मुठ गावामध्ये एकूण ३६ घरे असून त्यांची लोकसंख्या १४४ आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमसे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाने ही कामगिरी अलीकडेच पूर्ण केली. राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा डांगे यांनी मुठ गावाचे कौतुक केले असून, राज्यातील इतर गावांनीही यातून प्रेरणा घेऊन आपली स्व-नोंदणी विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.
निरुपमा डांगे यांनी एका निवेदनात म्हटले की, मुठ गावातील सर्व कुटुंबांनी स्व-नोंदणी प्रक्रियेत अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आणि आपली अचूक माहिती ऑनलाइन पोर्टलवर सादर केली. हे यश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमसे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे साध्य झाले आहे.
तहसीलदार ओंकार ओतारी यांचे सूक्ष्म नियोजन या मोहिमेत महत्त्वपूर्ण ठरले. तसेच नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि सर्व तलाठ्यांच्या अथक परिश्रमामुळे ही मोहीम वेळेत पूर्ण करण्यात आली. प्रशासन आणि नागरिक यांच्यात योग्य समन्वय असल्यास राष्ट्रीय उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य होऊ शकतात, हेच या उदाहरणाने सिद्ध केले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये १ मे पासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्व-नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून ती १५ मे पर्यंत चालणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत घरयादी आणि घरांची गणना (House Listing and Housing Census) केली जाईल. मुठ गावाची ही कामगिरी केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी जनगणनेच्या कार्यात दिशादर्शक ठरली आहे.