'यूपीएससी'त गरुडझेप : इन्शा खान आणि शाहरुख खान यांनी मिळवले सर्वोच्च यश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
डावीकडून इन्शा खान आणि शाहरुख खान
डावीकडून इन्शा खान आणि शाहरुख खान

 

युनूस अल्वी

'पुलाखालून आता बरेच पाणी वाहून गेले आहे'. ही म्हण आता हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील मेवात भागाला अगदी तंतोतंत लागू पडते. हा भाग एकेकाळी सोन्याच्या नावाखाली फसवणूक, गोहत्या आणि सायबर गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध होता. पण आता बदलत्या काळानुसार तो स्वतःची नवी ओळख निर्माण करू लागला आहे. आता मेवातच्या मातीतून गुन्हेगारीच्या बातम्या कमी येतात. त्याऐवजी यशाचीच गाथा अधिक ऐकायला मिळते. इथले तरुण आता शिक्षणासाठी खूप उत्सुक आहेत. ते देशातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत आहेत.

'यूपीएससी' २०२५ च्या निकालांनी या बदलावर शिक्कामोर्तब केले आहे. देशभरात यशस्वी झालेल्या ५३ मुस्लिम तरुणांपैकी इन्शा खान आणि शाहरुख खान हे दोघे मेवातचे सुपुत्र आहेत. हे यश म्हणजे केवळ एखादे पद मिळवणे नाही. तर या भागावर अनेक दशकांपासून लागलेला नकारात्मक डाग पुसून काढण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे.

"हा बदल मेवातसाठी अत्यंत सकारात्मक संकेत आहे. आजवर इथून फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्याच्या बातम्या येत असत. पण प्रशासकीय सेवेतील हे यश एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे", असे नूहचे ज्येष्ठ वकील नुरुद्दीन नूर यांनी स्पष्ट केले.

f इन्शा खान यांची कहाणी संघर्ष आणि हिमतीचे एक उत्तम उदाहरण आहे. ते मेवातच्या कामां जिल्ह्यातील टायरा गावचे रहिवासी आहेत. इन्शा यांनी 'यूपीएससी' (UPSC) परीक्षेत ६७८ वी रँक मिळवली आहे. या यशामागे सलग पाच वेळा आलेले अपयश आणि सहाव्या प्रयत्नातील त्यांचा अतूट विश्वास दडलेला आहे. २०१२ मध्ये त्यांनी फिरोजपूर झिरका येथील अरावली पब्लिक स्कूलमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कुरुक्षेत्र येथील 'एनआयटी' (NIT) कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना टाटासारख्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर आली होती. त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळणार होते. पण इन्शा यांनी ही ऑफर थेट नाकारली. ते पूर्णवेळ यूपीएससीच्या तयारीला लागले. अनेकदा त्यांनी मुख्य परीक्षा दिली. अनेकदा ते मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचून माघारी परतले. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. आज त्यांना हे मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण गाव आनंदात बुडाले आहे.

इन्शा आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील आणि मोठा भाऊ सीए मुख्तियार अहमद यांना देतात. आपण कधीही टॉपर किंवा असामान्य विद्यार्थी नव्हतो, असे ते अगदी प्रांजळपणे सांगतात. आपण एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो, हे त्यांनी मान्य केले आहे. एका साध्या गावातला मुलगा हे यश मिळवू शकतो, तर मेहनत करणारा कुणीही हे शिखर गाठू शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

इन्शा यांच्या यशामागे त्यांचे वडील उस्मान खान यांच्या कठोर मेहनतीची आणि संघर्षाची मोठी कहाणी आहे. मुलांनी चांगले शिकावे, यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला. त्यांनी तब्बल ३७ वर्षे दूध विकण्याचे काम केले. आज आपला मुलगा मोठा अधिकारी बनला आहे. हे पाहून त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळतात.

"ही केवळ मेहनत नाही. तर ही प्रामाणिकपणाची कमाई आणि समाजाच्या आशीर्वादाची ताकद आहे", अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इन्शा यांच्या आईनेही तो जुना काळ आठवला. इन्शा सहावीत असतानाच त्यांनी त्याला हॉस्टेलला पाठवले होते. मुलाला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी काळजावर दगड ठेवून त्याला स्वतःपासून दूर ठेवल्याचे त्यांनी सांगितले. आज त्याच मुलाने संपूर्ण परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे.

शाहरुख खान यांची प्रेरणादायी कहाणी

मेवातची दुसरी यशोगाथा पलवल जिल्ह्यातील उटावड गावच्या शाहरुख खान यांची आहे. त्यांनी यूपीएससीमध्ये ५७५ वी रँक मिळवली आहे. आपला एखादा मुलगा मोठा सरकारी अधिकारी बनावा, हे त्यांचे वडील मोहम्मद ताहिर यांचे स्वप्न होते. पण मुलाचे हे मोठे यश पाहण्यासाठी ते आज जगात नाहीत.

सात महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शाहरुख यांनी वडिलांचे ते स्वप्न उराशी बाळगले. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी हे उत्तुंग यश मिळवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच सेंट जॉन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर पलवल आणि दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. जामियाच्या निवासी कोचिंगमध्ये त्यांनी रात्रंदिवस प्रचंड मेहनत घेतली. चार भावांमध्ये शाहरुख तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या यशाने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे. नूह आणि हथीनच्या स्थानिक आमदारांनीही हा मेवातसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

ग्रामीण भागात नेहमीच साधनसामग्रीची मोठी कमतरता असते. पण इरादे पक्के असतील, तर मार्ग आपोआप सापडतात. मेवातचा तरुण आता भरकटणार नाही. तो देश चालवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, हे शाहरुख यांच्या यशाने सिद्ध केले आहे. मेवात आता वेगाने बदलत आहे. या भागाकडे केवळ गुन्हेगारी आणि वाईट नजरेने पाहणे चुकीचे आहे, असे सामाजिक कार्यकर्ते वसीम अकरम यांनी स्पष्ट केले.

इन्शा आणि शाहरुख यांचे यश केवळ त्यांच्या कुटुंबाचे यश नाही. तर शिक्षण आणि मेहनतीलाच सर्वांत मोठे हत्यार मानणाऱ्या संपूर्ण समाजाचा हा मोठा विजय आहे. मेवातच्या मागासलेपणाच्या बेड्या आता तुटू लागल्या आहेत. संसाधनांच्या कमतरतेचे रडगाणे गाणाऱ्या सर्व तरुणांसमोर या यशाने एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.

आज नूह, कामां, डीग आणि पलवलच्या गावांमध्ये चर्चा पूर्णपणे बदलली आहे. कोणी कोणता गुन्हा केला, यावर आता कुणीही बोलत नाही. तर आपल्यातून पुढचा कलेक्टर किंवा एसपी कोण बनेल, याचीच चर्चा सर्वत्र सुरू असते. मेवात आता सायबर ठकबाजी आणि गुन्हेगारीच्या दुनियेतून पूर्णपणे बाहेर पडत आहे. पुस्तके आणि शिक्षणाच्या माध्यमातून हा भाग आता स्वतःचे भविष्य नव्याने घडवत आहे.

इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल, तर काहीही अशक्य नाही. एखादा भाग कितीही मागासलेला किंवा बदनाम असला, तरी तिथूनही देशासाठी सक्षम आणि यशस्वी अधिकारी घडू शकतात. इन्शा आणि शाहरुख यांची कहाणी हेच सिद्ध करते. मेवात आता केवळ त्याच्या भूतकाळासाठी नाही, तर एका अत्यंत उज्ज्वल भविष्यासाठी नक्की ओळखले जाईल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter