आपले आजोबा किंवा पणजोबा जेव्हा तरुण होते, तेव्हा त्यांचे आदर्श कोण होते? याचा तुम्ही कधी विचार केलाय? मी १९३०च्या दशकातील भारतातील पाच प्रभावशाली आणि लोकप्रिय युवा आदर्शांची यादी तयार केली आहे. या यादीत आणखी बरीच नावं असू शकली असती. या यादीत आणखी बरीच नावे असू शकतात परंतु अशा व्यक्तींची निवड केली ज्यांचा एका पिढीवर अतुलनीय प्रभाव होता.
भगत सिंग :
मला जर कुणी तरुणपणी संपूर्ण देशाचा आदर्श बनलेल्या २०व्या शतकातील एका भारतीयाचे नाव विचारले तर मी भगत सिंग यांचे नाव घेईल. या माणसाने जवळपास एका शतकापासून भारतीय देशभक्तांना प्रेरणा दिली आहे. वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली. प्रसिद्ध चित्रपट निर्माते के.ए. अब्बास यांनी त्यांच्या फाशीच्या बातमीबद्दल सांगितले.
ते म्हणाले की, “तो दिवस होता २५ मार्च १९३१ चा. माझी इंटरमिजिएट परीक्षा जवळ आली असल्याने मी मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत होतो. त्यामुळे सकाळचं वृत्तपत्र पाहिलं नव्हतं. जेव्हा मी कॉलेजला गेलो आणि ग्रंथालयात पोहोचलो, तेव्हा झहीर बाबर कुरेशी एका कोपऱ्यात डोकं खाली घालून बसलेला दिसला. मी त्याच्याजवळ जात विचारपूस करू लागलो. मी त्याच्या पाठीवर हात ठेवला, तेव्हा तो रडत असल्याचं दिसलं. माझ्या या सांत्वनामुळे तो आणखी रडू लागला. ‘काय झालं, झहीर?’ मी विचारलं. त्याने मला सकाळचं वृत्तपत्र वाचायला दिलं. तिथे पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात बातमी होती: भगत सिंग आणि इतर दहशतवाद्यांना फाशी…"
ते पुढे म्हणतात, "मी ग्रंथालयातून बाहेर पडलो, कॉलेज आणि कॅम्पस सोडलं, रेल्वे लाईन ओलांडली आणि प्रदर्शन मैदानात गेलो. ते मैदान ओसाड आणि निर्जन होतं. तिथे बसून मी मनमुराद रडलो.”
भगत सिंग हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या रूपाने भारतीय तरुणांना एक नायक मिळाला. त्यांच्या मृत्युनंतर दरवर्षी भगतसिंग दिन म्हणून त्यांच्या हौतात्म्याचा उत्सव थांबवण्याचे एक नवीन आव्हान ब्रिटिश सरकारसमोर होते. पोलीस देशभरातील राष्ट्रवादींना हा दिवस साजरा करण्यासाठी अटक करत असत परंतु १९४७ पर्यंत हा उत्सव थांबवता आला नाही.
ध्यानचंद :
जर अमेरिकेला मोहम्मद अली आणि ऑस्ट्रेलियाला डॉन ब्रॅडमन मिळालेत तर भारताला नक्कीच मेजर ध्यानचंद लाभले आहेत. ध्यानचंद यांनी भारताला हॉकीत सलग ऑलिम्पिक सुवर्णपदकं मिळवून दिलीत. त्यावेळी त्यांनी वसाहती राष्ट्राला राष्ट्रीय अभिमान मिळवून दिला.
१९३६ मध्ये बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाने ४०,००० लोकांसमोर तिरंग्याला (तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा) सलाम केला.
या समारंभात अॅडॉल्फ हिटलर उपस्थित होते. ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळवून दिला.
तेव्हापासून भारतीय तरुण हॉकीचा पाठलाग करू लागले आणि त्यांना आदर्श मानू लागले. हिटलरने ध्यानचंद यांना नोकरीची ऑफर देखील दिली होती. अनेक देशांनी त्यांच्या काठीत जादुई गोंद आहे का याची तपासणी केली. स्वातंत्र्य मिळण्याआधीच त्यांनी भारतीय राष्ट्रीय झेंड्याला ऑलिम्पिकमध्ये मान मिळवून दिला. १९३० च्या दशकात भारतात ध्यानचंद यांच्यासारखे प्रेरणास्थान फार कमी होते.
कुंदन लाल सैगल :
“के.एल. सैगल यांनी तानसेन यांनाही मागे टाकले. मियां तानसेन आपल्या काळात प्रसिद्ध होते, पण त्यांचा आवाज राजवाड्याच्या भिंतीत बंद होता. सैगल यांच्यामागे संपूर्ण राष्ट्र होतं आणि करोडो लोक त्यांचे संगीतप्रेमी होते,” हे शब्द प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांचे.
