ऑपरेशन महादेव : पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारासह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत 'ऑपरेशन सिंदूर' यावर चर्चा सुरू करताच, सुरक्षा दलांनी काल श्रीनगरजवळच्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून मोठं यश मिळवलं. यात पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा समावेश होता.

लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सुलेमान शाह याची २२ एप्रिलच्या देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार म्हणून ओळख पटली होती. आज सकाळी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये त्याचाही समावेश असल्याची सुरक्षा सूत्रांनी पुष्टी केली आहे. 'ऑपरेशन महादेव' नावाच्या आजच्या मोहिमेत अबू हमजा आणि यासीर या इतर दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आलं. यासीर देखील पहलगाम हल्ल्यातील मारेकऱ्यांपैकी एक असल्याचं मानलं जातं. लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस या सुरक्षा दलांनी आजच्या संयुक्त कारवाईत सहभाग घेतला होता.

सुलेमानने पाकिस्तानी सैन्यात सेवा केली होती आणि त्याला हाशिम मूसा म्हणूनही ओळखलं जात होतं. पहलगामच्या बैसरान व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुलेमानबद्दल माहिती देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर यापूर्वी पोस्ट करण्यात आलं होतं की, सुरक्षा दलांनी लिडवासमध्ये 'ऑपरेशन महादेव' सुरू केलं आहे. "तींन दहशतवाद्यांना भीषण चकमकीत निष्प्रभ करण्यात आले आहे. ऑपरेशन सुरू आहे," असे लष्कराने एका अद्यतनामध्ये सांगितले, आणि हे ऑपरेशन अजून संपलेले नाही असेही त्यात जोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व दहशतवादी "उच्च-मूल्याचे" लक्ष्य होते. अहवालानुसार, सुरक्षा दलांनी गुप्त माहितीवर कारवाई केली आणि हरवानच्या मुलनार परिसरात ऑपरेशन सुरू केले. त्या परिसरात अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे आणि शोधमोहीम सुरू आहे.