ज्येष्ठ गझलगायक पंकज उधास यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 4 Months ago
गझलगायक पंकज उधास
गझलगायक पंकज उधास

 

आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीसाठी केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये ज्यांची ख्याती होती अशा पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकजींनी आपल्या गायकीनं वेगळी ओळख तयार केली होती. दीर्घ आजारानं त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. ८० च्या दशकांत पंकजींनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते.

पंकज उधास यांच्या कुटूंबियांकडून त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली असून त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ते बऱ्याच दिवसांपासून एका दुर्धर आजाराचा सामना करत होते. आता पद्मश्री पुरस्कार प्राप्त पंकज उधास यांचे निधन झाल्याचे सांगताना आम्हाला कमालीचे दु:ख होत आहे.

या सगळ्यात पंकजची हे नेमक्या कोणत्या आजारानं त्रस्त होते या (bollywood singer pankaj udhas song) विषयीची बातमी समोर आलेली नाही. गझल गायिकीच्या दुनियेतील बेताज बादशहा म्हणून त्यांचे नाव घेतले जायचे. त्यांच्या निधनानंतर भारताच्या गझल गायकी विश्वात मोठी शोककळा पसरल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये पंकजींचे चाहते होते. त्यांना जगभरातील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

पंकजींना त्यांच्या चिठ्ठी आयी है नावाच्या गझल पासून मोठी (padmashri pankaj udhas) लोकप्रियता मिळाली होती. १९८६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नाम मधील त्या गझलनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. इतक्या वर्षांनी देखील ती गझल कमालीची लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर दिल्लगी, फिर तेरी कहानी याद आई, चले तो कट ही जाएगहा आणि तेरे बिन नावाच्या गझलला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली होती.

पंकज उधास यांच्या गझल गायकीची दाखल घेत, २००६ साली भारत सरकारने त्यांना भारतातील चौथा प्रतिष्ठित पुरस्कार पद्मश्री ने गौरविण्यात आले होते. 

जेष्ठ गायिका साधना सरगम यांनी पंकज उधास यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, "गझलच्या दुनियेत पंकजजींनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्यापूर्वीही या क्षेत्रात अनेक मोठमोठे कलाकार होते; पण त्यातही पंकज यांनी स्वतःचे सुंदर विश्व निर्माण केले होते. त्यांचा आवाज एक वेल्वेट व्हॉईस म्हणतात तसाच होता. माझे त्यांच्यासोबतच 'मोहरा' चित्रपटातील 'ना कजरे की धार, ना मोतियों के हार' हे गाणे खूप गाजले. पंकजजी म्हणजे अत्यंत सभ्य आणि सुसज्जन व्यक्तिमत्त्व होत. खूपच सरळ आणि हृदयाला भिडेल, अशी त्यांची गायकी होती. त्यातही होईल तेवढे शायरी लोकांपर्यंत कशी पोहोचेल, यासाठी ते प्रयत्नशील असायचे. त्यांच्या निधनानंतर भारतातील गझल गायनात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून काढणे सोपे नाही."
 
गायक आणि संगीतकार अनुप जलोटा यांनीही त्यांची आठवण काढत म्हणाले, "मला पाच-सहा महिन्यांपूर्वीच पंकजजींची तब्येत ठीक नसल्याचे ठाऊक होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो काही झाला नाही. पंकजजींच्या रूपात लोकांनी एक महान गझल गायक गमावला आणि मी माझा एक सगळ्यात चांगला मित्र गमावला आहे. पंकजजी, तलतजी आणि माझी खूप चांगली मैत्री होती. आम्ही तिघेही प्रत्येक विषयावर चर्चा करायचो, गप्पा मारायचो, तसेच आम्ही तिघांनी एकत्र अनेक शोजदेखील केले आहेत. गझलच्या दुनियेत पंकजजींचे खूप मोठे योगदान आहे. ते आता आपल्यात नाहीत, याचे मला फार दुःख आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."

के घुंगरू टूट गये
गझल गायिकेमध्ये पंकज उधास यांचे नाव अग्रस्थानी आहे. 'चिठ्ठी आयी है' या गीताने त्यांना खऱ्या अर्थान बॉलीवूडमध्ये एन्ट्रीचा 'संदेसा' आणला असला तरी 'ऐ गम ए जिंदगी, कुछ तो दे मशवरा, इक तरफ उसका घर, इक तरफ मयकदा...' यासारख्या गझलमुळे पंकज उधास यांनी प्रत्येक भारतीयाच्या काळजाला हात घातला. त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य उलगडताना 'गझलनवाज' भीमराव पांचाळे म्हणतात, पंकज उधास कायम सर्वसामान्य रसिकांच्या गळी उतरले, मनात बसेल अशा सोप्या शब्दांतील गझल त्यांनी निवडल्या. त्यामुळे त्यांचा आवाज आणि गझल शेवटच्या रसिकापर्यंत पोहोचल्या.

भीमराव पांचाळे सांगतात की, पंकज उधास यांना तलम आणि मखमली आवाजाची देणगी लाभली होती. या आवाजाला 'महंगी बहोत है शराब, के थोडी थोडी पीया करो' या शब्दांची साथ लाभल्याने ऐकणाऱ्याला आपोआप खूमार चढू लागतो. शायर जफर गोरखपुरी यांनी त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या 'ऐ गम ए जिंदगी, कुछ तो दे मशवरा, इक तरफ उसका घर एक तरफ मयकदा' शब्दांना अर्थ देण्याचे काम पंकज उधास यांच्या चालीने केले.

'चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तूही धनवान है गोरी', या गझलमध्ये आपल्या प्रेयसीचे असे वर्णन आजपर्यंत शायदच कुणी केले असेल. यासोबत 'महंगी बहोत है शराब, के थोडी थोडी पीया करो', असे सांगत त्यांनी आपल्या चाहत्यांना सावधही केले. सबको मालूम है, मैं शराबी नही, फिर भी पिलाये तो मैं क्या करू, ना समझो पीगये पिते पिते... थोडासा गम जिगये पिते पिते, शराब चिज ही ऐसी है, न छोडी जाये... ये मेरे यार के जैसी है, चुमकर मदभरी आखोंसे गुलाबी कागज, उसने भेजा है मेरे नाम शराबी कागज...

पंकज उधास यांचे समकालीन गायक तलज अजिज हे दोघेही घट्ट मित्र. आपला मित्र गेल्यानंतर एक आठवण सांगताना तलत अजिज म्हणाले, एका कॉन्सर्टमध्ये आम्ही दोघेही 'मोहे आयी ना जग से लाज... मैं जोर से नाची आज...' हे गाणे गायले, मात्र पंकज उधास यांच्या जाण्यामुळे आज खऱ्या अथनि घुंगरू टूट गये...!