कटरा येथील श्री माता वैष्णो देवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स (SMVDIME) मधील ५० एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे. जम्मू आणि काश्मीर प्रोफेशनल एन्ट्रन्स एक्झामिनेशन बोर्डाने (BOPEE) आपल्या आधीच्या भूमिकेवरून माघार घेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी २४ जानेवारी रोजी विशेष समुपदेशन (Counselling) आयोजित केलंय. या विद्यार्थ्यांना केंद्रशासित प्रदेशातील सात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.
नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) पायाभूत सुविधांमधील त्रुटींचे कारण देत या शैक्षणिक वर्षासाठी वैष्णो देवी इन्स्टिट्यूटची परवानगी रद्द केली होती. यामुळे या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या ५० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, या ५० विद्यार्थ्यांपैकी ४४ विद्यार्थी मुस्लिम असून बहुतांश काश्मीर खोऱ्यातील आहेत. या कॉलेजच्या विद्यार्थी संख्येतील 'डेमोग्राफी'वरून काही उजव्या विचारसरणीच्या गटांनी निदर्शनंही केली होती, ज्या पार्श्वभूमीवर एनएमसीने हा निर्णय घेतला होता.
नव्या निर्णयानुसार, जम्मू-काश्मीर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने ५० अतिरिक्त (Supernumerary) जागा निर्माण केल्या आहेत. यातील २२ जागा काश्मीर खोऱ्यातील महाविद्यालयांमध्ये, तर २८ जागा जम्मू विभागातील महाविद्यालयांमध्ये असतील. जम्मू विभागातील उधमपूर, कठुआ, राजौरी आणि डोडा येथील सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रत्येकी सात जागा वाढवण्यात आल्या आहेत. तर काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला आणि हंदवाडा येथे प्रत्येकी सात आणि अनंतनाग येथील मेडिकल कॉलेजमध्ये आठ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
BOPEE ने सुरुवातीला अशा प्रकारे समुपदेशन करण्यास नकार दिला होता आणि सरकारने स्वतःच्या पातळीवर हे प्रवेश करावेत असे म्हटले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच बोर्डाने आपली भूमिका बदलून नवीन अधिसूचना जारी केली. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व प्रवेश गेल्या सात वर्षांत स्थापन झालेल्या नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दिले जाणार आहेत. श्रीनगर किंवा जम्मू येथील जुन्या आणि प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोणतीही अतिरिक्त जागा निर्माण करण्यात आलेली नाही.