मराठी भाषेचे संवर्धन करणारे मुस्लीम शिलेदार

Story by  Shamsuddin Tamboli | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
मराठी आणि मुस्लीम यांच्यातील सहसंबंध
मराठी आणि मुस्लीम यांच्यातील सहसंबंध

 

- डॉ. शमसुद्दीन तांबोळी, पुणे
 
मातृभाषा संवर्धनाची शिक्षण आणि साहित्य ही साधने आहेत. सोबतच गाणी, म्हणी, वाक्प्रचार, नाटक, सिनेमा, व्यापार आणि दैनंदिन व्यवहार यांतूनही मातृभाषेची अभिव्यक्ती होत असते. आपली मातृभाषा असलेल्या मराठीच्या संगोपन आणि संवर्धन यांसाठी अनेक मुस्लिमांनी मोठे योगदान दिले आहे. त्यापैकी काही थोरांच्या कार्याचा धावता आढावा घेत आहेत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समिती सदस्य डॉ. शमसुद्दीन तांबोळी...
 
संस्कृती रक्षणाचे आणि संवर्धनाचे महत्त्वाचे साधन म्हणून भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषा ही संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शिक्षण, ज्ञान - विज्ञान, साहित्य आणि भाषा यांना वेगळे करता येत नाही. बहुसांस्कृतिकता तसेच बहुभाषिकतेचे जतन आणि संक्रमण हे लोकशाही मूल्य स्वीकारलेल्या राष्ट्रांच्या कर्तव्याचा एक भाग आहे. भाषिक विविधता जोपासण्यात  केवळ अस्मिता जोपासना नसते तर त्या मार्फत इतिहासाचा ठाव घेतला जातो. दुर्दैवाने आज अनेक भाषा लोप पावत आहेत. यामुळे आपले किती प्रमाणात नुकसान होते हे मोजण्याचे एकक आपल्याकडे नाही. 
 
जगात सुमारे ७००० हून अधिक भाषा बोलल्या जातात. भारतात अधिकृतपणे २२ भाषांचा वापर होतो. बोलीभाषा तर अनेक आहेत. अशा १३०० हून जास्त मातृभाषांचा वापर भारतात होतो. या सर्व भाषांचे जतन करणे त्यांचा सन्मान करणे बहुविविधता जोपासण्यासाठी आवश्यक आहे. 
 
आपण जे भारताविषयी बोलतो तेच आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र संघटना जागतिक संदर्भात मातृभाषेविषयी बोलते. मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने १७ नोव्हेंबर १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
 
२१ फेब्रुवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यामागे एक पार्श्वभूमी आहे. आपणास कल्पना आहे की भारताची फाळणीतून पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तान हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असा विभाजित झाला. पूर्व पाकिस्तानात बंगाली भाषा तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू भाषा मातृभाषा म्हणून वापरण्यात येत असे. तथापि पाकिस्तानाने उर्दू भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला आणि त्यातून पूर्व पाकिस्तानातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि भाषिक अस्मितेचे वातावरण निर्माण झाले. पाकिस्तानच्या या धोरणास विरोध करण्यासाठी ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि हे आंदोलन मोडून काढण्यासाठी २१ फेब्रुवारी १९५२ रोजी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. यात अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेचे आंतरराष्ट्रीय परिणाम लक्षात घेऊन पाकिस्तानला नमते घ्यावे लागले. परिणामी बंगाली भाषेला मान्यता द्यावी लागली. या सर्व घटनांतून पुढे पाकिस्तानची फाळणी झाली हा इतिहास सर्वश्रुत आहे. 
 
भाषा ही भाषा असते. मात्र त्यास प्रांतिक आणि धार्मिक अस्मिता जोडण्यात येतात. भारतातसुद्धा उत्तर भारत आणि दक्षिण भारतात असणारा भाषिक संघर्ष आपणास माहित आहेच. तसेच ‘उर्दू भाषेला मुस्लीमांची भाषा’ असा अतार्किक आणि राजकीय रंग देण्यात यश आले आहे. वास्तविक उर्दू आणि इस्लाम यांचा काडीचाही संबंध नाही. तथापि महाराष्ट्रात उर्दू लिहता वाचता न येणारे तसेच उर्दू न बोलणारे मुस्लीम आपली मातृभाषा म्हणून उर्दूचा उल्लेख करतात. यामुळे मुस्लीम समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. 
 
