सावित्रीबाईंचे साहित्य उर्दूत आणणारी आजची सावित्री!

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
'काव्यफुले'चा उर्दू अनुवाद करणाऱ्या डॉ. नसरीन रमजान...
'काव्यफुले'चा उर्दू अनुवाद करणाऱ्या डॉ. नसरीन रमजान...

 

उर्दू ही भारतीय भाषा. मात्र ती परकीय असल्याचा अनेकांचा समज. ती मुस्लिमांची भाषा असल्याचा अनेकांचा (आणि खुद्द मुस्लिमांचाही) गैरसमज. बरेच धार्मिक साहित्य उर्दूत अनुवादित झाल्यामुळे मुस्लीम समाजाचा या भाषेकडे ओढा अधिक. स्वाभाविकपणे काव्य आणि धार्मिक गोष्टी यांपलीकडे उर्दुकडे अजूनही बघितले जात नाही,हे या भाषेचे दुर्दैव! एकेकाळी भारतातील उतमोत्तम साहित्यनिर्मिती उर्दूत व्हायची. प्रेमचंदसारखे महान साहित्यिक उर्दुतच लिहायचे. मात्र देशाचे विभाजन झाले. पाकिस्तानने उर्दू राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारल्यामुळे उर्दू आणि मुसलमान हे गणित आणखी दृढ झाले.


स्वाभाविकच मुस्लिमेतरांचा उर्दूतील सहभाग कमी होत गेला आणि उर्दू साहित्य मुस्लीमकेन्द्री होऊ लागले. त्यामुळे केवळ उर्दू जाणणारे मुस्लीम इतर भाषांमधील सकस साहित्याला मुकले. सामाजिक सुधारणा आणि स्त्रीपुरुष समानता यांविषयी जुजबीच लेखन या भाषेत झाले. अनुवादही कमी झाले. स्वाभाविकपणे देशातील अनेक समाजसुधारक आणि त्यांचे कार्य उर्दू भाषिकांपर्यंत (आणि परिणामी बहुतांश मुस्लिमांपर्यंत) म्हणावे तसे पोहोचू शकले नाही. ही उणीव जाणवली डॉ. नसरीन रमजान या पुण्यातील एका उर्दू शिक्षिकेला. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे कार्य आणि साहित्य यांच्याशी परिचय होताच, त्यामुळे त्यांनी सावित्रीबाईंचे साहित्य उर्दूत अनुवादित करण्याचा निर्णय घेतला आणि सावित्रीबाई यांचे ‘काव्यफुले’ या पुस्तकाचा उर्दूत अनुवाद केला. सोबतच महात्मा फुलेंचे उर्दूतून छोटेखानी चरित्रही लिहले. सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांना उर्दू भाषिकांपर्यंत घेऊन जाण्याचे मोठे काम डॉ. नसरीन रमजान यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची ओळख करून देणारा हा लेख खास ‘आवाज मराठी’च्या वाचकांसाठी...

-संपादक


प्रेमाची भाषा जेव्हा अचानक इतिहास बोलू लागते तेव्हा? असच काहीसं घडतंय सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात. आणि हे घडवून आणणाऱ्या एका सावित्रीचे नाव आहे डॉ. नसरीन रमाजान.


नसरीन यांचा जीवनप्रवास:

ही गोष्ट सुरु होते तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथून. वर्ष १९६७.घरात सात भावंडे, त्यात घरातील सर्वात मोठी मुलगी नसरीन. त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावातून म्हणजे बार्शीतून पूर्ण केले. सातवी पर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले. त्यानंतर कन्या शाळेत प्रवेश घेतला आणि दहावीपर्यंतचे शिक्षण तेथून पूर्ण केले. मात्र येथे त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर उर्दुतुनही त्यांनी दहावीची परीक्षा पुन्हा दिली. ‘डबल एसएससी’ झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. हे सुरळीत चालू असतानाच त्यांनी एक वर्षे शिक्षण थांबवून बरेच कोर्स केले.  शिवणकाम, गृह उद्योग आणि बरेच काही. या सगळ्यांनंतर १९८७ ला दोन वर्षांची‘डीएड’ मध्ये पदवी प्राप्त केली. इथे हा शैक्षणिक प्रवास थांबला,पण काही वर्षांपुरताच. याच वर्षी त्याचं वैवाहिक आयुष्य सुरु झाले होते.


लग्न होऊन त्या पुण्यात आल्यानंतर त्यांनी ‘एसएनडीटी’ या विद्यापीठातून ‘कला’ शाखेत पदवी मिळवली. पुढे १९९१ मध्ये पुणे महानगरपालीकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. शिक्षिका म्हणून काम करत असतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातून बी. एड., एम एड पूर्ण केले. कला शाखेतून पदवीत्तर पदवी मिळवली. शिक्षणाची ही घोडदौड अशीच सुरु राहिली. २०१० मध्ये त्या नसरीन डॉक्टरेट झाल्या आणि डॉ.नसरीन रमजान ही ओळख निर्माण झाली. सध्या त्या पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.


