अशफाक कायमखानी
राजस्थानच्या वाळवंटी मातीचा इतिहास नेहमीच शौर्याने भरलेला आहे. इथल्या कणाकणात वीर आणि वीरांगनांच्या कथा दडलेल्या आहेत. इथल्या हवेतच शौर्य, शिस्त आणि देशभक्तीचा सुगंध दरवळतो. भारतीय लष्करातील मुस्लिम महिला अधिकाऱ्यांचा विषय निघतो, तेव्हा काही मोजकीच नावे आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील नुआन या छोट्याशा गावातील एका लेकीने इतिहासाच्या पानांवर स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
कर्नल इशरत अहमद असे या रणरागिणीचे नाव आहे. या डॅशिंग अधिकाऱ्याच्या रक्तातच लष्करी सेवेचे बाळकडू आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब आज लष्करी आणि प्रशासकीय सेवेचे एक उत्तम उदाहरण बनले आहे.
झुंझुनू मधील नुआन गावाला उगीच 'अधिकाऱ्यांचे गाव' म्हणत नाहीत. या गावाची ओळख केवळ नकाशापुरती मर्यादित नाही. तर ती बुद्धिमत्ता आणि सेवेच्या मोठ्या वारशाशी जोडलेली आहे. याच गावची लाडकी लेक इशरत अहमद यांना नुकतीच मेरठमधील भारतीय लष्कराच्या 'ऑर्डनन्स युनिट'ची जबाबदारी देण्यात आली.

हे यश केवळ एक बढती नाही. तर तो कायमखानी समाज आणि संपूर्ण राजस्थानसाठी अभिमानाचा क्षण आहे. लष्करात इतक्या महत्त्वाच्या आणि मोक्याच्या पदावर पोहोचणाऱ्या त्या या समाजातील पहिल्याच महिला अधिकारी आहेत.
इशरत अहमद यांना हे यश सहजासहजी मिळालेले नाही. हा त्यांच्या भक्कम कौटुंबिक संस्कारांचा आणि शिस्तीच्या प्रदीर्घ साधनेचा परिणाम आहे. त्यांचे दिवंगत वडील लेफ्टनंट कर्नल जकी अहमद हे नुआन गावचे पहिले अधिकारी होते. त्यांनी १९७१ मध्ये लष्कराच्या शिक्षण विभागात थेट कमिशन मिळवले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीला नेहमीच सर्वोच्च स्थान दिले.
हेच संस्कार इशरत आणि त्यांच्या भावंडांमध्ये अगदी खोलवर रुजले आहेत. त्यांचे भाऊ साकिब हुसैन हे भारतीय लष्करात ब्रिगेडियर पदावर आहेत. कायमखानी समाजाचे पहिले ब्रिगेडियर होण्याचा मान त्यांच्याकडे जातो. या कुटुंबाने लष्करात केवळ सहभाग नोंदवला नाही. तर त्यांनी खऱ्या अर्थाने लष्कराचे नेतृत्व केले आहे.
इशरत यांचे आजोबाही लष्करात कॅप्टन होते. घरात लहानपणापासूनच वर्दी, पदके आणि शिस्तीचे वातावरण असल्याने लष्करात जाणे ही त्यांच्यासाठी एक नैसर्गिक दिशा होती. २००१ मध्ये चेन्नईतून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी भारतीय लष्करात पाऊल ठेवले. त्यांनी स्वतःला प्रत्येक कठीण आव्हानासाठी तयार केले. वारसा केवळ नावाने चालत नाही. तो कर्तृत्वाच्या जोरावर पुढे न्यावा लागतो, हे त्यांनी सिद्ध केले.
कर्नल इशरत यांचे कुटुंब केवळ लष्करापुरते मर्यादित नाही. प्रशासकीय सेवांमध्येही या कुटुंबाचा मोठा दबदबा आहे. त्यांचे काका अशफाक हुसैन आणि झाकीर हुसैन हे भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर काम केले. कुटुंबाचे जावई कमरुल जमान चौधरी सध्या सीकरचे जिल्हाधिकारी आहेत.