दक्षिण भारतातील मुस्लीम दक्षिण भारतातील स्थानिक भाषा बोलतात. गुजराती, काश्मीरी मुस्लीम त्या त्या प्रांताची भाषा किंवा स्वतंत्र बोली भाषा वापरतात. महाराष्ट्रातील चित्र मात्र थोडे वेडेवाकडे आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य मुस्लिमांना धड उर्दू किंवा हिंदी बोलता येत नाही. त्यापैकी अनेकजण मराठी भाषेविषयी काही किंतु बाळगून असतात. राज्यात उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केला जातो. व्यवहारात मात्र उर्दू भाषेचा वापर मर्यादित स्वरूपात होतो. भाषिक अडथळे कमी करुन महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाने मराठी भाषेचा अंगीकार करावा यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. या प्रयत्नाचा थोडक्यात आढावा घेता येईल.
 
महाराष्ट्राचा पाया मराठी असल्याने १ मे, १९६० पासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला असला तरी कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा राजभाषा दिन म्हणून १९९७ पासून  साजरा केला जातो. 
 
मराठीचे वैभव जपण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी, अमराठी भाषिकांमध्ये मराठीचा प्रसार-प्रचार होऊन ती लोकभाषा होण्यासाठी अशा दिनांचे औचित्य आहे. १४ ते  २८ जानेवारी हा मराठी भाषा पंधरवडा विविध उपक्रमाद्वारे सध्या साजरा करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र स्थापनेला  सहा दशके उलटल्यानंतरही मराठी भाषेला अपेक्षित वैभवाचे  दिवस आले असे ठामपणे म्हणता येत नाही.
 
भाषा ही जेव्हा ज्ञान, व्यापार-उद्योग, रोजगाराची आणि दैनंदिन व्यवहाराची होते तेव्हा तिच्या संवर्धन आणि संरक्षणाबद्दल असुरक्षितता जाणवत नाही. भाषा ही सामाजिक ताणतणाव, अपसमज आणि संघर्ष निर्मूलनाचे जसे एक माध्यम आहे तसेच सहसंवेदना आणि सामाजिक सलोखा निर्माण करणारे साधन आहे. 
 
गेल्या चार दशकांपासून मी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे कार्य करतो. मला अनेकवेळा मुस्लिम आणि मुस्लिमेतरांकडून दोन प्रश्न विचारण्यात येतात, "तुम्ही मुसलमान असून उर्दू येत नाही?" आणि  "तुम्ही घरीसुध्दा मराठीत बोलता?" अर्थात हे प्रश्न वास्तवतेच्या  निरीक्षणावर आधारित आहेत.  काही अपवाद सोडल्यास अगदी पुरोगामी मुस्लीमसुध्दा  सार्वजनिक जीवनात मराठीत बोलतात आणि कुटुंबात हिंदी, उर्दू, दखनी, मराठी मिश्र अशा स्वतःच्या भाषेत बोलतात. तसेच अनेकांचा  गैरसमज आहे की ‘उर्दू मुस्लिमांची भाषा आहे आणि प्रत्येक मुस्लीम धर्मकर्तव्य म्हणून उर्दू शिकत असतो. ज्याला उर्दू येत नाही तो मुसलमान कसला?’ अनेक मुस्लीम उर्दू येत नसतानाही आपली मातृभाषा उर्दू नोंदवतात. उर्दू भाषेचा वापर मुस्लीमच करतात असेही नाही. उर्दू साहित्य वाढवण्याच्या कामात अनेक हिंदू आजही मोलाची कामगिरी बजावत आहेत. 
 
