जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) शुक्रवारी (३० जानेवारी ) पुन्हा एकदा ड्रोन घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. भारतीय हद्दीत प्रवेश करणाऱ्या या ड्रोनना भारतीय लष्कराने वेळीच रोखले. सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या सतर्क जवानांनी आकाशात संशयास्पद हालचाल टिपली आणि तात्काळ कारवाई केली. जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार सुरू करताच हे ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने परत पळून गेले.
शुक्रवारी नियंत्रण रेषेच्या विविध ठिकाणी ड्रोनचा वावर दिसून आला. शत्रूचे ड्रोन भारतीय हद्दीत शिरकाव करण्याच्या तयारीत असतानाच भारतीय लष्कराने त्यांना आव्हान दिले. जवानांनी या ड्रोनवर अनेक राउंड फायर केले. लष्कराचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तानी ड्रोनने माघार घेतली आणि ते पुन्हा सीमा ओलांडून परत गेले.
या घटनेनंतर लष्कराने आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. ड्रोनद्वारे या भागात शस्रे किंवा अमली पदार्थ टाकले गेले आहेत का, याची कसून तपासणी करण्यात येत आहे. घनदाट जंगलात आणि दुर्गम भागात हे सर्च ऑपरेशन सुरू आहे.
गेल्या काही काळापासून पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर करून शस्रे आणि ड्रग्ज पाठवण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, भारतीय सुरक्षा दले अत्यंत सतर्क असून त्यांनी अशा अनेक प्रयत्नांना यापूर्वीही हाणून पाडले आहे. सीमेवरील या वाढत्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे.