शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य फिरोज बादशाह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
फिरोज बादशाह
फिरोज बादशाह

 

शिक्षण क्षेत्रातील भीष्मपितामह म्हणून परिचित असलेले शिक्षक चळवळीतील ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे व महाराष्ट्र ‘टीडीएफ’चे अध्यक्ष फिरोज बादशाह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मालेगाव हायस्कूलचे शिक्षक शोएब बादशाहा यांचे ते वडील होत.
 
श्री. बादशाह यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मालेगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

१९९२ मध्ये ते निवृत्त झाले. जे. बी. सोनार, माजी आमदार टी. एफ. पवार, फिरोज बादशहा यांना शिक्षक चळवळीतील त्रिदेव म्हणून ओळखले जात होते.

१९७७ मध्ये शिक्षकांना केंद्राप्रमाणे वेतन व भत्ते मिळावे, बँकेतून शिक्षकांचे वेतन व्हावे, यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ५४ दिवसांचा ऐतिहासिक संप झाला होता. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.

फुटबॉलचे ते खेळाडू होते. वाचनाची त्यांना आवड होती. अखेरपर्यंत देशभरातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी ते अहोरात्र झटले. सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून शिक्षक त्यांच्याकडे आदराने बघत. त्यांनी शेकडो आंदोलने केली.

सहाव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे वेतनवाढ मिळावी, यासाठी त्यांनी मालेगाव, नाशिक, मुंबई-आझाद मैदान ते दिल्लीतील रामलीला मैदानापर्यंत लढा दिल्याने राज्यातील शिक्षकांना योग्य वेतनवाढ मिळाली. राज्यातील अनेकांना शिक्षक आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.