डॉ. समीर शहा
जागतिक माध्यम विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’च्या (बीबीसी) अध्यक्षपदी भारतीय वंशाचे माध्यमतज्ज्ञ डॉ. समीर शहा (वय ७१) यांची निवड करण्यात आली आहे. शहा यांना दूरचित्रवाणी निर्मिती आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील ४० वर्षांचा अनुभव आहे. ‘बीबीसी’च्या अध्यक्षपदासाठी शहा यांच्या नावाची शिफारस ब्रिटन सरकारकडूनच करण्यात आली होती. शहा यांना २०१९ मध्ये ‘सीबीई’ (कमांडर ऑफ दि मोस्ट एक्स्टलंट ऑर्डर ऑफ दि ब्रिटिश एम्पायर) या सन्मानाने राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
दूरचित्रवाणी आणि वारसा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता. शहा हे आता रिचर्ड शार्प यांची जागा घेतील. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबतच्या संवादामुळे अडचणीत आलेल्या शार्प यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे बोलले जाते.
‘बीबीसी’ची सूत्रे हातात घेण्यापूर्वी शहा यांची ‘हाउस ऑफ कॉमन्स मीडिया कल्चर’ आणि माध्यम आणि क्रीडा क्षेत्रातील निवडीपूर्वीच्या पडताळणी समितीमधील खासदार हे उलटतपासणी करतील. या निवडीबाबत बोलताना ब्रिटनच्या सांस्कृतिक व्यवहार खात्याच्या मंत्री ल्युसी फ्रेझर म्हणाल्या, ‘‘ शहा यांचा चाळीस वर्षांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्यामुळे ‘बीबीसी’च्या अध्यक्षपदाचा गौरव वाढेल. झपाट्याने बदलणाऱ्या माध्यम विश्वात ‘बीबीसी’ला यशस्वी करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांच्याकडे असून नव्या संधी हेरण्याबरोबरच आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यही त्यांच्याकडे आहे.’’
समीर शहा म्हणाले...
वैश्विक संस्कृतीमध्ये ‘बीबीसी’चे निर्विवादपणे मोठे योगदान असून हेच आपले बलस्थान देखील आहे. माझ्याकडे असलेली कौशल्ये, अनुभव या बळावर संस्थेसमोरील जटिल आणि विविधांगी आव्हाने यांचा सामना मला करावा लागणार असून ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. या स्पर्धात्मक बाजारपेठेत मला जे काही सर्वोत्कृष्ट करणे मला शक्य आहे ते मी करेन.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शहांचा जन्म
समीर शहा यांचा जन्म हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे. पुढे ते करिअरनिमित्त १९६० मध्ये इंग्लंडला आले. ते याआधी ‘बीबीसी’च्या चालू घडामोडी आणि राजकीय कार्यक्रमाचे प्रमुख होते. दूरचित्रवाणी आणि नभोवाणीच्या निर्मितीक्षेत्रातील ‘जुनिपर’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि मालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते २००७ ते २०१० या काळामध्ये ‘बीबीसी’चे बिगर कार्यकारी संचालक होते.
विविध वंशांचा अभ्यास
ऑक्सफर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या शहा यांनी विविध वंशांचाही सखोलपणे अभ्यास केला आहे. ब्रिटिश सरकारच्या वंश आणि विविध समुदायांतील असमानतेबाबत २०२१ मध्ये तयार करण्यात आलेल्या अहवालाचे ते सहलेखक होते. मागील वर्षी लेईसेस्टर येथे निर्माण झालेल्या वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती, त्यात शहा यांचाही समावेश होता.
करदात्यांचे हित सांभाळावे लागणार
‘बीबीसी’ चे अध्यक्ष या नात्याने आठवड्यातील तीन दिवस त्यांना काम करावे लागणार असून त्यांचे वार्षिक वेतन हे १ लाख ६० हजार पौंड एवढे असेल. ‘बीबीसी’ ला ब्रिटिश करदात्यांकडून पैसे मिळतात त्यामुळे करदात्यांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. याशिवाय माहिती देणे, शिक्षित आणि मनोरंजन करणे आदी माध्यमसंस्थेची मूलभूत तत्त्वेही त्यांना पाळावी लागतील.