फतवा म्हणजे नक्की काय?

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
फतवा म्हणजे आदेश नव्हे सल्ला!
फतवा म्हणजे आदेश नव्हे सल्ला!

 

‘फतवाहा शब्द आपल्याकडे कायम चर्चेत असतो. मराठीत तर अविवेकी आदेशासाठी ‘फतवा देणेअशी म्हणच रूढ झाली आहे. ‘दारूल उलूम देवबंद’ या भारतीय मुस्लिमांच्या सर्वोच्च धर्मपिठांपैकी एक असलेल्या संस्थेने नुकताच दिलेला एकफतवा चर्चेत आहे. ‘दाढी न ठेवणे इस्लामविरोधी असल्यामुळे ती न ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.’ अशा स्वरूपाचा हा फतवा होता. साहजिकच माध्यमांमध्ये त्यावर बरीच (बहुमतांशी उलटसुलट) चर्चा झाली. आणि ‘फतवाहा प्रकार नेमका काय प्रकार आहे,याविषयी समाजामध्ये आणि माध्यमांमध्ये बरेचसे अज्ञान असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. फतवा म्हणजे आदेश असाच बहुतेकांचा समज असला,तरी फतव्याचा खरा अर्थ ‘सल्लाअसा आहे. साहजिकच फतवा मानने मुस्लिमांवर बंधनकारक नाही. मात्र माहितीच्या अभावामुळे वर्षानुवर्षे या शब्दाविषयीचा गैरसमज अधिकच दृढ होताना दिसतो. मराठी भाषेत तर इस्लाम आणि मुस्लीम विषयक माहितीचा वाणवाच आहे. या पार्श्वभूमीवर फतवा म्हणजे नेमके काय?’ हे समजावून सांगणारालेख प्रसिद्ध करण्याचा मानस होता. मात्र मराठीत इस्लामविषयी अभ्यासपूर्ण मांडणी करणारे दुर्दैवाने अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहे. अनीस चिश्ती हे त्यापैकीच एक होते. एप्रिल २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले. ‘दैनिक सकाळ’मध्ये त्यांच्या इस्लामविषयक लेखमाला विशेष गाजल्या. त्यांनी ‘फतवा म्हणजे काय?’ या शीर्षकाचा लेख काही वर्षांपूर्वी सकाळमध्येच लिहिला होता. सध्या चर्चेत असलेल्या फतव्याच्या पार्श्वभूमीवर अनीस चिश्ती यांचा हा लेख खास आवाज मराठीच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

- संपादक 


भारतात मुस्लिमांना आपल्या समस्या घेऊन धर्मपंडितांकडे जावे लागते. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची शरीअतच्या कायद्याप्रमाणे धर्मपंडित उत्तरे देतात. हीच उत्तरे ‘फतवा' म्हणून ओळखली जातात. फतवा देणाऱ्या ‘मुफ्ती', फतवा विचारणाऱ्याला ‘साइल' आणि त्याच्या चौकशी किंवा प्रश्‍नाला ‘इस्तिफसार' असे म्हणतात.


भारतात अनेक प्रसिद्ध ‘दारुलउलूम' (ज्ञानाची माहेरघरे) - इस्लामी तत्त्वज्ञानाची विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून नंतर दोन वर्षांचे ‘फजीलत'चे पाठ्यक्रम संपवून ‘इफ्ता'च्या दोन वर्षांच्या विशेष अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविता येतो. या दोन वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याला लाखो फतवे, न्यायनिवाडे, आदेश, आज्ञा आणि निर्णय पडताळून पाहावे लागतात. त्याचप्रमाणे धर्मशास्त्र (शरीअत), कुरआन, पैगंबर परंपरा, (Jurisprudence), इज्माअ (धर्मविशारदांचे एकमत) आणि इज्‌तेहाद (सद्‌सद्विवेकबुद्धी)चा वापर करणे इत्यादींचा सखोल अभ्यास करावा लागतो. एवढेच नव्हे तर सनद मिळाल्यानंतर किमान दोन वर्षे तरी एखाद्या थोर मुफ्तीच्या सान्निध्यात राहून ‘फतवा नवीसी'चे (फतवा लिहिणे) काम करावे लागते. कुठल्या परिस्थितीत काय विचारण्यात आले आहे आणि त्याचे नेमके उत्तर काय असेल याचे ज्ञान मिळवावे लागते. या अभ्यासानंतरच मुफ्ती फतवा देण्यात पारंगत होतात.