लेखिका बनण्याची सुरुवात

२००४ मध्ये नसरीन आणि त्यांची मैत्रीण यांनी मिळून पहिलं-वहिलं पुस्तक लिहलं- ‘एक कहाणी एक नसिहत’.या पुस्तकाला प्रतिसादही चांगला मिळाला. मग सुरु झाला आणखी एक प्रेरणादायी प्रवास. यातूनच दोन स्वतंत्र लेखिकांचा जन्मही झाला. त्यांनी त्या नंतर बरीच पुस्तके लिहिली. जिंदगी एक अफसाना हे त्यातीलच एक नाव. या अफसाना संग्रहाला  महाराष्ट्र राज्य ऊर्दु साहित्य अकादमी तर्फे पुरस्कार मिळाला. चिराग का जीन और जैद, भीगी पलके मुस्कुराते होंठ,ख्वाईशों के भंवर, तोहफा, लकीर का फकीर,दिल की गली में चांद उतरा अशी अनेक नावे घेता येतील. पण त्या सर्वांत लक्षणीय ठरले सावित्रीबाई फुले यांच्या ’काव्य फुले’ या काव्यसंग्रहाचे उर्दूमध्ये केलेले भाषांतर.सावित्रीबाई अशा पद्धतीने पहिल्यांदा उर्दूमध्ये गेल्या. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर ‘महात्मा ज्योतिराव फुले के नजरिया और उनका अदब’ हे पुस्तक ही नसरीन यांनी लिहिले.


सावित्रीबाईच का?

सावित्रीबाई वर काम करण्यामागची प्रेरणा काय होती असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, ‘घोरपडी येथे शिक्षिका म्हणून काम करताना दरवर्षी आम्ही भिडेवाड्यावर मुलांची सहल नेत होतो. त्यावेळेस अचानक वाटून गेल की एवढं लिहते आहेच तर सावित्रीबाई वर का लिहू नये?काळ बदलला असला तरीसामाजिक परिस्थिती अजूनही नाजूक आहे, ही बाब सावित्रीबाईंच्याच्या कविता वाचून प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर काम करण्याचा निर्णय घेतला.मुस्लीम समाजाकडूनही उर्दूतील या उपक्रमाचे चांगले स्वागत झाले. उर्दूत अनुवाद केल्यामुळे सावित्रीबाई आणि त्यांचे साहित्य अधिकाधिक मुस्लिमांपर्यंत पोहचू शकल्याचे समाधान असल्याचे त्या सांगतात.


फातिमा शेख यांच्याविषयी केलेले लिखाण

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी फातिमा शेख त्यांच्याबद्दल खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांच्या वर एक छोटीसी पुस्तिका नसरीन यांनी लिहिली आहे. त्यावर त्या अजून काम करत आहे. हीही पुस्तिका लिहायला त्यांना तब्बल आठ वर्षे लागली. फातिमा शेख यांच्यावरील हे उर्दूतील पहिले पुस्तक आहे. आता फातिमा शेख यांच्यावर हिंदीतून पुस्तक लिहिण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. 


शिवाजी महाराजांवरही उर्दूतून लिहिणार चरित्र

नसरीन शिवाजी महाराज यांच्यावरही लिहिणार आहेत. आतापर्यंत जे शिवाजी महाराज आपण शिकलो त्या पलीकडे जाऊन लिहण्याचा त्यांचा मानस आहे.


कुटुंबियांची साथ

नसरीन यांच्या लेखन प्रवासात कुटुंबियांचा विशेषतः त्यांच्या नवऱ्याचा सर्वाधिक पाठींबा होता आणि अजूनही आहे. याबद्दल त्या एक आठवण सांगतात, ‘मी येरवड्याच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असताना, माझ्या परीक्षेच्या काळात माझा नवरा सायकलवर मला येरवड्याला घ्यायला येत असत तिथून आम्ही ‘एसएनडीटी’ला येत असू आणि तीन ते सहा परीक्षा झाल्यानंतर आम्ही घरी जात होतो. हा अनुभव सांगितल्यानंतर “मी भाग्यवान!” हे वाक्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले आणि  त्यात एक समाधानाची झलक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कारण कुटुंबासोबत त्यांना समाजाची मिळणारी साथ आणि कौतुकाची थाप त्यांचा उत्साह द्विगुणीत करते.


कामाची दखल

त्यांच्या या साहित्यासेवेसाठी कामाचे कौतुक म्हणून त्यांना बरेच पुरस्कार मिळाले, २०१७ मध्ये शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिकेतर्फे शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ज्ञानज्योती फातिमा बी हा पुरस्कार मिळाला.सोबतच महिला व अपंग बाल विकास संस्था टिटवाला, ठाणे तर्फे,अल्पभाषिक विशेष शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. अस्बाक पब्लिकेशन पुणे तर्फे शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यासाठी गौरव चिन्हाने सन्मानित करण्यात आले होते. याव्यतिरिक्त त्यांना उर्दू अनुवादासाठी नुकताच‘सत्यशोधक मुक्ता साळवे समाजभूषण पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला.

- पूजा नायक,
आवाज मराठी