राज्य मदरसा शिक्षण मंडळाच्या शताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टोपी घालण्यास नकार देत ती मंत्री जमा खान यांच्या डोक्यावर चढविली
उज्ज्वलकुमार
पाटण्यात आयोजित राज्य मदरसा शिक्षण मंडळाच्या शताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टोपी घालण्यास नकार दिला. त्याचवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या व्होटर अधिकार यात्रेदरम्यान शुक्रवारी मुंगेरमधील खानकाह रहमानी मशिदीच्या मौलनांची भेट घेतली. राज्यात टोपीचे राजकारण सुरू झाले आहे. राजकीय नेतेही हा मुद्दा आता उचलून धरत आहेत.
'व्होटर अधिकार यात्रे'चा आज सहावा दिवस होता. राहुल गांधी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) तेजस्वी यादव यांनी मुंगेरमधील खानकाह रहमानी मशिदीचा दौरा केला. तेथे त्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. मशिदीचे हजरत मौलाना फैजल वली यांच्याशी गांधी आणि यादव यांनी बराच वेळ चर्चा केली.
भेटीच्या आदल्या दिवशी म्हणजे काल राज्य मदरसा शिक्षण मंडळाच्या शताब्दीनिमित्त नितीशकुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जमा खान यांनी मुख्यमंत्र्यांनी टोपी घालण्याचा प्रयत्न केला. पण नितीशकुमार यांनी ती स्वतः न घालता जमा खान यांच्याच डोक्यावर चढविली. या घटनेनंतर नितीशकुमार यांनी मुस्लिमांचा अपमान केल्याची चर्चा सुरू झाली. कॉंग्रेस आणि 'आरजेडी 'नेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टोपी घालण्यास नकार दिला होता, याचे स्मरण विरोधक करून देत आहेत. राज्यात यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. टोपी प्रकरणाचा परिणाम त्यावर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
नितीशकुमार यांनी टोपी घातली नाही. हिंदू मतांसाठी भाजपला त्यांना नाराज करायचे नाही, असा याचा अर्थ लावला जात आहे. वक्फ विधेयकावर संयुक्त जनता दलाने (जेडीयू) घेतलेल्या भूमिकेने झालेल्या नुकसानीची भरपाई अशा कार्यक्रमांतून करण्याची आशा पक्षाला होतो. पण ती फलद्रुप झाली नाही. उलट वेतनाच्या मागणीवरून मदरशाच्या शिक्षकांनी आवाज उठविला आहे. या शिक्षकांना अनेक महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. आता टोपीच्या मुद्द्याला केवळ राजकीय रंग चढला नाही तर केंद्रस्थानी हा मुद्दा आला आहे. बिहारमध्ये मुस्लिमांची संख्या १७.७० लाख आहे. निवडणुकीच्या हंगामात सर्व पक्षांचे या मतांवर खास लक्ष असते.
मुस्लिम मतांची विभागणी
बिहारमधील २०१० च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी 'आरजेडी'च्या 'एम-वाय' समीकरणाला सुरुंग लावला, त्यांच्या 'जेडीयू' पक्षाने त्यावेळी ११५ जागांवर विजय मिळविला होता. नितीशकुमार यांचा सहयोगी पक्ष भाजपला ९१ जागा मिळाल्या होत्या, या ऐतिहासिक विजयात मुस्लिम आणि अतिमागास वर्गाची मते मोठ्या प्रमाणात नितीशकुमार यांच्याकडे वळली. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या 'आरजेडी'ची पारंपरिक मतें 'जेडीयू 'कडे वळल्याने 'आरजेडी'ला केवळ २२ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर राज्यात मोठे बदल घडले. 'आरजेडी' २०२० च्या निवडणुकीत ८५ जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला.