अवकाशात जाणारा दुसरा भारतीय म्हणून नावलौकिक कमाविलेले अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे रविवारी येथील विमानतळावर स्वागत करताना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह
अॅक्सिओम-४च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाऊन आलेले अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांचे आज देशाची राजधानी दिल्ली येथे भव्य स्वागत करण्यात आले. शुभांशू आणि त्यांचे सहयोगी प्रशांत बाळकृष्ण नायर यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासह दिल्लीकर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी त्यांच्या हातातील तिरंगा फडकावत आणि ढोलाच्या गजरात शुभांशू यांचे स्वागत केले. यांनीदेखील दिल्लीतील विमानतळावर उपस्थित राहत शुभांशू यांचे स्वागत केले. या भव्य स्वागताबाबत शुभांशू यांनी 'एक्स'च्या माध्यमातून आभार मानले आहेत. "मायदेशी परतल्यावर खरोखरच खूप छान वाटत आहे," असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अॅक्सिओम-४ मोहिमेसाठी सुमारे वर्षभरापासून अमेरिकेत प्रशिक्षण घेत असलेल्या शुभांशू यांची पत्नी कामना आणि त्यांचा मुलगा किआश यांनी देखील विमानतळावर शुभांशू यांचे स्वागत केले. दरम्यान, शुक्ला यांचे भारतात आगमन झाल्यानिमित्ताने लोकसभेमध्ये सोमवारी (ता. १८) स विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींची भेट शक्य
शुभांशू शुक्ला हे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये २२ आणि २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमातही ते सहभागी होणार असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.