भाषाविषयक गैरसमज दूर करण्यासाठी आणि मराठी भाषेचा मुस्लीम समाजाने अंगीकार करावा, शिक्षणाचे माध्यम करावे, मराठी साहित्य निर्माण करावे यासाठी हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम सत्यशोधक मंडळाने  १९७३ मध्ये कोल्हापूर येथे मुस्लीम मराठी शिक्षण परिषदेचे आयोजन केले होते. मुस्लिमांनी स्वतः चे  नुकसान टाळण्यासाठी भाषा आणि शिक्षणविषयक दृष्टीकोन बदलला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठीचे संवर्धन आणि विस्तार करण्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञातांचा हातभार लागला आहे. यातील काही अमराठी आणि मानवतावादी  मान्यवरांचा मातृभाषादिनानिमित्त उल्लेख करावा वाटतो.
 
सांगली भागातून पुण्यात आलेले शेख मोहियुद्दीन अहमद तथा आबा मास्तर हे ज्येष्ठ लेखिका सरोजिनी बाबर यांचे वडील कृष्णराव बाबर आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांचे वडील गोविंदराव ताकवले यांचे मित्र होते. त्यांनी मराठी शिक्षणक्षेत्रात उभी हयात घालवली. कृ. भा. बाबर यांच्या बरोबरीने त्यांनी समाजशिक्षणमालेत काही सुंदर पुस्तके लिहून दिली. ज्येष्ठ पत्रकार  यदुनाथ थत्तेंनी त्यांच्याविषयी लिहिले आहे. हे मोहियुद्दिन शेख अर्थात अबा मास्तरांनी आपल्या कुटुंबियांसोबत कोल्हापूर येथील मुस्लीम मराठी शिक्षण परिषदेत हजेरी लावली होती. 
 
आदर्श आणि शुद्ध मराठीचे उदाहरण म्हणून मराठी साहित्यातील दिग्गज ज्यांच्या साहित्याचा संदर्भ देत ते सांगली येथील सय्यद अमीन! मराठी साहित्याची परंपरा उभी करण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. अर्वाचीन काळात मुस्लीम मराठी साहित्याची सुरुवात सय्यद अमीन यांनी सुरू केली. त्यांनीच मुस्लीम मराठी साहित्य ही संज्ञा १९३६ मध्ये सर्वप्रथम वापरली. 'मुस्लीम मराठी साहित्य पत्रिकेचे' संपादन केले. चरित्र, कथा, कादंबरी लेखन केले. त्यांचे साहित्य शिवाजी विद्यापीठात अभ्यासक्रमात वापरले गेले. ते आताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट  सदस्य आणि  मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते. त्यांनी लिहिलेली मोहंमद पैगंबर, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र, भारतीय शूर स्त्रिया, प्राचीन भारतीय संस्कृती, हिंदू-मुस्लिम सांस्कृतिक मिलाफ अशी डझनभर पुस्तके लोकप्रिय झाली. साहित्य क्षेत्रासारखेच उल्लेखनीय कार्य त्यांनी समाजकारणातही केले. १९४९- १९५२ याकाळात ते मुंबई प्रांताचे आमदार होते. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, वसंतदादा पाटील यांच्याशी त्यांची जवळची मैत्री होती. मराठी भाषेच्या माध्यमातून  जनमानसात, मराठी साहित्य आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला.  
 
महाराष्ट्रात साहित्यिक, पत्रकार, समाजसुधारक हमीद दलवाई सर्वश्रुत आहेत.  दहावीत शिकत असताना मराठी भाषेचे महत्त्व सांगणारा त्यांचा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला होता. अठराव्या वर्षी मौज, मनोहर, किर्लोस्कर यांसारख्या नियतकालिकांतून त्यांनी मराठी कथा लेखनाला सुरूवात केली. या कथांचा संग्रह 'लाट' आणि कादंबरी 'इंधन' ला महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. सोबतच त्यांनी कथांचे 'जमिला जावद आणि इतर कथा' असे ललित आणि इस्लामचे भारतीय चित्र, भारतातील मुस्लीम राजकारण, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान, कानोसा: भारतीय मुस्लीम मनाचा  हे वैचारिक साहित्य लिहिले. त्यांच्या मृत्यनंतर हे साहित्य प्रकाशित होऊ शकले. महाराष्ट्रातील मुस्लिमांची मातृभाषा ही मराठी आहे. मराठीचा दुस्वास आणि  उर्दूचा दुरभिमान मुस्लिमांनी बाळगू नये,असे आग्रहाने प्रतिपादन करणाऱ्या हमीद दलवाई यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली आणि मंडळाचा संपूर्ण कारभार मराठी भाषेत ठेवला. त्यांनी मराठी भाषा प्रचार  आणि लोकशिक्षणासाठी पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १९७३ मध्ये मुस्लीम सत्यशोधक पत्रिका सुरू केली. मुस्लीम मराठी साहित्य विश्वात या ना त्या स्वरूपात हमीद दलवाई यांचा उल्लेख केल्याशिवाय इतिहास अपूर्ण राहतो. 
 
