परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी (१२ एप्रिल) संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत पश्चिम आशियातील संकट आणि त्याचे आर्थिक परिणाम यावर चर्चा करण्यात आली.
जयशंकर शनिवारपासून (११ एप्रिल) आखाती देशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. अबुधाबी येथील भेटीनंतर त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा त्यांना दिल्या. तसेच पश्चिम आशियातील संघर्षाच्या काळात भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली."
भारत-यूएई सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केल्याबद्दल अल नाह्यान यांचे आभार मानल्याचेही जयशंकर यांनी सांगितले. या बैठकीत दुबईचे क्राउन प्रिन्स आणि यूएईचे उपपंतप्रधान हमदान बिन मोहम्मद अल मक्तुम हे देखील उपस्थित होते.
"या भेटीदरम्यान हमदान बिन मोहम्मद यांना भेटून आनंद झाला. दुबईतील भारतीय समुदायाचे कल्याण सुनिश्चित केल्याबद्दल आमच्या सरकारची प्रशंसा त्यांच्यापर्यंत पोहोचवली," असे जयशंकर यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये नमूद केले.
शनिवारी (११ एप्रिल) परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांचे यूएईचे समकक्ष अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी संवाद साधला. "आमचे संभाषण प्रादेशिक परिस्थिती आणि त्याचे होणारे परिणाम यावर केंद्रित होते," असे जयशंकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "यूएईमधील भारतीय समुदायाचे कल्याण सुनिश्चित केल्याबद्दल मनापासून आभार मानले. आमची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पुढे जाईल याची मला खात्री आहे."