विघ्नहर्ता आला, पण जगाची विघ्ने कोण हरणार?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकी आयातशुल्कामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीमुळे देशी अर्थपंडित चिंतित झाले असले तरी या संकटातच आपल्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि उत्पादकतेला धुमारे फुटण्याची ही संधीही आहे. त्यासाठी गणेशचतुर्थीपेक्षा चांगला मुहूर्त कोणता असू शकेल?

घराघरांत श्रीगणरायांची गोजिरी मूर्त आज मखराधिष्ठित होईल. साग्रसंगीत प्रतिष्ठापना झाल्यानंतर अवघे घर-अंगण गणरायाच्या सहवासाने सुगंधित आणि प्रफुल्लित होईल. त्या वरदविनायकाच्या दर्शनहेळामात्रेच अष्टभाव आपापत: जागृत होतात.

मराठी माणूस कितीही शिकला, सवरला, शहाणा झाला तरी पंढरपूरचा विठुराया, आणि हा विघ्नहर्ता गणराया यांच्या नुसत्या उल्लेखाने त्याची काया थरारते. इथे थेट हृदयाचे नाते जडले आहे. गणराया तर साक्षात बुद्धीची देवता. ज्ञानोबामाऊलींना तर हा गणेशु असा दिसला की, त्या ज्ञानियाच्या डोळ्यांची धणीच फिटली.

अकार उकार आणि मकार एकाठायी प्रकटून शब्दब्रह्म फळां आले, ते ॐकाराचे मूळ महाबीज ज्ञानराजाला आकळले. ‘हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥’ असे सांगणाऱ्या ज्ञानदेवांना गणराया जसा दिसला तसा तो आपल्याला दिसणे अवघड, किंबहुना अशक्यच.

पण त्याच्या जवळपास जाणारा भासमान गणाधीश तरी आपल्याला नीट ओळखता आला आहे का? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. ज्ञानेश्वरांनी देखिलेल्या सहा हातांच्या गणरायाच्या एका हातात तर्काचा परशू आहे, दुज्या हातात न्यायनीती अंकुश आहे, तिसऱ्या हातात शास्त्रविद्येचा, वेदान्ताचा ‘महारसु’ आपल्या पोटी सामावणारा स्वादिष्ट मोदक आहे, आणि चौथ्या हाताने तो आशीर्वचन देतो आहे.

पाचव्या हस्तात समतेचे प्रतीक असलेला खंडित दात आहे, आणि सहाव्या हातात अभिजात कलांचे शुभचिन्ह म्हणजेच कमळ आहे. कुठे गेला तो तर्क? तो न्याय आणि नीती? अष्टसात्विक भाव साकळलेला तो ‘महारसु’ कुठे आटून गेला? कुठे गेली ती समता? कुठे आहे ती अभिजात कलेची आसक्ती? त्या भगवंताने आशीर्वादासाठी आपला वरदहस्त उभारला आहे खरा, पण त्या वरदानाचे आपण काय करतो?

ज्ञानोबा माऊलींनी त्या वरदविनायकाचे वर्णन करताना त्यास ‘विवेकवंतु सुविमळु’ असे म्हटले आहे. हा विवेकच सध्या हरपलेला दिसतो. उत्सवाच्या उन्मादात आपण कितीतरी चांगल्या गोष्टी विसरत चाललो आहोत. श्रीगणेश मूषकावर बैसोन पृथ्वीतलावर येताना त्यांना काय चित्र दिसले असेल? वैश्विक चित्रच डोळ्यासमोर आणू या.

युक्रेनच्या भूमीत अधूनमधून आगडोंब उसळत आहेत. रशियातही फैरी झडत आहेत. इस्राईलच्या फौजा कुणाचीच पर्वा न करता इराकपासून ‘हमास’पर्यंत सगळ्यांशीच पंगा घेत आहेत. इकडे ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर उसने अवसान आणून निगरगट्टपणे जागतिक मंचावर वावरणारा पाकिस्तान भारताविरुद्ध नव्या कुरापतीची संधी शोधत आहे.

या भांडणात आपला काय लाभ होत आहे, याची वाट बघत लाल चिनी बोका दबा धरुन बसला आहे. रशियाकडून तेल विकत घेणाऱ्या भारताला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पन्नास टक्के टॅरिफचे फतवे जारी करत आहेत. नुसते फतवे काढून या महाबळीचे भागत नाही, तोंडाने दर्पोक्ती आणि दमबाजीच्या विषारी वाफा सोडून जगभर या ट्रम्पासुराने आर्थिक प्रदूषण माजवले आहे.

आयातशुल्क लादून आपल्या निर्यातीवर घाला घालत आहे. थोडे सरहद्दीच्या अलीकडे यावे तर कपाशीच्या भावामुळे भडकलेल्या किसानांनी पुन्हा उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हातातोंडाशी आल्यामुळे राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध तोडीस तोड आघाड्या उघडून जुळवाजुळव सुरूदेखील केली आहे.

त्यात समाजमाध्यम नावाचा नवा असुर आपले हात धुऊन घेत आहे. तरीही जमिनीवर तशी शांतता आहे. जणू काही घडलेचि नाही, घडणार नाही. अमेरिकी आयातशुल्कामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीमुळे देशी अर्थपंडित चिंतित झाले असले तरी या संकटातच आपल्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि उत्पादकतेला धुमारे फुटण्याची संधीही त्यात दिसते आहे. त्या प्रयत्नांना सुरुवात करण्यासाठी गणेशचतुर्थीपेक्षा चांगला मुहूर्त कोणता मिळणार?

वरकरणी, गणरायांच्या आगमनासाठी बाजारपेठा सालाबादप्रमाणे सजल्या आहेत. गतवर्षीपेक्षा मूर्ती नि मखराची किंमत वीस-तीस टक्के जास्त असूनही बाजार तसा तेजीत आहे. काही कंपन्यांनी आणि मायबाप सरकारनेही बाप्पाच्या आगमनाची निकड ओळखून वेतन आधीच देण्याचे औदार्य दाखवले आहे. समाजमाध्यमांवर उकडीच्या मोदकांच्या पाककृती ढिगांनी पडल्या आहेत.

ब्रँडेड पेढे, मिठायांच्या जाहिरातींवरची लज्जतदार व्यंजनचित्रे जिभेला निमंत्रणे धाडत आहेत. ढोल-ताशा पथकांच्या तालमी गेले दोन महिने दुमदुमत आहेत. डीजे पथकांच्या सुपाऱ्या फुटल्या आहेतच, शिवाय अनेक मंडळांनी कार्यक्रमांची दीपमाळच सजवायला घेतली आहे. उत्सव आणि उन्माद यामधील सीमारेषा गेल्या काही दशकांत धूसर होत गेली.

आता तर दणदणाटी आवाज आणि बाजारी मनोरंजनाशिवाय कुणाचेच भागत नाही. जितका मोठा आवाज तितकी मोठी मजा, आणि जितके मनोरंजन स्वैर, तितके स्वातंत्र्य अधिक, अशी काहीतरी वेडीविद्री धारणा झालेली दिसते.

ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषण, आर्थिकप्रदूषण, विचारप्रदूषण, वर्तनप्रदूषण अशा प्रदूषणांच्या नानाविध रूपांनी अवघा पृथ्वीगोल कवटाळलेला असतानाच गणराया अवतरला आहे. या प्रदूषणांच्या गलबल्यात विवेकाचे आशीर्वचन आम्हा बापड्यांना त्याने द्यावे, एवढीच प्रार्थना त्याच्याकडेच करावी लागणार! विघ्नहर्त्याकडे एवढे मागणे ‘लई’ नाही.