आजवर काश्मीरमधून लोकसभेत निवडून गेल्या केवळ तीनच महिला

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 13 d ago
बेगम अकबर जहाँ, मेहबूबा मुफ्ती, राणी पार्वतीदेवी
बेगम अकबर जहाँ, मेहबूबा मुफ्ती, राणी पार्वतीदेवी

 

राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह विविध गटांच्या राजकारणाने जम्मू आणि काश्मीर सतत चर्चेत असते. काँग्रेस, भाजप, नॅशनल कॉन्फरन्स (एनसी), ‘पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी’ (पीडीपी) यांसह अन्य पक्ष राजकारणात समान हक्क आणि प्रतिनिधित्वाची भाषा करीत असले तर वास्तव वेगळेच आहे. येथील राजकीय क्षेत्रात स्त्री-पुरुष असमानता मोठ्या प्रमाणावर दिसते.

राज्यातून १९६७ पासून केवळ तीन महिलांनी संसदेत प्रवेश केला आहे. पाच वेळा या महिला खासदारांनी एकत्रितपणे संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. ज्या तीन महिला खासदार पाच वेळा निवडून आल्या त्यात काश्मीर विभागातून चार वेळा तर एकदाच लडाखमधील महिलेने प्रतिनिधित्व केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जम्मू विभागातून आतापर्यंत एकही महिला संसदेवर निवडून आलेली नाही.

‘एनसी’चे संस्थापक शेख अब्दुल्ला यांच्या पत्नी बेगम अकबर जहाँ या जम्मू-काश्मीरमधील पहिल्या महिला खासदार होत्या. ‘एनसी’चे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री डॉ.फारुख अब्दुल्ला यांच्या त्या आई होत. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे त्यांचे नातू आहेत.

‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या नेतृत्वाखाली त्यांनी १९७७ मध्ये श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर १९८४ मध्ये त्या अनंतनागमधून विजयी झाल्या. बेगम अकबर जहाँ यांच्यानंतर राणी पार्वतीदेवी यांनी १९७७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लडाखमधून विजय मिळविला होता.

जम्मू-काश्‍मीरच्या तिसऱ्या खासदार म्हणजे ‘पीडीपी’च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती. त्या सर्वप्रथम २००४ मध्‍ये आणि नंतर २०१४ मध्ये अनंतनाग राज्यात सध्या सर्वांत प्रभावशाली असलेल्या भाजपने लोकसभेसाठी कधीही महिला उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविलेले नाही.

राज्यात सध्या लोकसभा निवडणूक प्रचार वेगात सुरू झाला आहे. बहुतेक सर्व राजकीय पक्षांचे लक्ष महिला मतदारांवर आहे. पण त्याचवेळी मेहबूबा मुफ्ती यांच्या व्यक्तिरिक्त कोणत्याही पक्षाने महिलेला तिकीट दिलेले नाही.

महिलांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली असली, तरी त्यासाठी ‘दिल्ली दूर’च राहिली. जम्मू आणि काश्मीरमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४२ लाखांहून अधिक महिला मतदार आहेत. राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली असली तरी मतदार संख्या आणि महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व यांच्यातील दरी भरून काढणे गरजेचे आहे,

मेहबूबा मुफ्ती विरुद्ध अल्ताफ
‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून उभ्या आहेत. त्यांचा सामना ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उमेदवार आणि प्रभावशाली गुज्जर नेते मिया महम्मद अल्ताफ यांच्याशी होणार आहे. या दोन प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवारही रिंगणात आहे.

जम्मू-काश्मीरमधील महिला मतदारसंख्‍या (लाखांत)
८६.९३ - एकूण

४२.५८ - महिला