पोलीस सेवेचा विचार केल्यास दिवंगत लियाकत अली खान हे राजस्थानचे पहिले मुस्लिम 'आयजी' होते. इशरत यांची बहीण फराह हुसैन या भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) अधिकारी आहेत. तर दुसरी बहीण कायनात खान या जयपूर सचिवालयात 'विधी रचनाकार' पदावर कार्यरत आहेत.
प्रशासकीय सेवेतील या कुटुंबाची यादी खूप मोठी आहे. शाहीन खान, मोनिका शाहीन खान (डीआयजी जेल), सलीम खान, सना खान आणि जावेद खान ही सर्व नावे राजस्थान प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. एकाच कुटुंबात एवढे उच्चपदस्थ अधिकारी असणे ही खूप मोठी आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.
एवढे मोठे यश मिळवूनही कर्नल इशरत अहमद अत्यंत साध्या आहेत. त्यांना प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहायला आवडते. त्यांची बहीण शबनम खान सांगतात, इशरत जेव्हा गावी येतात, तेव्हा त्यांचा संपूर्ण वेळ तरुणांना आणि विशेषतः मुलींना मार्गदर्शन करण्यात जातो. त्या मुलींना लष्करात करिअर कसे करावे, याचे धडे देतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतात.
"वर्दी ही केवळ एक नोकरी नाही, तर ती देश आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे प्रतीक आहे", असे इशरत मानतात.

त्यांची आई शमीम बानो यांच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आपला मुलगा आणि मुलगी दोघेही लष्कराच्या उच्च पदांवर देशसेवा करत आहेत, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. मेरठमध्ये जेव्हा कर्नल इशरत यांनी आपल्या युनिटची धुरा हाती घेतली, तेव्हा त्यांची आई आणि ब्रिगेडियर भाऊ साकिब हुसैन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. हे दृश्य बदलत्या सामाजिक परिस्थितीचा आणि मुस्लिम महिलांच्या वाढत्या सहभागाचा एक मोठा संदेश देणारे होते.
कायमखानी समाजासाठी हे यश अत्यंत मोलाचे आहे. हा समाज ऐतिहासिकदृष्ट्या शौर्यासाठी ओळखला जातो. पण आता आधुनिक काळात त्यांनी शिक्षण आणि प्रशासकीय सेवेतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कर्नल इशरत यांच्या यशामुळे समाजात एका नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे. हे यश येणाऱ्या पिढ्यांसाठी एका दीपस्तंभासारखे काम करेल.
वारसा केवळ पद आणि प्रतिष्ठेने निर्माण होत नाही. सततची मेहनत आणि शिस्तीच्या जोरावरच तो टिकवून ठेवावा लागतो. कर्नल इशरत अहमद यांची कहाणी हेच सांगते. १९९५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर या कुटुंबाने ज्या धैर्याने स्वतःला सावरले आणि प्रगती केली, ती खरोखरच प्रेरणादायी आहे. कठीण परिस्थितीही मजबूत इच्छाशक्तीसमोर झुकते, हे या कुटुंबाने दाखवून दिले.
आज कर्नल इशरत अहमद मेरठमध्ये लष्कराच्या ऑर्डनन्स युनिटचे नेतृत्व करत आहेत. हे पाहून नुआन गावच्या प्रत्येक लेकीच्या डोळ्यांत आता नवे स्वप्न आकार घेत आहे. अंगावर वर्दी चढवण्याचे आणि देशाची सेवा करण्याचे हे स्वप्न आहे. इशरत अहमद हे आता केवळ एक नाव नाही. तर तो एक मोठा विश्वास बनला आहे.
राजस्थानची माती आणि लष्करी घराण्यांची शिस्त मिळून भारताचे भविष्य अधिक मजबूत करत आहेत. ही कहाणी आपल्याला हेच शिकवते. कुटुंबाकडून मिळालेले संस्कार, शिक्षणाची योग्य जोड आणि स्वतःची कठोर मेहनत असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. कर्नल इशरत अहमद आजचे वास्तव आहेत आणि उद्याची प्रेरणाही आहेत. जेव्हा मुली खंबीरपणे पुढे जातात, तेव्हा त्या केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण करत नाहीत. त्या संपूर्ण समाजाच्या आशांना एक नवी भरारी देतात.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -