हिंदू परंपरा आणि काश्मीरी लोककथांनुसार, दक्षिण काश्मीरच्या बर्फाच्छादित हिमालयात भगवान शंकराची गुहा १८५० मध्ये स्थानिक पसमांदा गुरेजर मेंढपाळ बुता मलिक यांनी शोधली. त्यांनी यात्रेकरूंसाठी गुहेपर्यंत जाणारी पहिली पायवाट बनवली.
जगभरातील हिंदूंची वार्षिक अमरनाथ तीर्थयात्रेला २ जुलैपासून यात्रा सुरू झाली. भाविकांची पहिली तुकडी पहलगामला पोहोचली. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाविकांचे उत्साहात स्वागत केले.
लोककथा काय सांगते
एके दिवशी बुता मलिक डोंगरावर आपली जनावरे चारत होते. तेव्हा एक साधू आला आणि त्याने कोळशाची पिशवी त्यांना दिली. मलिक घरी गेले. पिशवी उघडली तेव्हा त्यात सोनं सापडलं. ते साधूचे आभार मानायला परत गेले. तिथे त्यांना गुहा आणि बर्फाचे शिवलिंग दिसले. आज तीच अमरनाथ गुहा आहे. लाखो भाविक तिथे नैसर्गिक बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला येतात.
पासमांदा मुस्लिम आणि हिंदूंचे पूर्वज एकच आहेत. त्यांची संस्कृती जवळपास सारखी आहे, त्यांचा वारसा एक आहे. त्यांचा डीएनए आणि वंश एकच आहे. पासमांदाला या पवित्र स्थळाचा शोध लावण्याचा मान मिळाला. भगवान शंकराचा आशीर्वाद त्यांना मिळाला. अमरनाथ गुहेचा शोध पासमांदा आणि हिंदूंच्या गहिर्या नात्याचे दर्शन घडवतो. ही कथा मध्ययुगातली नाही, तर आधुनिक काळातली आहे. त्यामुळे ती अधिक विश्वासार्ह मानली जाते.
हिंदूंसाठी अमरनाथ ही प्राचीन तीर्थयात्रांपैकी एक आहे. भृगु पुराण नावाच्या प्राचीन ग्रंथानुसार, भगवान शंकराचे हे स्थान सर्वप्रथम महर्षी भृगु यांनी शोधले. त्यांचा आश्रम उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यात आहे. मी स्वतः त्या भागातला आहे, याचा मला अभिमान आहे.
महर्षी भृगु हिमालयाकडे जात होते. तेव्हा त्यांचे लक्ष अमरनाथ गुहेवर पडले. त्यांनी सर्वप्रथम अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. तेव्हापासून लोक भगवान शंकराचे दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला अमरनाथ गुहेला येऊ लागले.
काश्मीर खोरे पाण्याखाली होते. ते आधी सरोवर असल्याचे भूवैज्ञानिक अभ्यास सिद्ध करतात. ऋषी कश्यप यांनी डोंगराला छिद्र पाडून नद्या आणि ओढ्यांद्वारे पाणी काढले. त्यामुळे काश्मीर खोरे त्यांच्या नावाने ओळखले गेले.
अमरनाथ गुहेबद्दल काही तथ्यं
बुता मलिक यांचे वंशज अमरनाथच्या बटकोट गावात राहतात. या गावाचे नाव बुता मलिक यांच्यावरून बटकोट पडले. अमरनाथ यात्रेदरम्यान, श्रावण महिन्यात मलिक यांचे वंशज मांस खात नाहीत. त्यांच्या कुटुंबात ही श्रद्धा आहे की, या पवित्र काळात मांस खाणे पाप आहे. कारण त्यांचे अमरनाथ यात्रेशी थेट नाते आहे.
अमरनाथला तीन प्रकारचे लोक राहतात. त्यामध्ये काश्मिरी पंडित, मलिक कुटुंब आणि महंत. हे तिन्ही मिळून छडी मुबारकचा विधी पूर्ण करायचे. काही हिंदू भाविकांच्या मते, मलिक यांच्या वंशजांच्या घरी भेट न दिल्यास यात्रा अपूर्ण राहते.
बटकोटच्या ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर दौऱ्यावर मलिक कुटुंबाला भेट दिली होती. पण हळूहळू या कुटुंबाचे महत्त्व कमी झाले. फारूक अब्दुल्ला सरकारच्या काळात त्यांची यात्रेतील भूमिका मर्यादित झाली.
अमरनाथ गुहेचा शोध पासमांदा आणि हिंदूंच्या सौहार्दाचे वास्तव दाखवतो. जम्मू-काश्मीरमधील लोकप्रिय कथेनुसार, बुता मलिक यांचे वंशज या मंदिराचे रक्षक होते. याशिवाय दशनामी आखाडा आणि पुरोहित सभा मट्टण यांच्याकडेही या पवित्र स्थळाची देखभाल करण्याची जबाबदारी होती.
२००० मध्ये अमरनाथ श्राईन बोर्डाची स्थापना झाली. मंदिराच्या व्यवहारांची जबाबदारी आता राज्याच्या राज्यपालांकडे आहे. बुता मलिक यांचे वंशज आजही या पवित्र गुहेशी भावनिक आणि आध्यात्मिकरित्या जोडलेले आहेत. परंतु मंदिराच्या कोणत्याच व्यवहारात त्यांचा सहभाग नाही.
- फैयाज अहमद फैजी
(लेखक एक डॉक्टर आणि पसमांदा कार्यकर्ते आहेत.)