रमजानमध्ये भाविकांना मोफत सेवा देणारे अजमेरचे 'हॉटेल वैभव'

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
'हॉटेल वैभव'चे मालक आणि इफ्तारचे आयोजन
'हॉटेल वैभव'चे मालक आणि इफ्तारचे आयोजन

 

मलिक असगर हाश्मी

अजमेरमध्ये खाटूश्याम यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी शुक्रवारच्या नमाजच्यावेळी मस्जिदसमोर डीजे बंद केला. नमाज झाल्यावर मुस्लीम बांधवांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. त्याचवेळेस अजमेरमधून जातीय सलोखा वाढवणारी आणखी सुखद घटना समोर आली. अजमेरच्या एका हिंदू हॉटेल मालकाने रमजानमध्ये उपवास करणाऱ्यांसाठी हॉटेलकडून सर्व सेवा मोफत देण्यात येत आहेत.

'हॉटेल वैभव' असे या हॉटेलचे नाव आहे. अजमेर शरीफ दर्ग्याच्या अगदी जवळ नया बाजार येथे हे हॉटेल आहे. याविषयी माहिती देताना मालक आदित्य गोयल सांगतात, “वडिलांनी एका खोली पासून हा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. आता हॉटेलला १३ खोल्या आहेत.'' 

रमजानमध्ये रोजा ठेवणाऱ्यांना मोफत सुविधा देण्याचा उपक्रमामागची कहाणी सांगताना ते म्हणतात,  “२०१६ मध्ये रमजानच्या महिन्यात तीन-चार जण आमच्या वडिलांकडे आले. तेव्हा आमच्याकडे एकच खोली होती. त्यांनी सांगितले की महिनाभर आम्हाला इथे राहायचे आहे, पण आमच्याकडे एक महिन्याचे भाडे भरण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. यावर वडिलांनी त्यांना ‘बिल बनवताना हिशोब करू’ असे सांगत त्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली.  महिनाभरानंतर हे लोक जाताना वडिलांनी त्याच्याकडून एक रुपयाही घेतला नाही. तेव्हापासून सुरु झालेला रोजे ठेवणाऱ्यांच्या मोफत सेवेचा उपक्रम आजतागायत सुरु आहे. आजवर आम्ही तब्बल ५१२ जणांना मोफत सेवा पुरवली."

हॉटेलमध्ये इफ्तार आणि नमाजची सुविधाही उपलब्ध
रमजानच्या काळात उपवास करणाऱ्यांसाठी हॉटेलमधील सर्व सोयी मोफत पुरवल्या जातात. सोबतच संधाकाळी त्यांच्यासाठी  इफ्तारची व्यवस्था केली जाते. याविषयी आदित्य माहिती देतात, " रमजानच्या महिन्यात येथे रोज इफ्तारची सोय केली जाते. इफ्तार केवळ हॉटेलमध्ये राहणाऱ्यांपुरतीच मर्यादित नाही. परिसरातील लोकही इफ्तार करण्यासाठी हॉटेलमध्ये आवर्जून येतात.  उपवास सोडल्यानंतर लगेच नमाज अदा केली जाते. हॉटेलमध्ये राहणाऱ्यांना नमाजसाठी इतरत्र कुठेही जावं लागू नये यासाठी इथेच नमाजाची स्वतंत्र व्यवस्थाही करण्यात आली आहे."

ते पुढे सांगतात, “कोरोनानंतर आमचा व्यवसाय कसा बसा सुरु झाला होता, तेव्हादेखील वडलांनी रोजेदारांसाठी हॉटेलच्या सोयी मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. याविषयी मी नापसंती दर्शवली होती. मात्र माझी समजूत काढत ते म्हणाले - 'त्यांच्यामुळेच आपण वर्षभर कमाई करतो. मग एक महिना त्यांचावर खर्च का करू शकत नाही?'
 

हॉटेलचे मालक आदित्य गोयल आणि वडील जितेंद्र गोयल 
 
आदित्य पुढे म्हणतात,  “श्रद्धाळू लोक इकडे येतात आणि अशा लोकांसाठी मी काहीतरी करू शकतो, याचा मला आनंद आहे.”

ऑनलाईन बुकिंगची सोयही उपलब्ध
गोयल यांचे 'हॉटेल वैभव' ओयोसारख्या ऑनलाईन साईट्सवर बुकिंगसाठी उपलब्ध आहे. या ॲपवर ‘हॉटेल वैभव’ निवडून ‘रमजान वैभव’ हा कोड इंग्रजीत टाकल्यास हॉटेलची खोली अगदी मोफत बुक केली जाते.

ब्रुट या माध्यमाचे प्रतिनिधी  डेव्हिड जॉन यांनी या हॉटेलवर व्हिडीओ स्टोरीदेखील केली आहे. रमजानच्या काळात इथे विशेष सजावट केली जात असल्याचे ते सांगतात. रमजानच्या काळात हॉटेलमध्ये राहणाऱ्या आणि  इफ्तार करणाऱ्या मंडळींना ते भेटले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. थ्री-व्हीलर चालवणारे एक कर्नाटकी व्यक्ती आपल्या कुटुंबासह इथे थांबली होती. हे भाविक कुटुंब अजमेर दर्गाहच्या दर्शनाला आले होते. तिथेच त्यांना 'हॉटेल वैभव'मधील विशेष सुविधेविषयी माहिती मिळाली होती.

अध्यात्मिक पर्वात सहभाग
समाजाला धार्मिक सौहार्दाचा संदेश देणाऱ्या या अनोख्या उपक्रमाबद्दल 'हॉटेल वैभवचे' व्यवस्थापकीय संचालक आदित्य गोयल म्हणाले,  “ रमजान हा उपासनेचा, चिंतनाचा आणि दानधर्माचा महिना आहे. त्यात आमचाही हातभार लागावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. गरजूंची मदत करून सामाजिक जबाबदारीच निभावत आहोत, असेच आम्हाला वाटते."

रमजान पाळू इच्छिणाऱ्या कोणाही व्यक्तीच्या अध्यात्मिक अनुभूतीच्या आड त्याची आर्थिक परिस्थिती अडथळा ठरू नये असे आम्हाला वाटते. त्यामुळे अजमेरमधील आमच्या इतर हॉटेल्समध्येही ही सोय उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

कसा होता रमजानमध्ये इथे येणाऱ्या रोजेदारांचा अनुभव
'हॉटेल वैभव'मधील आपल्या वास्तव्याविषयीच अनुभव सांगताना मध्यप्रदेशातील मंदसौरचे जब्बार मन्सुरी म्हणाले, "हॉटेल वैभव आणि ओयोचा यांचा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. रमजानमागची  भावनादेखील हीच आहे. 'हॉटेल वैभव'ने उपलब्ध करून दिलेल्या या सोयीमुळे  समाजातील वंचित घटकही नातेवाईकांसोबत रमजान साजरा करू शकतो."

ते पुढे म्हणाले, "इथे राहण्याची उत्तम व्यवस्था होती.  येथील सोयीमुळेच आम्ही या काळात तरावीहची नमाज, कुराणचे पारायण आणि रमजानशी संबंधित इतर उपासना अगदी सहजपणे करू शकलो."

अजमेरमधील ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती यांचा दर्गाह केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अल्लाहची कृपादृष्टी व्हावी यासाठी रमजानच्या महिन्यात लाखो भाविक आवर्जून या दर्गाहला भेट देतात.

(अनुवाद: पूजा नायक)
 
- मलिक असगर हाश्मी

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter