उत्तरकाशीच्या धरालीत ढगफुटीचा हाहाकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 24 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

उत्तराखंडमध्ये गंगोत्रीच्या मार्गावर असलेल्या धराली गावाजवळ झालेल्या ढगफुटीनंतर मंगळवारी (ता. ५) पूरसदृश स्थिती निर्माण झाली. डोंगराकडून येणाऱ्या गाळ आणि चिखलमिश्रित पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह घरे आणि इमारतींवर आदळला आणि एकच हाहाकार उडाला. या घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, ६० ते ७० जण वाहून गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे गावाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यात दिसत आहे. गंगोत्रीच्या मार्गावर धराली हे एक मुख्य ठिकाण असून, तेथे अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि 'होम स्टे' आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, क्षीरगंगा नदीच्या जलसंधारण क्षेत्रात डोंगराकडील भागांत झालेल्या ढगफुटीनंतर हा विनाशकारी पूर आला. प्राथमिक अहवालानुसार या दुर्घटनेत किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही नागरिक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिली. हरसिल येथून लष्कराची एक तुकडी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. अंदाजे १०-१२ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमध्ये २०-२५ हॉटेल आणि 'होम स्टे' वाहून गेले आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांबाबत संवेदना व्यक्त केली असून, मदतकार्यामध्ये कोणतीही कसूर ठेवली जाणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. "उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे झालेल्या दुर्घटनेचा फटका बसलेल्यांबद्दल संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली बचाव पथके सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत," असे पंतप्रधानांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

सात पथके तैनात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सात बचाव पथके पाठवण्याचे आदेश दिले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही, केंद्र व राज्य सरकार मिळून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करत असल्याचे सांगितले. उत्तराखंडमधील माटली येथे तैनात असलेल्या भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या १२व्या बटालियनमधून १६ सदस्यांचे पथक धराली येथे पोहोचले असून, आणखी एक पथक पाठविण्याचे आदेशही दिले आहेत.