ब्रिटनमध्ये कबीर, गुरुनानक आणि गालिब यांचे साहित्य धोक्यात?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

हरजिंदर

पाश्चात्य देशांची एक मुख्य अडचण म्हणजे इतर संस्कृती त्यांना नीट समजत नाहीत. अगदी पुरोगामी विचार करून निर्णय घेतानाही अनेकदा गोष्टी उलट्या दिशेने जातात. सध्या तिथले मुस्लिम प्रामुख्याने 'इस्लामोफोबिया'मुळे त्रस्त आहेत. याचा अर्थ इस्लाम मानणाऱ्यांची अकारण भीती बाळगणे आणि त्यातून त्यांना त्रास देणे किंवा हिंसा करणे होय. या विचारसरणीवर आणि प्रतिक्रियेवर नियंत्रण कसे मिळवावे, यावर आता सर्वत्र विचारमंथन सुरू आहे.

ब्रिटनमध्येही या विषयावर बराच काळ चर्चा सुरू होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सरकारने यावर ठोस पावले उचलण्याचे ठरवत एक 'वर्किंग ग्रुप' स्थापन केला. मुस्लिमांविरोधातील द्वेष आणि इस्लामोफोबिया रोखण्यासाठी उपाय सुचवण्याची जबाबदारी या गटावर सोपवण्यात आली. या शिफारशींच्या आधारे पुढे कायदा तयार करता येईल, हा त्यामागचा उद्देश होता.

वर्किंग ग्रुपने आपला अहवाल नियोजित वेळेत सादर केला; मात्र तो सार्वजनिक करण्यात आला नाही. हा अहवाल बीबीसीच्या हाती लागला आणि त्यांनी तो पूर्णपणे प्रसारित केला. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, या अहवालातून 'इस्लाम' हा शब्दच पूर्णपणे वगळण्यात आला आहे. तसेच, इस्लाम किंवा मुस्लिमांची कोणत्याही प्रकारची टीका आणि मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण शब्दांचा वापर बेकायदेशीर ठरवण्याची शिफारस यात आहे. यासाठी शिक्षेची तरतूद असावी, असेही यात सुचवण्यात आले आहे.

या अहवालात टीकेची व्याख्या ज्या पद्धतीने केली आहे, त्यामुळे इतर समुदाय आणि शिक्षण क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत. यात टीकेबद्दल अतिशय संदिग्ध भाष्य करण्यात आले आहे. परिणामी, अशा अनेक गोष्टी या कक्षेत येतील ज्यांना केवळ टीका म्हणता येईल, परंतु ती निंदा किंवा अवहेलना नक्कीच नाही.

हा मुद्दा उपस्थित करण्यात ब्रिटनमधील शीख आणि हिंदू संघटना आघाडीवर आहेत. मुस्लिम समुदायापेक्षा संख्या कमी असली तरी ते तिथे अल्पसंख्याकच आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्तेही आता त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या संघटनांचे म्हणणे केवळ दोन समुदायांमधील आपसी वैर किंवा स्पर्धेचा विषय म्हणून फेटाळून लावता येणार नाही.

या संपूर्ण चर्चेत संत कबीरांचे उदाहरण दिले जात आहे. कबीरांनी आपल्या साहित्यातून हिंदू अनिष्ट प्रथांवर आणि मुस्लिम समाजातील त्रुटींवरही ताशेरे ओढले आहेत. मूळ संदर्भ बाजूला ठेवून केवळ टीकेचा भाग विचारात घेतल्यास, कबीरांच्या दोह्यांचे वाचन करणेही गुन्हा ठरू शकतो. गुरुनानक यांच्या वाणीबाबतही असाच तर्क लावता येईल.

या निकषानुसार मिर्झा गालिब यांच्या काही शेरांचे वाचन करणेही गुन्हा ठरेल, अशी भीती भारतीय समुदायातून व्यक्त होत आहे. कबीर, नानक आणि गालिब यांचे साहित्य ब्रिटनमधील अनेक विद्यापीठांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शिकवले जाते, त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

इस्लामोफोबिया रोखण्यासाठी उपाययोजना हव्यात, असे सुरुवातीला म्हणणारे लोकही आता वेगळा तर्क मांडत आहेत. मूळ उद्देश इस्लाम मानणाऱ्यांविरोधातील द्वेष आणि हिंसा रोखणे हा होता. मात्र, आता या गोष्टीचा वापर टीका रोखण्यासाठी एक हत्यार म्हणून केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वर्किंग ग्रुप स्थापन करण्यामागचा मूळ उद्देश नक्कीच उदात्त होता, हे सत्य आहे. परंतु टीकाकारांच्या मते आता संपूर्ण विषयच भरकटला आहे. या वाढत्या विरोधामुळे द्वेष रोखण्याचे हे प्रयत्न अर्ध्यावरच थांबवले जातील की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत.)