के.एल. सैगल यांनी १९३०च्या दशकात संपूर्ण राष्ट्राला मंत्रमुग्ध केलं. त्यांनी ‘झुलना झुलावो’ या गाण्याच्या पाच लाखांहून अधिक रेकॉर्ड केल्या आहेत. नंतर ‘देवदास’ चित्रपटात गायन आणि अभिनयाने त्यांनी अमरत्व मिळवले. ही काही सामान्य गोष्ट नाही की, एका माणसाने भारतात चित्रपट संगीत लोकप्रिय केले, गझल गायनाला प्रसिद्धी मिळवून दिली, मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, तलत महमूद यांसारख्या गायकांना प्रेरणा दिली.
सैगल यांनी सुरुवातीला प्रशिक्षित गायक नसल्यामुळे ऑडिशनमध्ये नाकारलं गेलं होतं. सायगल हा एक असा चमत्कार होते जे, भारतीय सिनेमा आणि संगीतात आजही अतुलनीय आहे. जानेवारी १९४७ मध्ये वयाच्या ४२व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा भारत फाळणीपूर्वीच्या दंगलींनी ग्रस्त होता.
फिल्मइंडिया या मासिकाने त्यांच्या मृत्यूनंतर लिहिले की, “सायगल यांच्या मृत्यूची बातमी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यानंतर एक आठवडा दंगल, राजकारण आणि पाकिस्तानच्या बातम्या बाजूला पडल्या. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, स्पृश्य आणि अस्पृश्य या सगळ्यांनी आदराने कुंदन लाल सायगल यांच्या अकाली आणि दुखद मृत्यूवर चर्चा केली. ते भारतीय चित्रपटसृष्टीतले सर्वात महान गायक होते.”
रशीद जहाँ :
१९३२ मध्ये लखनऊच्या लेडी डफरिन रुग्णालयात काम करणाऱ्या २७ वर्षीय स्त्रीरोगतज्ज्ञ रशीद जहाँ यांनी बातम्या आणि वादविवादांवर वर्चस्व गाजवले. त्यांनी सज्जाद झहीर, महमूद-उझ-झफर आणि अहमद अली या तीन पुरुष मित्रांसह उर्दू मध्ये लघुकथांचा संग्रह प्रकाशित केला. ‘अंगारे’ या संग्रहातील रशीद जहाँ यांनी लिहिलेल्या दोन कथांनी पडदा, बालविवाह आणि अनियोजित गर्भधारणा या मुद्द्यांवर थेट हल्ला केला.
समाजातील रूढीवादी वर्गांनी, विशेषतः मुस्लिमांनी, सरकारवर दबाव टाकून या पुस्तकावर बंदी घातली. या बंदीमुळे पुस्तकाची लोकप्रियता वाढलीच. परंतु यातून अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाची स्थापना झाली. या संघटनेला प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, मुल्क राज आनंद यांच्यासह अनेकांचा पाठिंबा मिळाला.
रशीद जहाँ यांनी संपूर्ण पिढीतील तरुण मुलींना महिला सशक्तीकरणाचा मार्ग दाखवला. इस्मत चुगताई, कुर्रतुलैन हैदर यांसारख्या अनेक लेखिकांनी भारतात तिच्या पावलांवर पाऊल ठेवले.
जे.आर.डी. टाटा :
१९३० च्या दशकात जवळपास दोन शतके युरोपीय साम्राज्याच्या ताब्यात असलेल्या भारतातील तरुण उद्योजकांना जे.आर.डी. टाटा यांच्यासारखा आदर्श मिळाला. या तरुणाने युरोपीयांची मक्तेदारी असलेल्या आधुनिक औद्योगिक क्षेत्रात प्रवेश केला. देशातील पारंपरिक श्रीमंतांपेक्षा वेगळे शिक्षण टाटा यांनी घेतले. त्यांनी विमान उडवण्याचा परवाना मिळवला. १९३२ मध्ये त्यांनी पहिली भारतीय विमान कंपनी सुरू केली आणि स्वतः पहिले प्रवासी विमान उडवले.
टाटांनी टीआयएसएस आणि नंतर टीआयएफआरसारख्या संस्था उभ्या केल्या. यातून त्यांना देशाची एकूण समृद्धी हवी होती. टाटांनी एक मार्ग दाखवला, ज्याचा अवलंब सिप्लाचे संस्थापक के.ए. हमीद यांसारख्या अनेक भारतीय तरुणांनी १९३० च्या दशकात केला.
- साकिब सलीम