आज मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अॅपल कंपनीने आपले वेगळे स्थान मिळवले आहे. आता या कंपनीच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे (सीओओ) नाव चर्चेत आहे. ते नाव आहे सबीह खान. भारतीय वंशाचे सबीह खान यांची जगातील आघाडीच्या टेक कंपनी अॅपलच्या सीओओपदी नियुक्ती झाली आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपलने सबीह खान यांना नवे सीओओ म्हणून निवडले आहे.
कंपनीच्या निवेदनानुसार, जेफ विल्यम्स या महिन्याच्या अखेरीस सीओओ पदाची जबाबदारी सबीह खान यांच्याकडे सोपवतील. सबीह खान चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून काम पाहतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कूक यांना आयफोनचे उत्पादन अमेरिकेतच करण्याची विनंती केली होती. मात्र, कूक यांनी ही विनंती नाकारत आयफोन उत्पादन चीनबाहेर वाढवले. याचवेळी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला.
१९६६मध्ये सबीह खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. शालेय शिक्षणादरम्यान ते सिंगापूरला स्थायिक झाले. नंतर ते अमेरिकेत गेले. त्यांनी टफ्ट्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी मिळवली. त्यानंतर रेन्सेलर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. अॅपलमध्ये येण्यापूर्वी सबीह खान जीई प्लॅस्टिक्समध्ये काम करत होते. तिथे त्यांनी अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनीअर आणि तांत्रिक प्रमुख म्हणून भूमिका साकारली.
१९९५ मध्ये सबीह खान अॅपलच्या खरेदी विभागात सामील झाले. हळूहळू त्यांची प्रगती होत गेली. २०१९ मध्ये ते वरिष्ठ उपाध्यक्ष झाले. गेल्या सहा वर्षांत त्यांनी अॅपलची जागतिक पुरवठा साखळी सांभाळली. यात नियोजन, खरेदी, उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन वितरणाचा समावेश होता. गेल्या ३० वर्षांत सबीह यांनी अॅपलमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. कोविड-१९ च्या काळात त्यांनी उत्पादन प्रक्रियेत मोलाची कामगिरी बजावली.
सबीह खान यांची भूमिका आणि जबाबदारी
अॅपलच्या निवेदनानुसार, सबीह खान या महिन्याच्या अखेरीस सीओओ पद स्वीकारतील. जेफ विल्यम्स यांच्या जागी ते येतील. तरीही विल्यम्स काही काळ अॅपलचे सीईओ टिम कूक यांना अहवाल देतील. ते डिझाइन आणि अॅपल वॉच टीमचे निरीक्षण करतील. विल्यम्स यांच्या निवृत्तीनंतर या दोन्ही टीम थेट टिम कूक यांना अहवाल देतील.
टिम कूक काय म्हणाले
अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी सबीह खान यांचे पुरवठा साखळीतील प्रमुख योजकांपैकी एक म्हणून कौतुक केले. कूक म्हणाले, “सबीह खान हे उत्कृष्ट रणनीतीकार आहेत. त्यांनी अमेरिकेत प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा विकास आणि उत्पादन युनिट्सचा विस्तार केला. त्यांनी अॅपलचा कार्बन फूटप्रिंट ६० टक्क्यांहून अधिक कमी केला. ते त्यांच्या मूल्यांमुळे आणि संवेदनशील नेतृत्वामुळे ओळखले जातात. मला विश्वास आहे की ते अपवादात्मक सीओओ ठरतील.”
सबीह खान यांनी कठोर परिश्रमाने जागतिक पातळीवर नाव कमावले. बॅरन्सच्या अहवालानुसार, जेफ विल्यम्स यांना सीओओ म्हणून १ मिलियन डॉलर म्हणजेच ८ कोटी रुपये मानधन मिळत होते. बोनस आणि इतर सुविधांसह त्यांची एकूण कमाई १९१ कोटी रुपये होती. सबीह खान यांचे मानधनही याच पातळीवर असेल, असे मानले जाते. मात्र, अॅपलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सबीह खान यांनी अॅपलच्या ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग उपक्रमाला पुढे नेले. पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी पुरवठादारांसोबत काम केले. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अॅपलला सक्षम बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.