मुस्लिम प्रबोधन चळवळीची साडेपाच दशके

Story by  test | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई

 

"भारतातील मुस्लिम संस्कृतीने मला घडविले आहे. ह्या संस्कृतीने ज्या चांगल्या गोष्टी निर्माण केल्या त्याचा मला अभिमान आहे आणि ज्या विद्रुप गोष्टी तीत आहेत त्या बदलल्या पाहिजेत."

- हमीद दलवाई, संस्थापक, मुस्लिम सत्यशोधक मंडळ


मुस्लिमांमधील समाज सुधारणांना चालना देतानाच भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचा पुरस्कार आणि जागर करणाऱ्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या कार्याविषयी.

- डॉ. शमसुद्दिन तांबोळी, अध्यक्ष,मुस्लिम सत्यशोधक मंडळ


धर्मसुधारणेच्या संदर्भात सर सय्यद अहमद खान यांचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत. ही परंपरा नंतर सय्यद अमिन, असफ ए फैजी, ते असगर अली इंजिनिअर यांनी पुढे नेली. मा. एम आर ए बेग, बॅरिस्टर एम सी छगला, साहित्यिक इस्मत चुगताई यांच्यासारख्या बुद्धिप्रामाण्य विचारवंतांनी धर्मापलिकडे जाऊन विचार करण्याची एक परंपरा मांडली. परंतु त्याचे स्वरूप व्यक्ती पातळीवरील होते.

 

हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखालील १८ एप्रिल, १९६६चा सात मुस्लिम महिलांचा मोर्चा ही भारतातील मुस्लिम समाजप्रबोधनाची सुरुवात म्हणता येईल. त्या मोर्चाद्वारे हमीद दलवाई यांनी मुस्लिम महिलांच्या विविधांगी  वेदना सर्वप्रथम मुस्लिम जगतात मांडल्या. धर्मवादी राजकारणाची तर्कशुद्ध चिकित्सा करणाऱ्या हमीद दलवाईंची अल्पावधीतच तरुण तडफदार सेक्युलॅरिस्ट अशी प्रतिमा निर्माण झाली. ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’च्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता, समता, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, बुद्धिप्रामाण्य आणि आधुनिकता या विषयावर कामास सुरुवात झाली. मात्र ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ला हा प्रभाव मुस्लिम समाजावर  पाडण्यात  फारसे यश आले नाही. या संस्थेचे वैचारिक योगदान वादातीत आहे. मात्र यातून एक वर्ग निर्माण झाला. तथापि मास मुव्हमेंटमध्ये रूपांतर करण्यात मर्यादा आल्या. इंडियन सेक्युलर सोसायटीचा प्रभाव मुस्लिम समाजावर पडला पाहिजे आणि मुस्लिम समाजात आधुनिकतेचा स्वीकार झाला पाहिजे असे हमीद दलवाई यांना सातत्याने वाटत होते.

 

मुस्लिम धर्मांधतेतून निर्माण होणाऱ्या मुस्लिम महिलांच्या समस्या, लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न, मद्रसा आणि उर्दू शिक्षणाच्या मर्यादा, मराठी भाषेबद्दल दुस्वास आणि उदासीनता, विविध प्रकारच्या कालबाह्य परंपरा आणि आधुनिकतेबद्दल प्रदूषित मानसिकता अशा विषयांवर काम करण्यासाठी दलवाईंनी २२ मार्च, १९७० रोजी ‘मुस्लिम सत्यशोधक’ची स्थापना केली.

 

मंडळाच्या  स्थापनेनंतर समाजप्रबोधनासाठी दलवाईंना जेमतेम सात वर्षांचे आयुष्य मिळाले. यातील दोन वर्षे तर मूत्रपिंडाच्या आजाराशी संघर्ष करण्यात हॉस्पिटलमध्ये गेले. ३ मे, १९७७ रोजी त्यांचे याच विकाराने निधन झाले. तेंव्हा  तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयींचा दलवाईंच्या निधनानंतरचा शोकसंदेश आज जास्त प्रासंगिक वाटतो. वाजपेयी म्हणाले होते "Hindus too needed Dalwai."

 

स्वातंत्र्यानंतरचा समाज संविधानात्मक मूल्यांवर उभे करताना धर्मवादी कोणते आव्हाने उभे करु शकतात हे उमजण्याची दूरदृष्टी दलवाईकडे होती. हमीदभाईंनी मार्गदर्शक तत्त्वांत उल्लेखलेल्या समान नागरी कायद्याचा आग्रह वारंवार केला. त्यासाठी आंदोलन उभे केले, मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवेदने दिली, मात्र नंतरच्या काळात धर्मवादी राजकारण करणाऱ्यांनी हा प्रश्न हिंदू विरुद्ध मुस्लिम चष्यातून पाहिला. वास्तविक सर्वसमाजाच्या कल्याणाचा, धर्मनिरपेक्षतेच्या बांधिलकीचा, विषमता आणि पुरुषप्रधानतेचा प्रभाव कमी करणारा आणि प्रामुख्याने धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे! इस्लामचा अविभाज्य भाग नसणारा तोंडी एकतर्फी तलाक, अजानच्या आवाजाची तीव्रता, हिजाब - बुरखा असे केवळ अस्मितेचे  विषय सोडवताना जेंव्हा नाकीनऊ येते, तेव्हा समान नागरी कायदा हा विषय किती कठीण आहे याची कल्पना येते. अलिकडे हेच मुद्दे धृवीकरणाचे केल्या जात आहेत. धर्मस्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती, समानता या संविधानात्मक मूल्यांचे योग्य आकलन समाजास झालेले नाही हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहेत.

