एम. एम. किरवानी : मातीतल्या संगीताचा किमयागार

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
संगीतकार एम. एम. किरवानी
संगीतकार एम. एम. किरवानी

 

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू...’ गाण्यावरील नृत्याविष्काराने अनेकांचे डोळे विस्फारले. ‘बेस्ट ओरिजनल साँग’ श्रेणीत ‘नाटू नाटू’ने ऑस्करला गवसणी घातली तेव्हा त्याच्याशी जोडलेली आणखी काही नावे समोर आली, ती म्हणजे गीतकार चंद्र बोस, नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित, गायक कालभैरव व राहुल सिपलीगंज आणि अर्थातच प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवानी...
 
आपल्या मातीचा गोडवा ‘नाटू नाटू’ गाण्याच्या प्रत्येक शब्दात भरलेला आहे. परंपरा-संस्कृतीशी गाण्याची नाळ जोडलेली आहे. किरवानी यांच्याच शब्दांत सांगायचे झाले, तर भारतीय चित्रपटाचे आणि दाक्षिणात्य संगीताचे शुद्ध व मूळ रूप दर्शवणारे ते गाणे आहे.
 
तुम्हाला आनंद झाला तर बिनधास्त व्यक्त व्हा, नाचा आणि त्यात इतरांनाही सहभागी करून घ्या. गाण्याच्या सुरुवातीचे शब्द असलेल्या ‘ना पाटा सोडू’चा अर्थच मुळी ‘माझे गाणे ऐका आणि नाचायला या...’ असा आहे. किरवानी यांनी त्याला लोकसंगीताच्या ठेक्यांची अप्रतिम साथ दिली आहे.
 
चार जुलै १९६१ रोजी आंध्र प्रदेशातील कोव्वूर गावात कोडुरी मारकथमणी किरवानी ऊर्फ एम. एम. किरवानी यांचा जन्म झाला. एस. एस. राजामौली यांचे ते नात्यातले बंधू. संगीत दिग्दर्शक कल्याणी मलिक त्यांचे सख्खे भाऊ. त्यांच्या पत्नी एम. एम. श्रीवल्ली निर्मात्या. किरवानी यांची दोन्ही मुलेही गायक आहेत.
 
‘नाटू नाटू’ गाणारा गायक कालभैरव हा मोठा मुलगा. किरवानी यांनी संगीत कारकिर्दीची सुरुवात १९८७मध्ये सहायक संगीतकार म्हणून केली. ‘मौली’ सिनेमातून त्यांना मोठा ब्रेक मिळाला. राम गोपाल वर्मा यांच्या ब्लॉकबस्टर ‘क्षण क्षणम’नंतर त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
 
एकामागोमाग एक गाणी हिट होऊ लागली नि १९९४ मध्ये त्यांना हिंदी सिनेसृष्टीत ब्रेक मिळाला आणि ‘तू मिले, दिल खिले...’सारखे सुंदर गाणे जन्माला आले. किरवानी यांनी हिंदी संगीतरसिकांच्या मनात आपले नाते घट्ट केले. म्हणूनच आज ‘नाटू नाटू’च्या यशात चिंब भिजताना त्यांचे नादावून टाकणारे संगीत, दाक्षिणात्य भाषेची गुणवत्ता आणि गोडवा अधिकच जवळचा वाटतो.
 
‘नाटू नाटू’ गाण्याबाबत गीतकार चंद्र बोस म्हणतात, हे गाणे आपले गाव, बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमीशी ते संलग्न आहे. दोन स्वातंत्र्यसैनिक एका ब्रिटिश अधिकाऱ्याला नृत्याच्या मदतीने वाकायला लावतात, अशी अनोखी थीम त्यात मांडण्यात आली आहे.
 
किरवानी यांनी संगीतासाठी दमदार ठेका निवडला. ड्रमच्या तालावर सुरू झालेले गाणे त्यांनी असे चौफेर विणले की ते ऐकताना आणि बघताना आधी आपले कान नादावत जातात आणि मग शरीर..! ‘नाटू नाटू’ गाण्याची निर्मितीप्रक्रिया तब्बल १९ महिने सुरू होती.
 
किरवानी यांनी गाण्यासाठी १० ते २० ट्यून्स बनवल्या होत्या. डफ आणि ड्रमच्या जोडीने मेंडोलिनचा वापर करत दाक्षिणात्य संगीतातील तब्बल ६८ धून वापरून त्यांनी अक्षरशः इतिहास घडवला. संगीतप्रधान चित्रपट भारतीयांची खरी ओळख आहे. भारतात बोलपटाचा जमाना सुरू झाला तेव्हापासून त्यात गाणी आहेत.
 
आपल्या सिनेमातून गाणी कोणी वेगळी करू शकत नाही. किंबहुना तीच आपला ताकद आहे. ‘नाटू नाटू’च्या निमित्ताने जागतिक रंगमंचावर एम. एम. किरवानी यांनी आपली सिने-संगीत संस्कृती कलात्मकरीत्या मांडली आहे. म्हणूनच आजच्या घडीला ते मातीतील संगीताचे किमयागार ठरतात.

- सुशील आंबेरकर
 
सौजन्य: दै. सकाळ