इस्लामचा इतिहास आणि इस्लामिक तत्त्वज्ञानाचे उत्कृष्ट अभ्यासक 'शिबली नोमानी' यांनी एकीकडे इतिहास, धर्म आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित विषयांवर आपल्या कृतींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले तर दुसरीकडे अभ्यास आणि संशोधनाच्या दृष्टिकोनातून आधुनिक संस्थांच्या उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावली. जगाला शिक्षित करण्याच्या उद्देशाने वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी १८८३ मध्ये आझमगडमध्ये ‘नॅशनल स्कूल’ची स्थापना केली. हीच स्कूल पुढे 'शिबली नॅशनल कॉलेज' नावाने नावारूपास आली. तसेच लखनौ येथे असलेल्या नदवातुल उलमांच्या दारुल उलूम(ज्ञान केंद्र) या मदरशच्या स्थापनेत आणि जडणघडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. याव्यतिरिक्त इस्लामिक तत्त्वज्ञान आणि इतिहासाशी संबंधित संशोधनासाठी अकादमी स्थापन करण्याची कल्पनाही त्यांचीच...
अशाच प्रतिभावंत व्यक्तीच्या कामाचा आढावा घेण्याआधी त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा आढावा घेऊ...
जन्माने राजपूत असणाऱ्या शिबली नोमानी यांचा जन्म १८५७ मध्ये आझमगढजवळील बंदवाल येथे झाला. मात्र शिबली यांनी इमाम अबू हनीफा यांच्याशी असलेले त्यांचे नाते उघड करण्यासाठी त्यांच्या नावासह 'नोमानी' लिहिण्यास सुरुवात केली.
त्यांचे वडील आझमगडचे मोठे जमीनदार आणि पेशाने वकील होते.त्यांनीच शिबलीला धार्मिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आणि शिबलीने फारसी-अरबी,हदीस, फिकह आणि इतर इस्लामिक ज्ञान आपल्या काळातील नामवंत विद्वानांकडून मिळवले. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुरक अमीन म्हणून काही दिवस काम केले. त्यानंतर त्यांनी वकिली करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी अलीगढच्या सर सय्यद कॉलेजमध्ये अरबी आणि फारसीच्या शिक्षकाची नोकरी घेतली. आणि शिबलीच्या यशाचा प्रवास सुरू झाला. अलीगढमधील नोकरीच्या काळात त्यांनी तुर्की,सिरिया आणि इजिप्तमध्ये प्रवास केला.
तुर्कस्तानातील सर सय्यदचे रफिक म्हणून आणि अरबी-फारसीचे पंडित म्हणून त्यांची खूप चलती होती. शिवाय त्यांना "तमघा-ए-माजिदिया" हा पुरस्कार देण्यात आला. परत आल्यावर त्याने अल्मामुन आणि सीरत-ए-नोमान अशी पुस्तके लिहिली. पुढच्या प्रवासादरम्यान ‘अल-फारूक’ हे पुस्तक लिहिले. सर्व सुरळीत चालू असतानाच १८९८ मध्ये सर सय्यद यांच्या मृत्यूनंतर,शिबली यांनी अलीगढ सोडले. आणि त्यांनी स्थापन केलेल्या "नॅशनल स्कूल" (आताचे शिबली कॉलेज) चा प्रचार करण्यासाठी आझमगडला परतले व सर्वाथाने या कामात स्वतःला झोकून दिले.
इस्लामिक तत्वज्ञान आणि संबंधित गोष्टींसाठी काय करता येईल याच प्रयत्नातून पुढे मार्च १९१० मध्ये,शिबली नोमानी यांनी नदवतुल उलमाच्या दिल्ली परिषदेत भाग घेतला. आणि सर्वप्रथम दारुल मुसन्नेफीनची(लेखकांचे मंडळ) स्थापना करण्याची कल्पना मांडली.कालांतराने या अकादमीचा आराखडा यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या साहाय्याने अल हिलला या साप्ताहिकात प्रकाशित केला. त्यांच्या महत्त्वाकांक्षी कल्पनेने मौलाना आझाद अत्यंत प्रभावित झाले.
आपल्या कामाचा दबदबा आणि प्रतिभावंत छबी उमटवून शिबली वयाच्या ५६ व्या वर्षी स्वतःच्या जन्मस्थानी म्हणजे आझमगड येथे परतले. गावी परतताच त्यांना अकादमी स्थापन करण्याचा होती. ज्याबद्दल त्यांनी 'अल-हिलाल' आणि इतर पेपरमध्ये लिहिले जाहीरपणे लिहिले होते.पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याआधीच १८ नोव्हेंबर १९१४ रोजी शिबलींचे निधन झाले.मात्र सुदैवाने त्यांनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली बाग, दोन कच्चे बंगले आणि तीनशेहून अधिक पुस्तके प्रस्तावित 'दारुल मुसन्नेफीन' या ग्रंथालयाकडे सुपूर्द केली होती. आणि त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांनी म्हणजे २१ नोव्हेंबर रोजी 'दारुल मुसन्नेफीन शिबली अकादमी'ची स्थापना झाली. अशा प्रकारे त्यांचे स्वप्न सत्यात उतरले.
हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी शिबली अकादमीचे संस्थापक अध्यक्ष हमीदुद्दीन फराही, संस्थापक-संचालक आणि सचिव सय्यद सुलेमान नदवी,मसूद अली नदवी,अब्दुस सलाम नदवी यांचे विशेष योगदान आहे. महत्वाचे म्हणजे सय्यद सुलेमान नदवी हे तर त्यावेळी डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते,मात्र आपल्या गुरुची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी तेथे राजीनामा देऊन अकादमीच्या कामाची पूर्ती करण्यासाठी ते आझमगड येथे आले.याच पावलावर पाऊल ठेऊन पुढे शिबलीच्या विश्वासू सहकाऱ्यांनी आणि निष्ठावंत शिष्यांनी त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात आणले.
शिबली नोमानी हे मौलाना फारुख चिरायकोटी यांचे शिष्य होते.त्यांच्या पुढील शब्दांतून ग्रंथालयाचे महत्त्व कळू शकते. "समाजासाठी जशी मदरसा,महाविद्यालय, विद्यापीठाची गरज असते तितकीच गरज कुतुबखाना (पुस्तकालय) आझमचीही असते. दारुल मुसन्नाफीनच्या ग्रंथालयाचे सदस्य शिबली नोमानी यांनी अजून एक बाब स्पष्ट केली होती, 'हा कुतुबखाना कोणत्याही जातीचा नसावा, तर हे वक्फ असावे. ज्याचा साहित्यकार आणि लेखक मोठ्या प्रमाणावर उपयोग करू शकतील.
शिबली नोमानी यांनी दाखवलेल्या मार्गावर शिबली अकादमीने केवळ उत्कृष्ट ग्रंथालय स्थापन केले नाहीत तर इस्लामी तत्त्वज्ञान, धर्म आणि संस्कृती या विषयांवर उत्कृष्ट पुस्तकेही प्रकाशित केली. यात मोठ्या प्रमाणावर स्वतः शिबली नोमानी आणि सय्यद सुलेमान नदवी यांनी लिहिलेय पुस्तकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शिबली अकादमीकडून 'मारिफ' हे उर्दू मासिकही जुलै १९१६ पासून सातत्याने प्रकाशित होत आहे. तुम्ही कधी आझमगडला भेट दिलीत तर एकदा शिबली अकादमीला जरूर भेट द्या.