चौकशी करावी लागेल," अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर पीडिताला 'सिग्नल' अॅप डाऊनलोड करायला लावून व्हिडिओ कॉल करण्यात आला. या कॉलदरम्यान एका भामट्याने एनआयए अधिकारी सदानंद दाते असल्याचं भासवून पीडितावर दबाव निर्माण केला.
भामट्यांनी या वृद्धाला सांगितलं की, त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यात मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून ७ कोटी रुपये जमा झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं सांगून त्यांना कोणाशीही बोलण्यास मनाई करण्यात आली आणि एका प्रकारे 'डिजिटल अरेस्ट'मध्ये ठेवलं गेलं. तुमच्या बँक खात्यातील पैसे कायदेशीर मार्गाचे आहेत की नाही, हे तपासावं लागेल असं सांगून आरोपींनी वृद्धाला त्यांचे सर्व पैसे एका ठराविक बँक खात्यात ट्रान्सफर करायला लावले.
चौकशीच्या नावाखाली घाबरलेल्या वृद्धाने एकूण १६.५० लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. पैसे मिळाल्यावर आरोपींनी त्यांचा नंबर ब्लॉक केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित वृद्धाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.