मराठी भाषेचा आणि व्याकरणाचा नंदादीप म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या डॉ. यास्मिन शेख यांचा अनुल्लेख हे कृतघ्नपणाचेच ठरेल. महाराष्ट्रात ‘मराठी भाषेचे व्याकरण’ याची सनद लाभलेले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे यास्मिन शेख! आज त्या अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आहेत. दोन वर्षांत शंभरी गाठणाऱ्या डॉ. यास्मिन शेख ठणठणीत आहेत आणि आजही मराठी भाषेची तन्मयतेने निगर्वीपणे आणि आनंदाने सेवा करतात. त्यांची  'मराठी शब्दलेखन कोश' आणि 'मराठी लेखन मार्गदर्शिका' ही दोन पुस्तके मराठी भाषेतील संदर्भ ग्रंथ आहेत. विविध मराठी वृतपत्रांतून त्यांनी मराठी भाषा मार्गदर्शनपर लेखन केले आहे. ,भाषा मग कोणतीही असो, संवादाचे प्रभावी माध्यम असतेच; पण दर्जेदार भाषाशिक्षण पुढील दर्जेदार शिक्षणाचा पाया असतो. त्यामुळे मुलांच्या भाषाशिक्षणावर विशेष लक्ष देण्याची गरज असते.’,असे डॉ. यास्मिन शेख वारंवार सांगतात. सर्वच शिक्षण भाषेच्या माध्यमातून शिकवले जात असल्याने ज्यांचे भाषिक आकलन चांगले त्यांचे इतर विषयांचे आकलन चांगले. असे प्रतिपादन करणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांनी नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील महाविद्यालयात मराठी भाषेचे तब्बल चौतीस वर्षे अध्यापन केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी  दहा वर्षे भारतीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र आणि व्याकरण शिकवले. अंतर्नाद सारख्या नामांकित नियतकालिकांत 'व्याकरण सल्लागार' म्हणून अनेक वर्षे सेवा केली. 'बालभारती' पुस्तकांचे संपादनही केले.
 
अनेक राज्यांतून तसेच विविध देशातून शंका निरसन करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला जातो, तेव्हा आनंदाने संवाद करतात. मराठी भाषेसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. खरे तर त्या अशा पुरस्कारांच्या कितीतरी पुढे गेलेल्या आहेत. मराठी भाषेची सेवा करणाऱ्या डॉ. यास्मिन शेख या शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांच्या कामगिरीची अजूनही हवी तशी  दखल घेणे बाकी आहे असे वाटत राहते. 
 
आज मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय अशी वाढत आहे. डॉ. यु मो पठाण सारखे अनेक संत साहित्यिक आहेत. मराठी भाषेत ललित - वैचारिक लेखन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एवढेच काय जमाते इस्लामी सारख्या मुस्लीम धार्मिक संघटना कुराणासह इतर धार्मिक पुस्तके मराठीत प्रकाशित करीत आहेत. गेल्या तीन चार दशकांपासून अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. हे स्वागतार्ह आहे. तथापि तळागाळात मराठीचा मातृभाषा म्हणून उपयोग वाढावा यासाठी काही धोरणात्मक प्रयत्न झाले पाहिजेत असे मातृभाषा दिनाच्या निमित्ताने सुचवावे वाटते. 
 
- डॉ. शमसुद्दीन तांबोळी
(लेखक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी भाषा सल्लागार समिती सदस्य आहेत.)