 

‘भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान’ हे ब्रीद घेऊन ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ कार्यरत आहे. महिलांच्या प्रश्नावर सत्यशोधक फातिमाबी शेख महिला मंच काम करीत आहे. मुस्लिम महिला आधिकाराशी निगडित लोकशिक्षण, जाणीव जागृती बरोबरच, मुस्लिम महिला मदत केंद्रामार्फत समुपदेशन, कायदा सल्ला आणि सहकार्य केल्या जाते.

 

मुस्लिम समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. अशा अंधश्रद्धांचे  निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विकसन करण्यासाठी  तिमिरभेद मंच स्थापन केला आहे. गेल्या तेरा बारा वर्षांपासून बकरी ईद तथा ईद उल अज़हा निमित्त राज्यस्तरीय  रक्तदान अभियान सप्ताह आयोजित करण्यात येत असते. आता या उपक्रमाला राष्ट्रीय स्वरूप येत आहे. मागील वर्षी दिल्ली आणि अंध प्रदेशात हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

 

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि  कार्यकर्त्यांसाठी हमीद दलवाई स्टडी सर्कल मार्फत प्रशिक्षण, संविधान कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. तसेच ग्रंथालयाची सुरूवात करण्यात आली आहे. सत्यशोधक युवा मंच हा तरुणांशी,महाविद्यालयीन विध्यार्थ्यांशी संवाद करून त्यांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाशी जोडण्याचा प्रयत्न करते. तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे मुखपत्र म्हणून मुस्लिम सत्यशोधक पत्रिका हे त्रैमासिक नियमितपणे प्रकाशित करण्यात येते.

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही समाजप्रबोधनात ऐतिहासिक योगदान देणारी मुस्लिम सत्यशोधक चळवळ विस्तारत आहे. समविचारी अशा समता-  संविधानवादी संस्था आणि संघटनांसमवेत सातत्याने संयुक्तपणे उपक्रम राबवण्यात येतात. भारतीय समाजप्रबोधनाच्या चळवळीत मुस्लिम समाज मागे राहू नये. मुस्लिम समाजाची उन्नती देशाच्या उन्नतीत योगदान देणारी ठरेल. अशी मंडळाची धारणा आहे.

 

मुस्लिम समाजात अनेक मागास जाती आहेत, त्यांचे पारंपरिक व्यवसाय विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात कालबाह्य ठरले आहेत. अशा मागास मुस्लिमांच्या शैक्षणिक विकासासाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी मंडळ प्रयत्न करते. न्या. सच्चर समिती, न्या. रंगनाथ मिश्रा आयोगाने सादर केलेला अहवाल आणि शिफारशींकडे शासनाने गांभीर्याने पाहून मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कार्यक्रम आखावा असे मंडळास वाटते. त्यासाठी मंडळ प्रयत्न करीत असते.

 

मुस्लिम जमातवाद थोपवण्यासाठी आणि त्यातून घडणारे अनर्थ टाळण्यासाठी  मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्य करते. अलीकडे आक्रमक हिंदूत्ववादातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम समाज लक्ष्य केल्या जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत संविधानवादी भूमिका घेऊन सर्वप्रकारच्या जमातवादी मानसिकता आणि उपद्व्यापाशी मंडळास संघर्ष करावा लागतो. आक्रमक हिंदुत्ववादामुळे मुस्लिम समाजप्रबोधनाचा विषय मागे पडू  नये याची मंडळास काळजी वाटते.

 

धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण व्हावा, धर्मापलिकडे पाहण्याची दृष्टी विकसित व्हावी यासाठी मंडळ आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन आणि सहकार्य करते. अर्थात हे करताना विवाहासाठी धर्मांतरे होऊ नयेत अशी मंडळाची भूमिका असते. त्यासाठी मंडळ सातत्याने आंतरधर्मीय किंवा धर्मांतर्गत विवाह विशेष विवाह कायदा (१९५४) म्हणजेच नोंदणी पद्धतीने विवाह व्हावेत यासाठी कार्य करते. अलीकडे तथाकथित लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदे यानिमित्ताने होणारे आंदोलने सामाजिक अस्वस्थता निर्माण करतात. हिंदू समाजात ज्याप्रमाणे काही धर्मवादी संघटनांनी आव्हाने उभी केली आहेत त्याप्रमाणे मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळ ( मुस्लिम पर्सनल ला बोर्ड) पापुलर फ्रंट ऑफ इंडिया, तबलिग जमात,आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी कारवाया याविरोधात भूमिका कायमच घेत आली आहे.

 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाप्रमाणेच समाजात अनेकजण आपापल्या व्यक्तिगत स्तरावर समाजाच्या आणि देशाच्या विकासात योगदान देत असतात. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना मंडळाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी मंडळाच्या वर्धापनदिनी समाज प्रबोधन पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात येतात.


मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना होत असताना जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात अशी एक खंत व्यक्त करण्यात आली होती की, मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही सेक्युलँरिझशी बांधिलकी मानणारी संघटना आहे. तरीही या चळवळीच्या नावात " मुस्लिम " शब्द वापरावा लागत आहे. ते यासाठी की या चळवळीचे प्रमुख कार्य मुस्लिम समाजात असणार आहे. मुस्लिम समाजप्रबोधन हा विषय केंद्रस्थानी ठेवून कार्य होणार आहे. मुस्लिम समाजप्रबोधनाची गरज पूर्ण झाली की ही चळवळ सर्व समाजासाठी कार्य करेल. तशी परिस्थिती लवकर यावी आणि या चळवळीच्या नावातील " मुस्लिम " शब्द गळून पडावा अशी अपेक्षा आहे.