ओनिका माहेश्वरी, नवी दिल्ली
नवी दिल्लीच्या जाफराबाद परिसरातील एक घटनेने गंगा-जमुनी संस्कृतीचे सर्वात सुंदर चित्र देशासमोर मांडले आहे. ही कहाणी आहे मुस्लिम बहुल ‘अमन लेन’मधील लक्ष्मी नारायण मंदिराची. हे मंदिर अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. नुकतेच या मंदिराचे पुनर्निर्माण झाले, आणि या पुनर्निर्माणात स्थानिक मुस्लिम समुदायाने दिलेल्या योगदानाने प्रत्येकाचेच मन जिंकले.
दिल्लीच्या उत्तर-पूर्व भागात काही वर्षांपूर्वी धार्मिक तणावाचे काळे ढग जमले होते. पण आज हाच परिसर बंधुभावाचे प्रतिक बनला आहे. जाफराबादचे हे मंदिर केवळ पूजास्थान नसून तो धार्मिक सौहार्दाचा पुरावा आहे. प्रेम आणि बंधुभाव मनापासून असेल तर धर्माच्या भिंती निरर्थक ठरतात, हाच संदेश या घटनेने दिला आहे.
नव्या मंदिरात पूजा-अर्चना
स्थानिक लोक सांगतात की, लक्ष्मी नारायण मंदिर इसवी सन 1957 मध्ये बांधले गेले. कालांतराने हे मंदिर इतके जीर्ण झाले की त्याचे छप्पर तुटू लागले. इथे पूजा-अर्चा करणे जवळपास अशक्य झाले. तेव्हा मंदिर बांधकाम समितीने ठरवले की, या मंदिराचे पुनर्निर्माण करणे गरजेचे आहे. समितीच्या सदस्यांनी शेजारील रहिवाशांना सहकार्याची विनंती केली. त्यावेळी सर्वप्रथम मदतीचा हात मुस्लिम शेजाऱ्यांनी पुढे केला.
पुजारी लालमणी शुक्ला सांगतात, “जर आमच्या मुस्लिम भावांची साथ मिळाली नसती, तर हे काम इतक्या लवकर आणि सहज झाले नसते. अरुंद गल्लीत बांधकाम सामग्री ठेवली गेली तेव्हा मुस्लिम कुटुंबांनी आपल्या घरांमधून आम्हाला रस्ता दिला. पाण्याची गरज पडली, तेव्हा त्यांनी आपल्या पंपाद्वारे पाणी पुरवले. एवढेच नव्हे, मूर्ती स्थापनेच्या दिवशी प्रसादही आमच्या मुस्लिम भाऊ बिट्टूच्या घरी बनला, आणि सगळ्यांनी मिळून भंडारा केला.”
पुजाऱ्यांची भावनिकता आणि आमदारांचे योगदान
पुजारी लालमणी शुक्ला गेल्या 23 वर्षांपासून या मंदिराची सेवा करत आहेत. मंदिराच्या पुनर्निर्माणावर ते भावुक होऊन म्हणतात, “आम्ही कसेबसे पैसे जमवले, पण खरी मदत आमच्या मुस्लिम भावांनी आणि स्थानिक आमदार चौधरी जुबैर अहमद यांनी केली. आमदारांनी स्पष्ट सांगितले – ‘पंडितजी, तुम्ही मंदिर बांधा, काही अडचण आली तर मला सांगा. मी तुमच्या पाठीशी आहे.’”
सीलमपूरचे आमदार चौधरी जुबैर अहमद यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर कामात कोणताही अडथळा येऊ नये याची खातरजमाही केली. ते म्हणाले, “माझे वडील मतीन अहमद यांनी आम्हाला नेहमी शिकवले की, माणुसकी सर्वात वर आहे. हे मंदिर आमच्या परिसराची सांस्कृतिक वारसा संपदा आहे, आणि याचे पुनर्निर्माण हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे प्रतिक आहे.”
जाफराबादने दिला हिंदू-मुस्लिम एकतेचा दाखला
दिल्लीचा आत्मा तिच्या विविधतेत आणि गंगा-जमुनी संस्कृतीत वसलेला आहे, हेच या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे. स्थानिक रहिवासी अकरम खान सांगतात, “आमच्या मोहल्ल्यात कधीही धर्मावरून मतभेद झाले नाहीत. मंदिर असो की मशीद, हे सगळे आमच्या संमिश्र संस्कृतीचा भाग आहेत. जेव्हा आम्हाला कळले की मंदिराची अवस्था खराब आहे, तेव्हा आम्ही तातडीने मदत करण्याचा निर्णय घेतला.”
पुनर्निर्माणानंतर मूर्ती स्थापना आणि हवन-पूजनाचा भव्य समारंभ झाला. या दिवशी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांचे लोक एकत्र बसले, प्रसाद घेतला आणि बंधुभावाचा संदेश दिला. मंदिर समितीचे अध्यक्ष रामकुमार पांडे म्हणाले, “हे फक्त मंदिराचे पुनर्निर्माण नाही, तर समाजात प्रेम आणि सहकार्याचा विजय आहे.”
सद्भावना कांवड सेवा शिबिर – बंधुभावाचे प्रतीक
मंदिराच्या पुनर्निर्माणानंतर काहीच दिवसांनी आमदार चौधरी जुबैर अहमद यांनी 16 जुलैला ‘सद्भावना कांवड सेवा शिबिर’ सुरू केले. दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी याचे उद्घाटन केले. आतिशी म्हणाल्या, “हे शिबिर आणि मंदिराचे पुनर्निर्माण धर्माच्या नावावर द्वेष पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर आहे. खरा भारत तोच आहे, जिथे मंदिर, मशीद आणि गुरुद्वारे एकत्र उभे असतात.”
चौधरी जुबैर सांगतात की, हे शिबिर त्यांचे वडील मतीन अहमद यांनी इसवी सन 1994 मध्ये सुरू केले होते. दरवर्षी मुस्लिम समुदाय शिवभक्तांना जेवण, पाणी आणि आश्रय पुरवतो. जुबैर म्हणतात, “धर्माच्या नावावर द्वेष पसरवणे सोपे आहे, पण प्रेमाचा संदेश देणे ही खरी सेवा आहे.”
सांस्कृतिक महत्त्व आणि सामाजिक संदेश
स्थानिक मंडळी मंदिराचे पुनर्निर्माणाच्या घटनेकडे केवळ धार्मिक गोष्ट म्हणून बघत नाही. विविधता हीच दिल्लीची खरी ताकत आहे, हा मोठा सांस्कृतिक संदेश या घटनेने दिला आहे. जाफराबादसारख्या मुस्लिमबहुल परिसरात हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन मंदिर बांधतात, तेव्हा ही बाब देशासाठी प्रेरणादायी बनली आहे.
एक ज्येष्ठ स्थानिक रहिवासी म्हणाले, “आम्ही डोळ्यांनी पाहिले की, हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र आले होते. विटा उचलून, पाणी भरून आणि प्रसाद बनवून मंदिर उभारणीत योगदान देत होते. हा नजारा एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता.”
Delhi: A newly constructed Laxmi Narayan Temple has been completed in Indira Chowk, Jafrabad, a Muslim-majority area of Northeast Delhi, with support from local residents across communities contributing to the reconstruction. AAP MLA Chaudhary Zubair Ahmad attends the event… pic.twitter.com/pVHsQbe7M1
— IANS (@ians_india) July 17, 2025
गंगा-जमुनी संस्कृतीचा संदेश
दिल्लीचा इतिहास नेहमीच एकत्रित संस्कृतीचा आणि बंधुभावाचा राहिला आहे. मग ती जुन्या दिल्लीच्या गल्ल्या असोत किंवा सीलमपूर-जाफराबादचा परिसर, येथे मंदिर आणि मशीद दोन्हींना समान महत्त्व आणि सन्मान आहे. लक्ष्मी नारायण मंदिराचे हे पुनर्निर्माण त्याच संस्कृतीचा भाग आहे.
ही घटना केवळ धार्मिक श्रद्धेची बाब नाही. तर हा पुरावा आहे की, जेव्हा लोक सद्भावनेने एकत्र येतात तेव्हा प्रत्येक अवघड काम सोपे होते. हा संदेश फक्त दिल्लीसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी आहे की, माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे.