'शिक्षा पूर्ण झालेल्या कैद्यांची त्वरित सुटका करा'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 17 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ज्या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली आहे, त्यांची त्वरित सुटका केली जावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्यांच्या गृह सचिवांना दिले आहेत. शिक्षा पूर्ण झालेला कोणता कैदी तुरुंगात बंद तर नाही ना, याची सुनिश्चिती केली जावी, असेही न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने बहुचर्चित नीतिश कटारा हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुखदेव यादव उर्फ पहिलवान याच्याशी संबंधित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सांगितले.

सुखदेव यादव याने कोणतीही सूट प्राप्त न करता २० वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याची सुटका केली जावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. या खटल्याच्या निकालाच्या प्रती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गृह सचिवांना तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांना पाठविल्या जाव्यात. शिक्षा पूर्ण झालेला कोणता कैदी तुरुंगात बंद तर नाही ना, याची सुनिश्चिती या आदेशाद्वारे केली जावी, असे न्यायाधीश नागरत्ना यांनी नमूद केले. 

सुखदेव यादव याचा शिक्षेचा कालावधी नऊ मार्च रोजी संपला होता. त्यानंतर त्याची सुटका केली जाणे अपेक्षित होते, असे ताशेरे खंडपीठाकडून ओढण्यात आले. तीन आठवड्यांसाठी तुरुंगातून बाहेर सोडण्यास परवानगी दिली जावी, असा विनंती अर्ज यादव याने नोव्हेंबर २०१४ मध्ये दाखल केला होता. दिल्ली उच्च
न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळली होती.

१६ फेब्रुवारी २००२ रोजी नीतिश कटारा याची लग्न समारंभातून अपहरण करून निघृण करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील नेते डी. पी. यादव यांची मुलगी भारती हिच्याशी नीतिशचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या करण्यात आली होती. डी. पी. यांचे पुत्र विकास तसेच त्याचा चुलत भाऊ विशाल यांच्यासह सुखदेव यादव यांना हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. विकास आणि विशाल यांना कोणतीही सवलत न देता २५ वर्षांची तर सुखदेव याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.