वारसा स्थळांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील सर्वच स्थळे औरंगाबादमधील

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Shahaganj
Shahaganj

 

निजामाचा राजवाडा, शहागंज मशीद, मस्जिद ए चौक (सिटी चौक), किले अर्क शाही मस्जिद, दाऊजी बोहरा मुसाफिर खाना यांसारख्या ३१ स्थळांचा समावेश.

‘बांधलेल्या वारसा स्थळां’च्या यादीत महाराष्ट्रातील ३१ स्थळांचा समावेश करण्यात आला असून ही सर्वच स्थळे औरंगाबादेतील आहेत. प्रत्येक ऐतिहासिक वास्तू निर्मिती कलेचा, त्या काळातील संस्कृती व जीवन पद्धतीचा नमुना असते. अशाच बांधलेल्या वारसा स्थळांचे नोंदणीकरण, व्यवस्थापन व संवर्धन कार्य ‘स्मारके आणि पुरातन वास्तूंसाठी राष्ट्रीय अभियान’ (एनएमएमए) अंतर्गत केले जाते.
 
‘एनएमएमए’अंतर्गत ‘बांधलेल्या वारसा स्थळां’च्या यादीत औरंगाबादेतील नोंद झालेल्या स्थळांमध्ये सलीम अली सरोवर, गुलशन महल, निजामाचा राजवाडा, टाऊन हॉल, पाणचक्की, वाडे, ऐतिहासिक दरवाजांसह धार्मिक स्थळांचा समावेश आहे. देशातील पुरातन ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा स्थळांचे चांगले व्यवस्थापन व्हावे. त्यांचा प्रचार-प्रसार व्हावा, त्यांच्या नोंदी तयार व्हाव्यात, संवर्धनाबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण व्हावी, नियोजनकर्ते तसेच संशोधकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून २००७ पासून ‘स्मारके आणि पुरातन वास्तूंसाठी राष्ट्रीय अभियान’ सुरू करण्यात आले. याअंतर्गत देशभरातील ११ हजार ४०६ स्थळांचा ‘बांधलेल्या वारसा स्थळांत’ समावेश करण्यात आला आहे. यापैकी महाराष्ट्रातील ३१ स्थळे अंतिम झाली आहेत. ही सर्व स्थळे औरंगाबादेतील आहेत. देशातील सर्वाधिक बांधलेली वारसा स्थळे राजस्थानातील असून त्यांची संख्या दोन हजार १६० आहे.
 
‘एनएमएमए’ अंतर्गत देशभरात विविध उपक्रम राबविण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण ही नोडल एजन्सी (समन्वयक) आहे. ‘एनएमएमए’साठी तीन सदस्यीय राष्ट्रीय संनियंत्रण समिती आहे. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू-स्थळांची निकषानुसार निवड केली जाते. वास्तूचे सौंदर्य, इतिहास आणि पुरातत्त्वीय महत्त्व यासाठी लक्षात घेतले जाते.
 
राज्यनिहाय स्थळे
महाराष्ट्र (३१), आंध्र प्रदेश (१७८८), बिहार(२०), छत्तीसगड (६०), दिल्ली (८७२), गुजरात (४६), हरियाना (१), हिमाचल प्रदेश (२८०), जम्मू-काश्मीर (२९२), कर्नाटक (३१२), केरळ (१७४), मध्य प्रदेश (७४९), ओरिसा (२०१५), पंजाब (६८७), राजस्थान (२१६०), तमिळनाडू (९२२), तेलंगण (६२९), त्रिपुरा (४), उत्तर प्रदेश (२२८), पश्चिम बंगाल (१३५).

औरंगाबादेतील या स्थळांचा समावेश
पाणचक्की, रंगीन दरवाजा, गुलशन महल, निजामाचा राजवाडा, टाऊन हॉल, सलीम अली सरोवर, खादी भंडार, थत्ते हौद, दिल्ली गेट, मल्टीपर्पज हायस्कूल, किले अर्क दरवाजा, मेहता वाडा, तापडीया वाडा, गुजराती वाडा, कापडिया वाडा, श्रॉफ वाडा, जुन्या शहराच्या सभोवती असलेली संरक्षण भिंत, उदासीन का डेरा, शहागंज मशीद, मस्जिद ए चौक (सिटी चौक), किले अर्क शाही मस्जिद, दाऊजी बोहरा मुसाफिर खाना, भडकल गेट, काला दरवाजा, नौबत दरवाजा यासह विविध निवासी वास्तूंचा समावेश बांधलेल्या वारसा स्थळांत आहे.