दुभंगलेल्या जगाला भारत देणार शांततेचा मंत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पल्लब भट्टाचार्य

येत्या १ ते ७ फेब्रुवारी २०२६ या काळात जगभरात 'जागतिक आंतरधर्मीय सलोखा सप्ताह' साजरा केला जाणार आहे. विविध धर्म आणि राष्ट्रांमध्ये ऐक्याची भावना जागवणारी ही एक महत्त्वाची परंपरा आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी २०१० मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता, ज्याला २० ऑक्टोबर रोजी अधिकृत मान्यता मिळाली. 'शांततेच्या संस्कृती'साठी परस्पर सामंजस्य आणि संवाद किती आवश्यक आहे, हे या ठरावाद्वारे जगाला सांगण्यात आले. 'देवावर प्रेम आणि शेजाऱ्यावर प्रेम' किंवा 'चांगुलपणावर प्रेम आणि शेजाऱ्यावर प्रेम' या उदात्त तत्त्वावर आधारित ही चळवळ २०११ पासून जगभरात करुणा आणि सहअस्तित्वाचा संदेश देत आहे.

२०२५ मध्ये दिल्लीत झालेला या सप्ताहाचा सोहळा भारताच्या बहुविध संस्कृतीचे दर्शन घडवणारा ठरला. 'ग्लोबल पीस फाऊंडेशन' (GPF) इंडियाने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय परिषदेत भारताच्या प्राचीन 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच 'जग हे एक कुटुंब आहे' या विचाराचा आणि आधुनिक शांतता मार्गाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. हिंदू, बौद्ध, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शीख आणि पारशी अशा विविध धर्मांचे नेते एका दुभंगलेल्या जगात धर्माची जोडणारी भूमिका मांडण्यासाठी एकत्र आले होते.

परिषदेच्या सुरुवातीला डॉ. मार्कंडेय राय यांनी सीमांपलीकडे जाणाऱ्या भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा उल्लेख केला. तर गोस्वामी सुशील जी महाराज यांनी १८९३ मधील स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणाची आठवण करून दिली, जो आजही सलोख्याचा एक मार्गदर्शक संदेश आहे. भिक्खू संघसेना, फादर राजकुमार जोसेफ, इमाम फैझान मुनीर आणि स्वामी सर्वलोकानंद यांसारख्या मान्यवरांनी सत्य, सेवा आणि करुणा या सामायिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

दिल्लीतील या सोहळ्याचे सर्वात मोठे यश म्हणजे यात तरुणांचा असलेला सक्रिय सहभाग. 'आर्ट फॉर हार्मोनी' या स्पर्धेच्या माध्यमातून युवा कलाकारांनी शांततेची चित्रे रेखाटली. तसेच 'आंतरधर्मीय संवादाची कौशल्ये' या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना एकमेकांच्या धर्माचा आदर कसा करावा, याचे प्रशिक्षण मिळाले. तरुणांनी पुढाकार घेऊन केलेल्या चर्चासत्रातून हे स्पष्ट झाले की, जेव्हा संवाद कृतीशी जोडला जातो, तेव्हाच समाजात सकारात्मक बदल घडतो.

आज जगभरात आंतरधर्मीय संवाद हे शांततेचे एक प्रभावी साधन बनले आहे. युनेस्कोच्या कार्यक्रमांपासून ते इंडोनेशियातील 'फोरम केरु कुनान' किंवा ब्रिटनमधील 'इंटर फेथ नेटवर्क'पर्यंत अनेक उदाहरणे हेच सांगतात की, धार्मिक परंपरा सामाजिक विश्वास वाढवण्यासाठी मदत करू शकतात.

या जागतिक मोहिमेत भारताचे स्थान अत्यंत वेगळे आणि महत्त्वाचे आहे. भारताचा इतिहास हा सर्वसमावेशकतेने भरलेला आहे—मग ती सम्राट अशोकाची सहिष्णुता असो, अकबराचा 'दिन-ए-इलाही', गुरुनानक यांची वैश्विकता असो वा महात्मा गांधींच्या सर्वधर्मीय प्रार्थना. ध्रुवीकरणाच्या या काळात भारताने जपलेले बंधुत्वाचे मूल्य हाच जगासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे. सलोखा म्हणजे केवळ एकमेकांना सहन करणे नव्हे, तर शिक्षण, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणासाठी सर्वांनी मिळून काम करणे होय.

सध्या तरुणांना शांततेचे प्रमुख दूत मानले जात आहे. अभ्यासानुसार, बालवयातच विविध धर्मांचा परिचय झाल्यास मुलांमधील पूर्वग्रह कमी होतात आणि सहानुभूती वाढते. 'ग्लोबल पीस फाऊंडेशन'ने सुरू केलेले 'युथ पीस क्लब' याच विचारावर काम करत आहेत.

२०२६ चा सलोखा सप्ताह जसजसा जवळ येत आहे, तसतसे हे पुन्हा जाणवतेय की, सामायिक मूल्यांवर आधारित संवादच जगातील दुरावलेला सांधू शकतो. जी-२० परिषदेच्या 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या घोषवाक्याने भारताच्या 'वसुधैव कुटुंबकम' या विचाराला जागतिक स्तरावर नवे परिमाण दिले आहे.

१ ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान जेव्हा पुन्हा एकदा मंदिरे, मस्जिद, चर्च, गुरुद्वार आणि विहारांची दारे मैत्रीसाठी उघडली जातील, तेव्हा शांततेची ही मशाल अधिक प्रज्वलित होईल. कलेच्या आणि सेवेच्या माध्यमातून हे पुन्हा सिद्ध होईल की, शांततेची सुरुवात खऱ्या अर्थाने एकमेकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या हृदयापासून होते. श्रद्धा आणि विश्वासाचे हे दिवे आपल्याला सांगत राहतील की, भेदांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे हीच काळाची गरज आहे.

ज्या काळात जग सहानुभूती गमावून बसले आहे, तिथे भारताचे उदाहरण एका नैतिक होकायंत्रासारखे काम करते. सलोखा हे केवळ स्वप्न नसून तो एक दैनंदिन सराव आहे. जेव्हा आपण चांगुलपणाच्या मार्गावर चालतो, तेव्हा संपूर्ण मानवता खरोखरच एक कुटुंब बनते.

(लेखक आसामचे माजी पोलीस महासंचालक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter