NIA च्या प्रमुखपदी सदानंद दाते

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
सदानंद दाते
सदानंद दाते

 

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय पोलिस सेवेतील १९९०च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या दाते यांनी महाराष्ट्र पोलिस दलात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दाते यांची (ACC) NIA च्या महासंचालक (DG) या पदावर नियुक्तीची तारीख मंजूर केली आहे आणि त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ रोजी त्यांच्या सेवानिवृत्त होईपर्यंत असेल. हा आदेश २६ मार्च रोजी जारी करण्यात आला आहे. ते दिनकर गुप्ता यांची जागा घेतील, जे ३१ मार्च रोजी निवृत्त होणार आहेत.

पीयूष आनंद हे एनडीआरएफचे नवे प्रमुख
पीयूष आनंद राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) नवे प्रमुख असतील. आनंद, उत्तर प्रदेश केडरचे १९९१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) विशेष महासंचालक आहेत. त्यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी एनडीआरएफचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे. आनंद अतुल करवाल यांची जागा घेतील, जे ३१ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. ACC ने केरळ केडरचे १९९५ बॅचचे IPS अधिकारी एस सुरेश यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) मध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

दाते २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर आले होते चर्चेत
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बेशुद्ध होईपर्यंत सदानंद वसंत दाते यांनी दहशतवादी अजमल कसाबचा सामना केला होता. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले '२६/११चा हल्ला माझ्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक घटना आहे. हे आयुष्यभर माझ्यासोबत राहील. मी माझ्या क्षमतेनुसार त्याचा सामना केला आहे', असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र केडरचे अधिकारी दाते या एजन्सीचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील ज्यांना विशेषत: दहशतवादी प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.