भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अंतराळ तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग केला. इस्रोच्या सर्व धोरणात्मक अंतराळ यंत्रणांचा वापर सैन्याने या मोहिमेसाठी केला. इस्रोच्या टीमने दिवस-रात्र मेहनत घेऊन देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
स्वदेशी उपग्रहांचा वापर
भारताकडे सध्या 9-11 सैन्य उपग्रह आहेत, ज्यांचा उपयोग ऑपरेशन सिंदूरच्या नियोजनात झाला. कार्टोसॅट मालिकेतील उपग्रहांनी उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा पुरवल्या, ज्या सैन्याच्या गुप्तचर यंत्रणेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. कार्टोसॅट-2C, ज्याची रिझोल्यूशन क्षमता 0.65 मीटर आहे, याने 2016 च्या सर्जिकल स्ट्राइकमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती. या उपग्रहांनी ऑपरेशन सिंदूरसाठी अचूक आणि स्पष्ट प्रतिमा उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे सैन्याला अचूक निर्णय घेणे शक्य झाले.
रिसेंट मालिकेतील उपग्रहांनी रडार प्रतिमा पुरवल्या, ज्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरल्या. तर, जीसॅट मालिकेतील उपग्रहांचा वापर संचारासाठी (सॅट-कॉम) झाला. याशिवाय, भारताची नेव्हिक प्रणाली आणि इतर जागतिक जीपीएस यंत्रणांनीही ऑपरेशनला आधार दिला. "भारतीय उपग्रह प्रत्येक 14 दिवसांनी विशिष्ट क्षेत्रांची माहिती देतात, तर व्यावसायिक डेटा दररोज उपलब्ध होतो," असे इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
आंतरराष्ट्रीय सहकार्य
भारतीय सैन्याने अमेरिकेतील मॅक्सार या व्यावसायिक उपग्रह प्रतिमा प्रदात्याकडून प्रतिमा घेतल्या. मॅक्सार जगभरातील अनेक सरकारांना आणि खासगी संस्थांना सेवा पुरवते. युरोपमधील सेंटिनेल आणि अमेरिकेतील आणखी एका व्यावसायिक ऑपरेटरकडूनही डेटा घेण्यात आला. पाकिस्ताननेही आपल्या ऑपरेशन्ससाठी मॅक्सारच्या सेवांचा वापर केला की नाही, याबाबत स्पष्टता नाही. मात्र, पाकिस्तानला चीनच्या व्यापक सैन्य अंतराळ यंत्रणेचा आधार आहे.
इस्रोची भविष्यकालीन योजना
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले की, 18 मे रोजी ईओएस-09 किंवा रिसॅट-1बी हा उपग्रह प्रक्षेपित होणार आहे. या उपग्रहात प्रगत सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार प्रणाली आहे, जी सर्व हवामान परिस्थितीत उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा पुरवेल. ढग किंवा अंधार यांसारख्या अडथळ्यांवर मात करणारी ही तंत्रज्ञान सैन्याच्या देखरेख क्षमतेत मोठी वाढ करेल. येत्या पाच वर्षात इस्रो 100-150 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्यामध्ये 52 उपग्रह स्पेस-बेस्ड सर्व्हेलन्स-3 (एसबीएस-3) कार्यक्रमांतर्गत असतील. यापैकी 31 उपग्रह खासगी क्षेत्र विकसित करेल.
अंतराळ तंत्रज्ञानाचे महत्त्व
इंडियन स्पेस असोसिएशनचे (आयएसपीए) संचालक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एके भट म्हणाले, "आधुनिक युद्धात अंतराळ तंत्रज्ञान अविभाज्य आहे. प्रतिमा, सॅट-कॉम आणि स्थान-नेव्हिगेशन-वेळ (पीएनटी) यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला."
भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि संरक्षणासाठी दहा उपग्रह २४ तास निरीक्षण करीत आहेत, अशी माहिती 'इस्रो'चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली.
इंफाळमधील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात ते रविवारी (ता. ११) बोलत होते. भारताची वाटचाल एक चैतन्यशील अवकाश शक्तीकडे सुरू असून २०४० पर्यंत आपले स्वतःचे अवकाश स्थानक तयार होणार आहे, असे डॉ. नारायणन यांनी सांगितले.
ते म्हणाले, "भारतातून ३४ देशांचे ४३३ उपग्रह अवकाशात सोडून ते कक्षेत स्थापन करण्यात आले आहेत. देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी दहा उपग्रह आठवड्याचे सातही दिवस २४ तास सतत कार्यरत आहेत, हे सांगताना मला आनंद होत आहे."
भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 'इस्रो'च्या अध्यक्षांनी भारतीयांच्या सुरक्षेत उपग्रहांच्या योगदानाची माहिती दिली. डॉ. नारायणन म्हणाले, की आपल्या देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला उपग्रहांचा वापर करावा लागणार आहे. आपल्या सात हजार किलोमीटरच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. संपूर्ण उत्तरेकडील भागाचे आपल्याला सतत निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही." 'जी २०' देशांसाठी हवामान बदलाचा आणि हवेच्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी व हवामानाचे निरीक्षण करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) उपग्रह विकसित करीत आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली प्रगती अद्वितीय आणि उल्लेखनीय आहे, " असे ते म्हणाले.
डॉ. नारायणन म्हणाले...
-
देशात १९४७ मध्ये कोणताही अंतराळ कार्यक्रम नव्हता
-
संपूर्ण अंतराळ उपक्रम १९६२ मध्ये सुरू झाला
-
१९६९ हे वर्ष ऐतिहासिक होते. कारण त्याच वर्षी भारतीय अंतराळ
-
संशोधन संघटनेची स्थापना झाली
-
आपण १९७५ मध्ये पहिला उपग्रह विकसित केला
-
यान प्रक्षेपकांची एक नवी श्रेणी आपण विकसित केली आहे. आतापर्यंत आपण विविध प्रकारचे आणि क्षमतेचे १३९ उपग्रहांची निर्मिती केली आहे
-
भारत आणि अमेरिका संयुक्तपणे एक खर्चिक आणि प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह तयार करणार असून, तो भारतातून प्रक्षेपित केला जाईल
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter