आल्हाद जोशी
जळगावच्या एरंडोल शहरात एक मुस्लीम कुटुंब गेल्या ३७ वर्षांपासून आगळीवेगळी परंपरा जपत आहे. डॉ. के. ए. बोहरी यांच्या घरात दरवर्षी सर्व धार्मिक विधी करून गणेशाची स्थापना केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात गुंतलेले असूनही त्यांनी श्रद्धा आणि व्यवसाय यांचा समन्वय साधत ही परंपरा अखंड सुरू ठेवली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरात ठिकठिकाणी उत्साहाचे वातावरण असताना बोहरी कुटुंबाकडे होणारी बाप्पाची स्थापना समाजाला धार्मिक सौहार्दाचा संदेश देते.
यामुळे करतात गणेश स्थापना
डॉ. के. ए. बोहरी व त्यांच्या पत्नी डॉ. एन. के. बोहरी या दाम्पत्याने तब्बल ५० वर्षांपासून रुग्णसेवेत वाहून घेतले आहे. त्यांची दुसरी पिढी सुद्धा वैद्यकीय सेवेत आहेत. डॉ. बोहरी यांचे पुत्र डॉ. फरहाज बोहरी हृदयरोगतज्ज्ञ, तर त्यांच्या पत्नी डॉ. अंब्रिन बोहरी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. फरहाज बालवाडीत जात असताना त्यांनी मित्रांच्या घरी गणेशोत्सवाला जात असे. त्यावेळी गणपतीची स्थापना करण्याची भावना त्यांच्या मनात आलो. त्यांनी आपल्या वडिलांकडे गणपतीची स्थापना करण्याचा हट्ट धरला. डॉ. बोहरी यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलगा फरहाज याचा हट्ट पुरवून घरी गणपतीची स्थापना केली.
३७ वर्षांची अखंड परंपरा
तब्बल ३७ वर्षांपासून अखंडितपणे गणेशाची स्थापना करून बोहरी परिवाराने सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी डॉ. फरहाज बाहेरगावी गेल्यानंतरही त्यांचे वडील डॉ. बोहरी यांनी गणपती स्थापनेत खंड पडू दिला नाही. डॉ. फरहाज हे शाळा, महाविद्यालय व वैद्यकीय शिक्षण घेत असताना प्रत्येक ठिकाणी गणेशोत्सवात सहभागी होऊन उत्सव साजरा केला.
यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा
नेहमीप्रमाणे बोहरी यांनी म्हसावद रस्त्यावरील त्यांच्या दवाखान्यात आकर्षक सजावट करून गणेशाची स्थापना केली. गणेशोत्सवात बोहरी परिवारातील सर्व सदस्य नियमितपणे सकाळी व सायंकाळी आरतीसह सर्व धार्मिक विर्धीमध्ये सहभागी होतात. पाच दिवसांनंतर गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. यावर्षी स्थापनेच्या समारंभावेळी अहिरराव, हेमंत कुलकर्णी, अॅड. मोहन शुक्ला, एन. डी. काळकर, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, नंदा शुक्ला, मीना पवार, समाधान बडगुजर, गोपाल पाटील यांच्यासह दवाखान्यातील कर्मचारी व मित्रपरिवार उपस्थित होता.
गेल्या ३७ वर्षांपासून बोहरी कुटुंबाकडून होत असलेली गणेशाची स्थापना ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक सौहार्दाचा एक संदेश आहे. गणेशोत्सव हा आनंद, एकता आणि बंधुभावाचा उत्सव असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. बाप्पाच्या आराधनेतून मिळणारे मानसिक समाधान आणि एकत्र येणारा मित्रपरिवार, यातून आनंद मिळत असल्याचे बोहरी कुटुंबाने सांगितले.