भारत-चीन संबंध बळकट करण्यासाठी जयशंकरांचा महत्त्वपूर्ण चीन दौरा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत चीनचे उपाध्यक्ष हॅन झेंग
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत चीनचे उपाध्यक्ष हॅन झेंग

 

"सध्याच्या जागतिक संदर्भातील गुंतागुंतीचा विचार करता भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील खुला संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे," असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. चीन दौऱ्यावर उपाध्यक्ष हॅन झेंग यांच्याशी जयशंकर यांनी चर्चा केली. त्यावेळी जयशंकर यांनी ही भूमिका मांडली आहे. "खुला आणि सातत्यपूर्ण संवाद दोन्ही राष्ट्रांसाठी फायद्याचा ठरेल," असेही जयशंकर म्हणाले.

परराष्ट्रमंत्री जयशंकर दोन देशांच्या दौऱ्याच्य दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात सिंगापूरहून बीजिंगमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी उपाध्यक्ष झेंग यांच्याशी चर्चा केली. जयशंकर हे चीनमधील टियांजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. सन २०२० मध्ये भारत-चीन लष्करामध्ये झालेल्या संघर्षानंतरचा जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे.

जयशंकर म्हणाले, "गेल्या ऑक्टोबरमध्ये काझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाल्यानंतर आपल्यातील द्विपक्षीय संबंध सातत्याने सुधारत आहेत. माझ्या या दौऱ्यामधूनही निश्चित काही सकारात्मक घडणार आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली ही अत्यंत सकारात्मक आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. आपले संबंध सातत्याने सामान्य पातळीवर राहिले, तर त्यातून दोन्ही देशांचा निश्चितच फायदा होऊ शकतो. जागतिक संदर्भाचा विचार केला असता सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होत चालली आहे. प्रमुख अर्थव्यवस्था या नात्याने भारत आणि चीन यांच्यात खुलेपणाने देवाणघेवाण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे."

ते पुढे म्हणाले की, "खुल्या आणि मुक्त वातावरणात भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये संवाद होणे आवश्यक आहे. हा संवाद झाल्यास दोन्ही राष्ट्रांसाठी तो निश्चितच फायद्याचा ठरेल."

'स्पर्धेचे रूपांतर संघर्षात नको'
"सीमावादासह अन्य लष्करी तणावाबाबत तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनने एकत्रितपणे काम करायला हवे. दोन्ही देशांतील संबंध यातूनच सुरळीत होतील, व्यापारातील अडथळेही दोन्ही देशांनी दूर करायला हवेत. स्पर्धेचे रूपांतर संघर्षामध्ये होता कामा नये," असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केले. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचीही जयशंकर यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. परस्परांप्रतीचा आदर, हिताची जपणूक आणि त्या बद्दलची संवेदनशीलता यावरच द्विपक्षीय संबंधांची बांधणी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

एका सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जयशंकर यांनी सांगितले की, त्यांनी उपाध्यक्ष हॅन यांना चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षपदासाठी भारताचा पाठिंबा असल्याचे कळवले आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा झाली आहे, याची त्यांनी नोंद घेतली. माझ्या या दौऱ्यातील चर्चा द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याचे काम करतील. दरम्यान, जयशंकर यांचा हा दौरा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या चिनी बंदर शहर छिंगदाओ येथे संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेनंतर अवघ्या तीन आठवड्यांच्या आत होत आहे. चीन सध्या 'एससीओ'चा अध्यक्ष आहे आणि त्या नात्याने संघटनेच्या विविध बैठका आयोजित करत आहे.