पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा शेहबाज शरीफ

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शेहबाज शरीफ
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शेहबाज शरीफ

 

पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे ज्येष्ठ नेते शेहबाज शरीफ पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत. रविवारी (३ मार्च २०२४) मतदानानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

शेहबाज शरीफ यांनी शनिवारी (२ मार्च) पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. मतदानापूर्वीच आकडेवारी पीएमएल-एनच्या बाजूने असल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर देशातील सत्ता पुन्हा एकदा शेहबाज शरीफ यांच्या हाती येईल, असे मानले जात होते. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय नेते उमर अयुब खान यांनी त्यांच्या विरोधात पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता.

कोणाला किती मते मिळाली?
रविवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान निवडीसाठी मतदानाला सुरुवात झाली. मतदानादरम्यान, शेहबाज यांनी सुरूवातीलाच त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर 100 हून अधिक मतांची आघाडी घेतली. शेहबाज शरीफ यांना एकूण 201 मते मिळाली, तर पीटीआयचे उमर अयुब खान यांना 92 मते मिळाली. यानंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शाहबाज शरीफ सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यानंतर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनने पीपीपी आणि एमक्यूएमसोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांनी पक्षाच्या वतीने पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. शेहबाज शरीफ हे यापूर्वी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांनी पीपीपीसोबत सरकार स्थापन केले होते.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये पीएमएल-एन ७५ जागांवर विजयी मिळवला, तर तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांनी ९०  पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला होता. पीपीपीला ५४ जागा मिळाल्या होत्या.