आता अकरा राज्यांत मिळणार इथेनॉल मिश्रित पेट्रोल

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
modi e 20
modi e 20

 

बंगळूरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते योजनेला प्रारंभ
 
पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आज एक पाऊल पुढे टाकतानाच अकरा राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांतील निवडक पंपांवर २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल (ई-२०) विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या योजनेला प्रारंभ झाला. प्रदूषण रोखणे, आयातीवरचा खर्च कमी करणे आणि जैव इंधनावर भर अशी उद्दिष्टे यातून साध्य केली जाणार आहेत. आजघडीला दहा टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलची विक्री होते.
 
मोदी यावेळी म्हणाले,‘‘ आधी दीड टक्क्यांनी याची सुरुवात झाली. आता २० टक्क्यांकडे पाऊल पडले आहे. पहिल्या टप्प्यात १५ निवडक शहरांमधून याचे वितरण होईल. येत्या दोन वर्षांत देशभरात सर्वत्र ते वापरण्यात येईल.’’ एकविसाव्या शतकात जगाचे भविष्य ठरविण्यात ऊर्जा क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. भारत ऊर्जेच्या नवीन स्रोतांचा विकास आणि संक्रमणामध्ये सर्वांत मजबूत आवाज बनला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. नेलमंगलजवळील इंटरनॅशनल मटेरिअल एक्झिबिशन सेंटर येथे ‘इंडिया एनर्जी वीक-२०२३’ चे उद्‍घाटन केल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी सिलिकॉन सिटी बंगळूरचे कौतुक केले.
 
त्या चार पैलूंवर लक्ष
मोदी म्हणाले, ‘‘भारताच्या विकासाचे चार मुख्य स्तंभ आहेत. देशांतर्गत उत्पादनात वाढ, पुरवठ्यात विविधता, जैवइंधन, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन वाहनांच्या वापरावर भर. भारत या चार पैलूंबाबत वेगाने काम करत आहे. पेट्रोलियम रिफायनरीचे तंत्रज्ञान भारत अपग्रेड करत आहे. येथे स्टार्टअपसाठी अधिक प्रोत्साहन दिले जात आहे.’’
 
ई २० इंधन

ई २० इंधन वास्तवात जैव इंधन आणि जीवाश्म इंधन यांचे प्रायोगिक मिश्रण असते. यात इथेनाॅल आणि गॅसोलीनच्या मिश्रणाने प्राप्त केले जाते. यामध्ये  २० टक्के इथेनाॅल आणि ८० टक्के गॅसोलीन असते. गॅसोलीनमध्ये सर्वसामान्य भाषेत पेट्रोल म्हटले जाते. जे खनिज तेलातून मिळवले जाते. इथेनाॅलला एक जैव अथवा हरित इंधन असेही म्हणतात.