३२ विमानतळांवर हवाईसेवा झाली पूर्ववत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळल्यानंतर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील ३२ विमानतळ नागरी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाली आहेत. सात मेपासून ही विमानतळ सुरक्षा कारणास्तव बंद होती. शस्त्रसंधीमुळे परिस्थिती सामान्य होऊ लागल्याने भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) ही विमानतळ व्यावसायिक उड्डाणांसाठी खुली केली आहेत. 

विमानतळ बंदमुळे नागरिक आणि विमान कंपन्यांचे नुकसान
केंद्र सरकारने पाकिस्तान सीमेजवळील संभाव्य धोक्यामुळे २३ मेपर्यंत ही विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे श्रीनगर, अमृतसर, चंदीगड, लेह, जोधपूर, भुज, जामनगर, लुधियाना, शिमला, धरमसाला यासारख्या विमानतळांवरील नागरी उड्डाणे थांबली होती. प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. विमान कंपन्यांचेही करोडो रुपयांचे नुकसान झाले असून इंडिगो, स्पाइसजेटसारख्या कंपन्यांना अनेक उड्डाणे रद्द करावी लागली, तर काही मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद झाल्या.

शस्त्रसंधी आणि विमानतळ उघडण्याचा निर्णय
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने सात मे रोजी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन, यूएव्ही आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. भारताने हे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवून लावले होते. दोन तीन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली होती.  यानंतर पाकिस्ताननेही आपली विमानतळे खुली केली. भारताने १० मे रोजी शस्त्रसंधी लागू झाल्यावर तातडीने ३२ विमानतळांवरील बंदी उठवली. सोमवारी सकाळी १०:३० पासून या विमानतळांवर व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली.

विमान कंपन्यांचा प्रवाशांना सल्ला
विमानतळ सुरू झाल्याने हवाई वाहतूक कंपन्यांनी प्रवाशांसाठी प्रवास सल्ला जारी केला आहे. इंडिगोने बंद मार्गांवरील सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांना उड्डाणांचे वेळापत्रक तपासण्याचा सल्ला देण्यात आला असून एएआयनेही प्रवाशांना विमानतळांवरील नवीन नियम आणि वेळा तपासण्यास सांगितले आहे. काही विमानतळांवर सुरक्षा तपासणी तीव्र असल्याने प्रवाशांनी वेळेआधी विमानतळावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

ऑपरेशन सिंदूर आणि तणावाची पार्श्वभूमी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या मोहिमेत बहावलपूर, मुरिदके आणि सियालकोट येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानला जबर धक्का बसला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ड्रोन हल्ले आणि शस्त्रसंधी उल्लंघन केले. यामुळे भारताने उत्तर आणि पश्चिम सीमेवरील हवाई क्षेत्र बंद केले. ३२ विमानतळ बंदीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर मोठा परिणाम झाला. शस्त्रसंधीमुळे आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter