भारतात ९०० रुपयांत ट्विटर ब्‍लूची सेवा

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
twitter blue tick
twitter blue tick

 

 
वॉशिंग्टन: ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साइटने भारतात त्यांच्या सेवेच्या ब्लू टीक पडताळणीसाठी तब्बल ९०० रुपये महिना शुल्क आकारण्यात येणार आहे. भारताबरोबरच जगातील १५ देशांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, जपान, ब्रिटन आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे.
 
जगातील अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर डिसेंबरपासून ब्लू टीक सशुल्क करण्यात आले होते. यात अँड्रॉइडचा वापर करणाऱ्यांसाठी आठ डॉलर आणि आय फोनसाठी ११ डॉलर प्रती महिना शुल्क आकारण्यास सुरुवात झाली होती. ट्विटरने संस्थांसाठी ‘ट्विटर व्हेरिफिकेशन’ अशी सेवाही सुरू केलेली आहे. याद्वारे अधिकृत व्यावसायिक खात्यांवर सोनेरी रंगातील खूण जोडली जाते.
 
भारतातील ट्विटर ब्लूचे शुल्क
- मोबाईलवरील सेवेसाठी ९०० रुपये प्रति महिना (अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रणालींसाठी)
- ट्विटर वेबरील सेवेसाठी ६५० रुपये प्रति महिना
- बेववरील वापरकर्त्यांसाठी वार्षिक शुल्क योजनाही सादर करणार आहे यासाठी सहा हजार ८०० रुपये आकारण्यात येईल
 
ट्विटर ब्लूच्या सेवा
- अमेरिकेत सबस्क्राइबरला चार हजार अक्षरांपर्यंत प्रदीर्घ ट्विट करण्याची परवानगी
- ट्विटर ब्लू सबस्क्राइबरला होम टाइमलाइनवर जाहिराती दिसण्याचे प्रमाण निम्म्याने कमी होणार
- निळ्या खुणेसह कस्टम ॲप आयकॉन, कस्टम नेव्हिगेशन, स्पेसेस टॅबची सुविधा, एनएफटी प्रोफाइल पिक्चर, थिम, अमर्यादित बुकमार्क, ट्विट अनडू करणे, मोठा व्हिडिओ अपलोड करणे आदी सोयी मिळणार
 
ट्विटर ब्लू सेवा यांना मिळणार
- नवे अकाउंट सुरू करून ९० दिवसांचा कालावधी झालेल्यांना ही सेवा मिळणार
- जे ट्विटर ब्लू आधीपासून वापरत आहेत, त्यांनी ‘साइन’ करण्यासाठी फोन क्रमांक खात्री करणे आवश्‍यक