फतव्याची अंमलबजावणी करवून घेण्याची जबाबदारी इस्लामी देशात ‘काजी' म्हणजे न्यायाधीशाची ताकाअर्थी- शासनाची असते. न्यायनिवाडा देण्यासाठी किंवा ‘एका ठराविक निर्णयावर पोचणे'करिता प्रकट बुद्धिमत्तेची गरज असते. क़ाज़ींना शरीअतचे सखोल ज्ञान असले तरी अनेक प्रसंगी त्यांनादेखील मुफ्ती व फक़ीह (इस्लामी कायदेपंडित) यांच्याकडे धाव घ्यावी लागते. अनेक क़ाज़ी एकच प्रश्‍न अनेक मुफ्ती व धर्ममार्तंडाकडे पाठवतात आणि एकसारखी उत्तरे प्राप्त झाल्यावर ‘इज्माअ' झाल्याचे गृहीत धरतात आणि निर्णय देऊन टाकतात. उत्तरांमध्ये तफावत आढळल्यास स्वतःचे निर्णायक मार्ग निवडतात आणि ईश्‍वराला साक्षी धरून कोणावरही अन्याय होणार नाही असे आदेश देतात.


भारतातील मुस्लिम समाजाला आपल्या धार्मिक वा वैयक्तिक समस्यांच्या समाधानाकरिता फक्त फतव्यांवरच अवलंबून राहावे लागते. फतव्यातील शिफारसी योग्य वाटल्यास किंवा धार्मिक जबाबदारी म्हणून कुठल्याही दडपणाला न जुमानता ते फतव्यांचे पालन करतात. मध्य प्रदेशात सरकारमान्य ‘क़ज़ात' (इस्लामी न्यायालय) शासनाच्या विधी मंत्रालयाच्या देखरेखीखाली आजही कार्यान्वित आहे. त्यांच्या अधिकारकक्षात फक्त निकाह आणि वारसा हक्क एवढेच विषय आहेत. भोपाळच्या क़ाज़ींनी दिलेला निवाडा संबंधितांना समजा मान्य नसेल तर त्यांना घटनेने ठरविलेल्या न्यायालयाकडे जाता येते. परंतु सहसा कुणी न्यायालयात जात नाही. कारण अनेकदा न्यायालये क़ाज़ींचा निर्णय मान्य करून त्याच्यावरच शिक्कामोर्तब करतात.


बिहार, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब या राज्यांत चालू असलेली क़ाज़ींची कार्यालये ‘शरीयत न्यायालये' नसून त्या ‘शरीयत पंचायती' आहेत. जिथे केवळ विवाह व वारसहक्कासंदर्भातील भांडण-तंटे एकमेकांची समजूत घालून भारतातील मध्यस्थी कायदा (आरबीट्रेशन ऍक्‍ट)च्या कक्षेत सोडविले जातात. दोन्ही बाजूंना तेही मान्य नसेल तर त्यांना न्यायालयात जाता येते.


फतवे कधीही कुणाविरुद्ध नसतात. एखादी विशिष्ट बाब अथवा प्रश्‍नाविषयी शरीयतमध्ये काय उत्तरे योजिले आहे तेवढेच फतव्यांमध्ये असते. लहानसहान गोष्टींवर वारंवार फतवे विचारणे शरीयतला पसंत नाही. पैगंबर साहेबांचे सोबती नेहमी त्यांना अनेक प्रश्‍न विचारीत व स्वतःचे समाधान करून घेत. एकदा पैगंबर साहेब त्यांना उद्देशून म्हणाले, ‘‘सारखे प्रश्‍न विचारीत जाऊ नका. कारण माझी उत्तरे तुम्हाला बंधनकारक ठरतील. त्यांचे रूपांतर आदेशांमध्ये होईल, ज्यांचे पालन आवश्‍यक आहे.'' फतवा विचारल्यावर त्याचे उत्तर देणे शरीअतच्या आदेशान्वये मुफ्तींवर बंधनकारक आहे.

 

- अनीस चिश्‍ती

(लेखक इस्लामी धर्मशास्त्राचे अभ्यासक होते. एप्रिल २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी लिहिलेला हा लेख दैनिक सकाळच्या सौजन्याने)